लिफ्टच्या बहाण्याने चोरी –  दोघे अट्टल चोरटे अटकेत

On: August 6, 2025 7:43 PM

जळगाव – वृद्ध नागरिकास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने २५,००० रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता, ७० वर्षीय वृद्ध इसम कालीका माता मंदिराजवळ महामार्गावरून पायी जात असताना, त्यांना अज्ञात चारचाकी वाहनाने लिफ्ट देण्याचा बहाणा केला. वाहनातील दोन इसमांनी “पुढील चौकात सोडतो” असे सांगून, मागील सीट खराब असल्याचे कारण देत वृद्धास पुढे बसवले. काही अंतर गेल्यावर त्यांनी वृद्धास खाली उतरवले. मात्र नंतर वृद्धाच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातील २५,००० रुपये रोख रक्कम चोरीस गेले आहे. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले. पो.उ.नि. राहुल तायडे, पो.उ.नि. चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी व पोहेकॉ किरण चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातम्यांद्वारे संशयितांची ओळख पटवली. गुन्ह्याच्या तपासात अर्शद शेख रज्जाक शेख (३२), अताउर रेहमान मोहम्मद शकील (३५) (दोघेही रा. गेंदालाल मिल, जळगाव) यांना गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेली २५,००० रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे

दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उप अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment