जळगाव : चालु तिन कामांचे नऊ हजार आणि मागील 28 कामांचे सत्तर हजार अशा एकुण 79 हजाराच्या लाचेची सोलर फिटींग व्यावसायीकाकडे मागणी करणा-या महावितरणच्या सहायक अभियंत्यास जळगाव लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने 29 हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडले आहे. मनोज जगन्नाथ मोरे असे महावितरणच्या पाचोरा उप विभागातील वर्ग दोनच्या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने तिन प्रकरणांची ऑनलाईन पुर्तता केली होती. या तिन प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रत्येक कामाचे तिन हजार रुपयाप्रमाणे एकुण नऊ हजार आणि यापुर्वी काढून दिलेल्या 28 रिलीज ऑर्डरसह एकुण हिशेबाची वजाबाकी करुन 29 हजार रुपये स्विकारण्याची तयारी आणि मागणी लाचखोर अभियंत्याने सोलर फिटींग व्यावसायीकाकडे केली होती. यापुर्वी तिस हजार रुपयांची लाच दिल्यानंतर आता नव्याने लाच देण्याची व्यावसायीकाची तयारी नव्हती.
या लाच मागणी प्रकरणी व्यावसायीकाने जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुशंगाने महावितरण कार्यालयातच सापळा रचण्यात आला. लाचेची 29 हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना अभियंता मनोज मोरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या पथकातील सापळा व तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह पो.कॉ.राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.







