फायरचा झाला थरार, सराईत झाला फरार – बारा तासात पोलिसांनी पकडला गुन्हेगार !!

On: August 10, 2025 9:25 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मित्राला पिस्टल दाखवण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून चुकून गोळी सुटल्याची घटना 7 ऑगस्टच्या रात्री जळगाव शहरातील कोल्हे नगर भागात घडली होती. या घटनेत सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. या घटनेनंतर पिस्टल बाळगणारा तरुण व त्याच्या अल्पवयीन साथीदारासह फरार झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस कारवाईत अवैध पिस्टल बाळगणा-या सराईत गुन्हेगारास पिस्टलसह रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे.

राजदीप राजू सपकाळे आणि सरला सपकाळे हे दाम्पत्य जळगाव शहरातील कोल्हे नगर भागात भाड्याच्या घरात राहतात. एमआयडीसी भागात नाश्त्याची गाडी लावून त्यांचा चरितार्थ चालतो. बुधवार 6 ऑगस्टच्या रात्री साडेबारा वाजता सपकाळे दाम्पत्य जेवण करत होते. त्यावेळी त्यांच्या परिचयातील दिपक तरटे हा त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासह सपकाळे दाम्पत्याच्या घरी आला.  

यावेळी गप्पांच्या ओघात दीपक तरटे याने त्याच्या कब्जातील गावठी पिस्टल राजदीप सपकाळे यांना दाखवली. याचवेळी दिपक तरटे याच्याकडून मिस फायरचा प्रकार झाला. रात्री स्मशान शांतता असतांना दोन वाजेच्या सुमारास पिस्टलमधून चुकून गोळी सुटली. सुटलेली गोळी घराच्या माळ्याजवळ भिंतीला जावून धडकली. या घटनेत मोठा आवाज झाला आणि भिंतीला मोठे भोक पडले. या प्रकारामुळे गांगरलेल्या राजदीप सपकाळे यांच्या पत्नीने दिपक तरटे यास खडसावले. शाब्दिक वादानंतर पिस्टल बाळगणारा दिपक तरटे त्याच्या साथीदारासह निघून गेला.   

दुस-या दिवशी राजदीप सपकाळे नेहमीप्रमाणे नाश्त्याची गाडी लावण्यासाठी निघून गेले. त्यानंतर हा प्रकार त्यांची पत्नी सरला सपकाळे यांनी एका परिचिताला कथन केली. त्या परिचिताने ही माहिती रामानंद नगर पोलिस स्टेशनला कळवली. माहिती समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांना घटनास्थळी फायर झालेल्या राऊंडची रिकामी पुंगळी आढळून आली.

या घटने प्रकरणी सरला सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी जळगांव) याच्याविरुद्ध  रामानंद नगर पोलिस स्टेशनला आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या अभिलेख्यावरील फरार दिपक तरटे याच्याविरुद्ध यापुर्वी चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या शोधार्थ पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकातील फौजदार सचिन रणशेवरे, पोहेकॉ सुधाकर अंभारे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनाद सुर्यवंशी, योगेश बारी, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, गोविंदा पाटील यांचे एक पथक तयार केले.

गुप्त बातमीदार आणि तांत्रीक तपासाच्या आधारे सापळा रचून दिपक तरटे यास रामेश्वर कॉलनी परीसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला 10 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पंधरा हजार रुपये किमतीचे अवैध पिस्टल हस्तगत करण्यात आले. त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याचे तपासात उघडकीस आले. घटना घडली त्या घरमालकाने घर भाड्याने दिले असल्याची माहिती पोलिस स्टेशनला कळवली नसल्याने त्याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment