जळगाव : स्थानिक गुन्हे शाखा आणि धरणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दुधात भेसळ करणा-या इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील रहिवासी सोमनाथ आनंदा माळी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. मानवी आरोग्यास अपायकारक भेसळयुक्त दूधाची निर्मीती करतांना तो पथकाला आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संदीप पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे खात्री करुन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
भवरखेडा ता.धरणगांव येथे सोमनाथ आनंदा माळी हा एका कॅनमध्ये 38 लिटर मिक्स दुध, एका कॅनमध्ये 38 लिटर भेसळयुक्त मिश्रण, रिफाईंड पाम करनेल खाद्य तेल 1.6 किलोग्रॅम, दुधात मिक्स करण्यासाठी स्प्रे प्राईड पावडर 4.5 किलोग्रॅम आदी मिश्रणाचे साहित्यासह आढळून आला. या सर्व मिश्रणाचे नमुने तपासणीकामी ताब्यात घेण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे किशोर आत्माराम साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन धरणगांव पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संदीप पाटील, धरणगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. सुनील पवार यांच्यासह पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वल्टे, संतोष पवार, पो.हे.कॉ.विष्णू बिऱ्हाडे, पो.हे.कॉ. दिपक माळी, पो.हे.कॉ. रवीद्र पाटील, पो.हे.कॉ.विलेश सोनवणे, पो. कॉ. बाबासाहेब पाटील, मपोहेकॉ वर्षा गायकवाड यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास धरणगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.







