एमआयडीसीत घरफोडी करणारे अट्टल चोरटे २४ तासांत जेरबंद

On: August 6, 2025 5:51 PM

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत कंपनीत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना गजाआड केले. जळगाव शहरातील एमआयडीसी E सेक्टरमधील ‘आनंद बॅटरी’ कंपनीतून ३२५ किलो वजनाच्या, ९७,०००० रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्स चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही चोरी ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून १ ऑगस्ट सकाळी ८.०० वाजेच्या दरम्यान घडली. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत असताना जळगावातील अट्टल गुन्हेगार मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मोहसिनला अटक करून विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचे साथीदार इम्रान सैय्यद (रा. नशिराबाद), रहिम उर्फ बाबल्या रशिद खान, व मेहमुद उर्फ चिनी शेख यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले.

इम्रान सैय्यदलाही ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीची कबुली मिळाली आहे. पोलिसांनी ३२७ किलो वजनाच्या शिसे प्लेट्स (१५ नग) व चोरीसाठी वापरलेले तीनचाकी रिक्षा (किंमत ₹२,००,०००) असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यातील मोहसिन उर्फ शेमड्या आणि इम्रान सैय्यद यांना अटक करून २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment