घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी पोलीस स्टेशनने गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे व मुद्देमाल निर्गतीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, “CCTNS डेटा फीडिंग” मध्ये घाटंजी पोलिस स्टेशन दुय्यम क्रमांक पटकावला आहे. तसेच जून महिन्यातील मासिक गुन्हे सभेत त्यांनी विशेष कामगिरीच्या जोरावर गुन्हे निर्गतीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात तिसरा तर मुद्देमाल निर्गतीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या जप्त मुद्देमालाच्या निर्गतीसाठी घाटंजी पोलिसांनी ठोस पावले उचलत नव्या जोमाने काम सुरू केले आहे. मागील दोन महिन्यांत बहुसंख्य प्रलंबित गुन्हे, अर्ज व इतर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, ६७ गावांच्या कार्यक्षेत्रात केवळ २७ प्रकरणेच सध्या घाटंजी पोलीस ठाण्यात प्रलंबित आहे. सदरची कामगिरी घाटंजी पोलिस ठाण्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे, हे येथे उल्लेखनीय.
विशेष म्हणजे जुलै महिन्यात घाटंजी येथील भारतीय स्टेट बँकेजवळ एका महिलेच्या पिशवीतील १ लाख रुपयांची चोरी झाली होती. ती चोरी घाटंजी पोलीसांनी अवघ्या चार तासांत उघडकीस आणली आहे. संबंधित संशयित चोरट्यांना पांढरकवडा येथुन अटक करून चार आरोपींना अटक करण्यात आले होते. घाटंजी पोलीसांनी केलेल्या तपासात सदर आरोपींनी १२ चोरीच्या घटनांची कबुली दिली असून, त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, आर्णी, महागाव दोन, तसेच वाशिम जिल्ह्यातील मानोरा, अनसिंग, वाशिम, मालेगांव, आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे. या तपासात चोरीस गेलेल्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची यशस्वी कामगिरी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (यवतमाळ), उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईत घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विनायक जाधव, ठाणेदार यांचे रायटर दिनेश जाधव, गोपनीय शाखेचे अमोल कोवे, अंकुश बहाळे, निलेश घोसे, अरविंद चेमटे, छंदक मनवर आदींचा सहभाग होता.







