अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणाऱ्या मिमी चक्रवर्ती हिची छेड काढणा-या कोलकाता येथील टॅक्सी ड्रायव्हरला महागात पडले आहे. या टॅक्सी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. मिमी चक्रवर्ती या अभिनेत्री व तृणमुल कॉग्रेसच्या खासदार आहेत.
टॅक्सी ड्रायव्हरने आपल्याला अश्लील कमेंट्स केल्याचा आरोप मिमी चक्रवर्ती यांनी केला आहे. सोमवारी दुपारी कोलकातामधील बालीगंज येथे घडलेल्या प्रकरणी गरियाहाट पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिमी चक्रवर्ती जिममधून परत येत असतांना टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना बघून अश्लील कमेंट्स केल्या. मिमी चक्रवर्ती यांची गाडी ओव्हरटेक केल्यानंतर सदर टॅक्सी ड्रायव्हरने पुन्हा कमेंट्स केली. त्यामुळे चिडलेल्या मिमी यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. मिमी चक्रवर्ती यांनी केलेल्या आरोपानुसार त्या आपल्या कार मधे होत्या. त्यांच्या कारच्या शेजारी असलेला एक टॅक्सी ड्रायव्हर त्यांना अश्लील इशारे करत होता. सुरुवातीला मिमी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने कारला ओव्हरटेक केले. त्याच्या या वर्तनाकडे दुर्लक्ष केले तर दुसरी एखादी महिला जी त्याच्या टॅक्सीत बसेल ती त्याच्या अत्याचाराला बळी पडेल असे मनात आल्यामुळे मिमी यांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
लक्ष्मण यादव असे अटकेतील टॅक्सी चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध भा.द.वि.कलम ३४५, ३५४ अ, ३५४ ड, ५०९ सह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली. मिमी चक्रवर्ती या तृणमुल काँग्रेसच्या खासदार असून बंगाली चित्रपटातील टॉपच्या अभिनेत्री आहेत. मार्च २०२० मध्ये लंडनमध्ये बाजी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना १४ दिवसांसाठी घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते.