जळगाव : आदिवासी तरुणांना मारहाण करण्यासह त्यांना अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडणा-या पीएसआयला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निलंबित केले आहे. साजन नार्हेडा असे निलंबीत करण्यात आलेल्या चोपडा ग्रामीण येथील पीएसआयचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात असलेल्या आदिवासी समाजातील प्रेमी युगल पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी संशय व्यक्त केलेल्या एका महिला व तिघे तरुण अशा चौघांना चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले होते. 22 जुलै रोजी घडलेल्या या घटनेत पोलिस उप निरीक्षक साजन नार्हेडा यांनी चौघांना मारहाण केली. त्यातील तिघा तरुणांना अश्लील वर्तन करण्यास त्यांनी भाग पाडले.
पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना या घृणास्पद प्रकार समजताच त्यांनी पीएसआय नार्हेडा यांना निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली. त्या शिफारशीच्या आधारे माहिती घेत डॉ. रेड्डी यांनी पोलिस उप निरीक्षक नार्हेडा यांना निलंबित केले आहे. आदीवासी संघटनांनी देखील पोलिस अधिक्षकांना याबाबतचे निवेदन दिले होते.







