जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जगदीश झुलाल ठाकरे हा चाळीशी पार केलेला तरुण होता. धुळे जिल्ह्याच्या मोरदड या गावी राहणारा जगदीश ठाकरे हा स्थानिक ग्रामपंचायत राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रीय होता. स्थानिक ग्रामीण राजकारणाचे वलय त्याला घरातूनच लाभले होते. त्याचे वडील झुलाल ठाकरे हे मोरदड गावाच्या वार्ड क्रमांक तिन मधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. गावातील सातपैकी सहा ग्रामपंचायत सदस्य जगदीश झुलाल ठाकरे याच्या पुढाकाराने बिनविरोध विजयी झाले होते. यावरुन त्याचे स्थानिक ग्रामपंचायत पातळीवरील प्रभावी वर्चस्व दिसून येत होते.

मोरदड गावाचे सरपंच पद खुल्या प्रवर्गातील महीलांसाठी जाहीर झाले होते. सरपंच पदाची नियुक्ती करण्यासाठी देखील जगदीश ठाकरे याचाच प्रभाव उपयोगी ठरला. जगदीश ठाकरे याच्या पुढाकाराने महिला सरपंचपदाची माळ गावातील अशोक मगन मराठे याची आई सौ. कल्पना मगन मराठे यांच्या गळ्यात पडली होती तर उपसरपंच पदी गोविंद शिवाजी पाटील यांची वर्णी लागली होती.
मोरदड गावाच्या राजकारणात वर्चस्व असलेला जगदीश ठाकरे हा आदीवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करत होता. त्यामुळे गावात वीर एकलव्य यांचा पुतळा बसवून देण्याचे आश्वासन महिला सरपंच सौ. कल्पना मराठे आणि उप सरपंच गोविंद शिवाजी पाटील यांनी जगदीश ठाकरे यास दिले होते. या आश्वासनाला बळी पडून जगदीश ठाकरे याने सरपंच आणि उप सरपंच पदावर दोघांची नियुक्ती होण्यासाठी आपले राजकीय कसब पणाला लावले होते.

निवडणूकीची धामधूम आटोपली. दिवसामागून दिवस जात होते. मात्र सरपंच सौ. कल्पना मराठे आणि उप सरपंच गोविंद पाटील या एकाच समाजाच्या दोघांनी गावात वीर एकलव्य यांचा पुतळा उभारुन देण्याचे आश्वासन काही पुर्ण केले नाही. त्यामुळे आदीवासी बांधव जगदीश ठाकरे याला सारखी सारखी विचारणा करुन हैरान करत होते. आपल्या आदिवासी बांधवांच्या बळावर तो त्यांचा म्होरक्या अर्थात लिडर झाला होता. निवडणूक आटोपल्यानंतर साधारण तिन महिन्यातच पुतळा उभा करण्यावरुन वादाला सुरुवात झाली. पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली नसली तरी त्या विषयावरुन वादाला मात्र सुरुवात झाली होती. बघता बघता दुसरी निवडणूक जवळ येऊ लागली.
या वादातून महिला सरपंच सौ. कल्पना मराठे यांचा मुलगा अशोक मगन मराठे याने त्याच्या साथीदारांचा मदतीने जगदीश ठाकरे याच्या घरावर गेल्या वर्षी हल्ला केला. या हल्ल्यात जगदीश ठाकरे यास मारहाण झाली. या मारहाण व हल्ल्याप्रकरणी जगदीश ठाकरे याची पत्नी अरुणा ठाकरे हिने धुळे तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर दिवसामागून दिवस असेच निघून गेले. मोरदाड गावातील रहिवासी असलेला शुभम संभाजी सावंत नावाचा तरुण पुणे येथे कामधंद्यानिमीत्त स्थायिक झाला होता. तो अधुनमधून मोरदाड या त्याच्या मुळगावी येत होता. काही महिन्यापुर्वी तो आपल्या मुळ गावी आला होता. सरपंच आणि उप सरपंच यांच्या गटाशी निकटवर्तीय असलेला शुभम सावंत हा आगामी ग्रामपंचायत निवडणूक नजरेसमोर ठेऊन त्यांना टिप्स देत होता. आगामी ग्रामपंचायत निवडणूक नजरेसमोर ठेवत कुणाशी वैर करु नका. गोडीगुलाबीने रहा असा सल्ला त्याने विद्यमान सरपंच आणि उप सरपंच यांना देण्यास सुरुवात केली होती.
त्याने लवकरच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या जगदीश ठाकरे याच्याशी मैत्री करुन घेतली. लवकरच दोघे एकमेकांचे मित्र झाले. त्याच्याच सांगण्यावरुन विद्यमान सरपंच सौ. कल्पना मगन मराठे यांचा मुलगा अशोक मराठे याने देखील जगदीश सोबत मैत्रीचा हात पुढे केला. जगदीश ठाकरे याने शुभम सावंत याच्या सांगण्यावरुन अशोक मराठे सोबत मागचे वाद विसरुन मैत्री केली. त्यानंतर जगदीश, शुभम आणि अशोक हे तिघे जण एकमेकांचे मित्र झाले व सोबत राहू लागले. मात्र वरवर दोघांनी जगदीशसोबत केलेली व दिसणारी मैत्री ही दोघांची एक खेळी होती. राजकारणात आणि आगामी निवडणूकीत वरचढ आणी अडसर ठरणा-या जगदीशचा त्यांना काटा काढायचा होता.

दिनांक 28 जून 2025 रोजी शुभम सावंत हा चाळीसगाव येथे त्याचा परिचीत विरेंद्रसिंग गोवींदसिंग तोमर याच्या घरी आला. विरेंद्रसिंग हा त्याच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगत असे. आपण गावाकडे मोरदड येथे फिरुन येऊ असे शुभमने विरेंद्रसिंग यास म्हटले. शुभमच्या म्हणण्यानुसार विरेंद्रसिंग हा शुभम रहात असलेल्या मोरदड या गावी आला. विरेंद्रसिंग याने त्याच्यासोबत पिस्टल बाळगले होते. चाळीसगाव येथून आलेल्या विरेंद्रसिंगने त्या रात्री शुभमच्या घरी मोरदड येथे मुक्काम केला.
दुस-या दिवशी 29 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शुभम आणि विरेंद्रसिंग असे दोघे जण शिरुड चौफुलीवर फिरायला गेले. त्याठिकाणी त्यांनी भेळ खाल्ली. भेळ चवदार नसल्यामुळे त्यांना राग आला. त्यामुळे त्यांनी भेळ विक्रेत्यासोबत वाद घातला. भेळ विक्रेत्यासोबत त्यांचा वाद वाढत गेला. त्यामुळे वाद मिटवण्यासाठी त्यांनी गावातून अशोक मगन मराठे याच्या मध्यस्तीने जगदीश ठाकरे यास बोलावून घेतले. आपण एका मित्राच्या वाढदिवसाला जावून येऊ अशी बतावणी करत अशोक मराठे याने जगदीशला सोबत घेत भेळ विक्रेत्याच्या ठिकाणी आणले. त्याठिकाणी शुभम सावंत आणि विरेंद्रसिंग तोमर या दोघांचा भेळ विक्रेत्यासोबत वाद सुरु होता.


आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारा जगदीश ठाकरे याने हा वाद सामोपचाराने मिटवला. भेळ विक्रेत्यासोबत झालेला वाद यशस्वीरित्या मिटल्याचे बघून शुभम सावंत, विरेंद्रसिंग तोमर आणि अशोक मराठे हे तिघे त्याच्यावर खुश झाल्याचा देखावा करु लागले. चला आपण बाहेर कुठेतरी जाऊन पार्टी करुया असे तिघांनी म्हणत जगदीशला आपल्या कारमधे बसवून घेतले. जगदीशने त्याच्या सोबत आणलेली मोटार सायकल त्याच ठिकाणी उभी करुन तो तिघांसोबत कारमधे पार्टीसाठी जाण्यास निघाला. आपण पार्टी करण्यासाठी गावातील शुभम आणि अशोक यांच्यासोबत बाहेर जात असल्याचे त्याने घरी पत्नी अरुणा ठाकरे हिला सांगितले.
विरेंद्रसिंग याच्याकडे पिस्टल आहे हे शुभम आणी अशोक या दोघांना चांगल्याप्रकारे माहिती होते. केवळ जगदीश ठाकरे हा त्या माहितीपासून अनभिज्ञ होता. वाटेत जगदीशला अंधारात ठेऊन तिघांनी त्याला संपवण्याचा प्लॅन आखला. जगदीश मात्र साध्या मनाने तिघांसोबत बसला होता. कन्नड तालुक्यातील गल्ले बोरगाव या गावाच्या पुढे काही अंतर पुढे गेल्यावर तिघांनी जगदीशसोबत हेतु पुरस्सर वाद घालण्यास सुरुवात केली. बघता बघता वाद वाढत गेला. संधी साधत रचलेल्या कटानुसार विरेंद्रसिंग याने जगदीशच्या डोक्यात पिस्टलच्या दोन गोळ्या झाडल्या. त्यात जगदीश ठाकरे ठार झाला. धुळे शहराच्या दिशेने जात असतांना जगदीशचा मृतदेह कन्नड घाटात तिघांनी फेकून दिला.
दरम्यानच्या कालावधीत मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून बाहेर गेलेला जगदीश रात्र झाली तरी देखील घरी आला नाही. त्यामुळे त्याची पत्नी अरुणा घरी काळजी करत होती. रात्री नऊ वाजता तिने त्याला फोन करुन त्याची विचारणा केली. मी हॉटेलमधे असून घरी येण्यास उशीर होईल असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात त्याची गोळी झाडून हत्या झाली. पुन्हा रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जगदीशच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीने फोन लावला असता तो लागत नव्हता. त्यानंतर वारंवार फोन करुन देखील त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तिचा त्याच्याशी संपर्क होत नव्हता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिचे पती जगदीशसोबत मोबाईलवर झालेले बोलणे अखेरचे ठरले. आपला पती कुठे असेल? त्याच्या जीवाचे काही बरे वाईट तर झाले नसेल? तो घरी का आला नाही? असे एक ना अनेक प्रश्न त्याची पत्नी अरुणा हिच्या मनात येत होते.


त्यामुळे तिच्यासह नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा शोध सुरु असतांना तिच्यासह नातेवाईकांना 1 जुलै रोजी शिरुड चौफुलीनजीक असलेल्या पुलाखाली त्यांना जगदीशची मोटार सायकल आढळली. याच परिसरात त्याने भेळ विक्रेत्यासोबत झालेला शुभम आणि विरेंद्रसिंग या दोघांचा वाद मिटवला होता. त्यानंतर तेथेच मोटार सायकल उभी करुन तो त्यांच्या कारमधे बसून पुढे गेला होता. त्याठिकाणी असलेल्या एका चहाच्या दुकानावरील महिलेला या मोटार सायकलबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावर एक तासात परत येतो असे सांगून या मोटार सायकलवरील तरुण दोन दिवसांपुर्वी 29 तारखेला सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास तिघांसोबत कारमधे बसून गेला होता, अशी माहिती त्या महिलेने जगदीशची पत्नी अरुणा व तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना दिली. दोन दिवस उलटले तरी जगदीशची मोटार सायकल त्या ठिकाणी उभी होती मात्र तो परत आला नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणा-या नातेवाईकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर देखील त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
अखेर अरुणा ठाकरे हिने त्याच दिवशी धुळे तालुका पोलिस स्टेशन गाठत आपला पती गेल्या 29 जून 2025 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल दिली. त्या आधारे धुळे तालुका पोलिस स्टेशनला जगदीश ठाकरे बेपत्ता झाल्या प्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली. धुळे तालुका पोलिस या मिसींगचा तपास करत होते. जगदीशची पत्नी व नातेवाईक देखील त्यांच्या पातळीवर त्याचा तपास करतच होते. जगदीश घरुन निघाला त्या दिवशी 29 जून रोजी सायंकाळी शिरुड चौफुली परिसरात भेळ विक्रेत्यासोबत शुभम आणि एका अनोळखी तरुणाचा वाद झाला होता आणी तो वाद जगदीश आणी इतर लोकांनी मिटवला होता अशी देखील माहिती अरुणा ठाकरे हिच्यासह तिच्या नातेवाईकांना समजली.
दि. 29 जून पासून बेपत्ता झालेल्या जगदीशचा मृतदेह 1 जुलै रोजी मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड घाटात एका वन रक्षकाच्या नजरेस पडला. तो मृतदेह त्या वन रक्षकाच्या दृष्टीने अनोळखी होता. या घटनेची माहिती लागलीच त्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी आपल्या सहका-यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ गाठले. अमळनेर उप विभागासह चाळीसगाव उप विभागाचा अतिरिक्त कारभार सांभाळणा-या डिवायएसपी विनायक कोते यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सर्वप्रथम या घटनेची अकस्मात मृत्युची नोंद घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याकामी महत्वाच्या सुचना पोलिस निरिक्षक राहुलकुमार पाटील यांना दिल्या. मृतदेहाचे अवलोकन केले असता त्याच्या डोक्यात गोळीबार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याचे कुणी नाकारु शकत नव्हते. वनरक्षकाच्या खबरीनुसार या घटनेप्रकरणी सुरुवातीला चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सुरु केला असतांनाच त्यांची पाचोरा पोलिस स्टेशनला बदली झाल्याचे आदेश आले. त्यामुळे त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्वत: डिवायएसपी विनायक कोते यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला. सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचे होते. मृतदेह पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. मयत तरुणाच्या हातावर एक गोंदण होते. त्या गोंदणाच्या मदतीने त्याची ओळख पटू शकते असा अंदाज डिवायएसपी विनायक कोते यांनी मनाशी लावला. मयताचा फोटो आणि त्याच्या हातावरील गोंदणाचा फोटो विविध सोशल मिडीयावर प्रसारीत करुन त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मयत तरुण कोण? कुठला? त्याचे नाव काय? याचा काहीच थांगपत्ता नव्हता. पोलिसांच्या दृष्टीने या अनोळखी मृतदेहाचे शव विच्छेदन करणे देखील तेवढेच गरजेचे होते. मृतदेह पंचनामा, घटनास्थळ पंचनामा आदी कायदेशीर सोपास्कार आटोपल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
मयत जगदीश ठाकरे याच्या डोक्यात बंदुकीच्या दोन गोळ्या असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. मात्र फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्यामुळे त्या गोळ्या काढण्यास अडचण आली. त्यामुळे तो मृतदेह तेथून धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. अशा प्रकारे या मृतदेहाचे दोन वेळा शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपासादरम्यान या मृतदेहाच्या वर्णनाशी मिळते जुळते वर्णन असलेली कुणी व्यक्ती बेपत्ता झाली आहे का? तशी मिसींग कुठे दाखल आहे का? याचा शोध घेण्यात आला. पुढील तपासात अशा स्वरुपाची मिसींग धुळे तालुका पोलिस स्टेशनला नोंद असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना समजली. चाळीसगाव ग्रामीण आणि धुळे तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी या गुन्ह्याच्या अनुशंगाने एकमेकांच्या संपर्कात होते. या कालावधीत मयत जगदीश ठाकरे याची पत्नी अरुणा ठाकरे व तिचे नातेवाईक त्याचा शोध घेतच होते.
आपण दाखल केलेल्या मिसींगचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी सर्वजण धुळे तालुका पोलिस स्टेशनला 2 जुलै रोजी आले. त्यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी आलेल्या सर्वांना कन्नड घाटात आढळून आलेल्या मयत तरुणाचे फोटो आणि त्याच्या हातावरील गोंदण दाखवले. फोटो बघताच हा आपला पती जगदीश ठाकरे असल्याचे अरुणा ठाकरे हिने ओळखले. अशा प्रकारे मयताची ओळख पटली आणि धुळे तालुका पोलिस स्टेशनला दाखल मिसींगचा तपास पुर्णत्वाकडे गेला.
मयत जगदीश ठाकरे याची ओळख पटल्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या तपासाचा निम्मा तपास जवळपास पुर्ण झाला. आता मारेकरी कोण आणि त्यांनी जगदीशची हत्या का केली याचा महत्वाचा तपास पुर्ण करायचा होता. अरुणा ठाकरे हिने शासकीय रुग्णालयात येऊन आपल्या पतीचा मृतदेह पाहून पुन्हा एकवेळा पोलिसांना त्याची ओळख पटवून दिली. त्यानंतर आपला पती जगदीश ठाकरे हा 29 तारखेला घरातून कसा, कुठे, कशासाठी आणि कुणासोबत गेला याबाबत तिला असलेल्या माहितीच्या आधारे तिने चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खूनाची फिर्याद दिली. चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 196/2025 बीएनएस कलम 103 (1) सह अॅट्रासिटी अक्ट अन्वये मोरदड गावातील अशोक मगन मराठे व शुभम संभाजी सावंत या दोघा संशयितांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोरदड गावातील रहिवासी व संशयित आरोपी अशोक मराठे आणि शुभम सावंत या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. जगदीशच्या हत्येत अशोक मराठे आणि शुभम सावंत या दोघांचा सहभाग असल्याचे समजताच मोरदड गावातील आदिवासी समाज बांधवांच्या मनात संतापाची लाट पसरली. शोक संतप्त जमावाने संशयीतांच्या घरावर दगडफेक सुरु केली. मात्र धुळे तालुका पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला शांत करत त्यांचा राग आणि परिस्थिती आटोक्यात आणली. या गुन्ह्यात विरेंद्रसिंग गोविंदसिंग तोमर (रा. टाकळी प्र चा. ता. चाळीसगाव) याचा प्रमुख सहभाग असल्याचे अटकेतील दोघांनी पोलिसांजवळ कबुल केले. त्यानेच जगदीशवर गोळीबार केल्याचे दोघांनी पोलिस कोठडी दरम्यान कबुल केले. त्यामुळे फरार झालेल्या संशयीत विरेंद्रसिंग तोमर याला देखील उशिरा रात्री शिताफीने अटक करण्यात आली. तिघा संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 8 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
जुन्या राजकीय वादातून तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जगदीश आपले राजकीय वर्चस्व निर्माण करेन याचा अंदाज घेत विरेंद्रसिंग याच्या मदतीने दोघांनी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर जगदीशचा मृतदेह कन्नड घाटात टाकून तिघे पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तिघांना हुडकून काढत त्यांना अटक केली. डीवायएसपी विनायक कोते यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उप निरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलिस उप निरीक्षक राहुल राजपुत, चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, पो कॉ महेश पाटील, भुषण शेलार, चालक बाबासाहेब पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.








