जळगाव : जळगाव, भुसावळ, फैजपूर आणि पाचोरा या चार उप विभागांना नवे डीवायएसपी लाभले आहेत. नितीन गणापुरे यांची जळगाव, अनिल बडगुजर यांची फैजपूर, बापू रोहोम यांची पाचोरा डीवायएसपी पदी नियुक्ती झाली आहे. जळगाव उप विभागाचे संदीप गावीत यांच्या हाती भुसावळ उप विभागाचा कारभार आला आहे.
जळगाव उप विभागाचे डिवायएसपी संदीप गावीत यांच्या जागी मालेगाव ग्रामीणचे डिवायएसपी नितीन गणापुरे यांची वर्णी लागली आहे. याच जागेवर काही दिवसांपुर्वी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांची पदोन्नतीवर नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती.
गेल्या काही महिन्यापासून फैजपूर उप विभागाचा अस्थायी कारभार आता स्थायी होणार आहे. येथे अनिल बडगुजर यांना स्थान मिळाले आहे. आयपीएस अन्नपुर्णा सिंग यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी काही दिवस भुसावळ उप विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी अतिरिक्त कारभार सांभाळला. त्यानंतर काही दिवस चोपडा उप विभागाचे अण्णासाहेब घोलप यांनी अतिरिक्त कारभार पाहिला. पुर्ण वेळ कार्यभार नसल्याने फैजपूर उप विभागाकडे कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र आता फैजपूर उप विभागाची कमान अनिल बडगुजर यांच्या हाती आली आहे. अनिल बडगुजर आणि बापू रोहोम यांनी यापुर्वी जळगाव जिल्ह्यात कामकाज केले असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे.







