“द ब्रॅंड कॅफे”तून सुरु झाली मारहाण ग्रॅंड — जमावाने सुलेमानला दाखवला मृत्युचा “ब्रॅंड”

On: August 16, 2025 9:49 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे तालुक्याचे ठिकाण असून राज्याचे प्रसिद्ध मंत्री गिरीष महाजन या तालुक्याचे भाजपचे आमदार आहेत. याच जामनेर तालुक्यात बेटावद खुर्द नावाचे एक गाव आहे. बेटावद खुर्द या गावी सुलेमान रहिमखा पठाण हा विस वर्ष वयाचा तरुण रहात होता. विस वर्ष वयाचा एकदम तरुण असलेला सुलेमान पठाण पोलिस होण्याची स्वप्ने बघत होता.

सुलेमान रहात असलेल्या बेटावद खुर्द या गावाच्या जवळपास परिसरात एक अल्पवयीन मुलगी रहात होती. ती कन्या शैक्षणीक कामानिमीत्त जामनेर येथे बसने ये – जा करत होती असे सांगितले जाते. ती ज्या बसने जामनेरला जात होती ती बस सुलेमानच्या बेटावद खुर्द या गावाहून मार्गक्रमण करत होती असे देखील म्हटले जाते. त्याच बसने सुलेमान देखील जामनेरला जात असल्याचे सांगितले जाते. या बस प्रवासात सुलेमान आणि त्या मुलीचे संभाषण होत असल्याचे बोलले जाते. संपर्कातून संभाषण व संभाषणातून दोघात प्रेम झाल्याचे देखील बोलले जाते.

ग्रामीण भागात एक तरुण एका तरुणीसोबत अथवा कुमारवयीन मुलीसोबत बोलला म्हणजे चर्चेला उधान येते हे तरुण तरुणींना सांगण्याची गरज नसते. त्यामुळे एकमेकांवर प्रेम व्यक्त करणारे तरुण तरुणी तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी कामाचे निमीत्त करुन येतात आणि चोरुन लपून भेटतात हे ज्याला समजते त्याला माहित असते. याच विषयाला हेरुन तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अशा तरुण जोडप्यांना तासनतास एकांतात  बसण्यासाठी, अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा व्यवसाय थाटला जातो. व्यावसायीकाची आणि ग्राहकाची गरज यातून व्यवसायाचा शोध लागतो. कॅफे या गोंडस नावाखाली जोडप्यांना तासनतास बसण्यासाठी, प्रसंगी अश्लिल चाळे करण्याची मुभा देण्याचा व्यवसाय थाटला जातो. असे कॅफे कुठे आहेत? त्याठिकाणी किती पैसे द्यावे लागतात याचा प्रेमीयुगुल शोध लावतात. अशा कॅफेची माऊथ पब्लिसीटी अर्थात मोफत जाहिरात संबंधीतांमधे झालेली असते.

जामनेर या तालुक्याच्या ठिकाणी असाच “द ब्रॅंड कॅफे” नावाचा कॅफे असल्याची माहिती सुलेमानला होती. “द ब्रॅंड कॅफे” मधे त्याने त्या कन्येला सोबत घेऊन जाण्याचे नियोजन केले. तिने देखील त्याच्या प्रस्तावाला होकार देत त्या “द ब्रॅंड कॅफे” मधे जाण्याचे मनाशी निश्चित केले. ठरल्यानुसार 11 ऑगस्टचा दिवस मुकर्रर झाला. सध्या पोलिस भरतीचे अर्ज भरण्याचे कोणतेही वातावरण नसल्याचे समजते. मात्र पोलिस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेत जात असल्याचे घरी सांगून तो जामनेरला “द ब्रॅंड कॅफे”तील तोकड्या जागेत त्या मुलीसोबत बसण्यासाठी गेला.

सुलेमान सोबत भिन्न धर्माची आपल्या तालुक्यातील अल्पवयीन मुलगी “द ब्रॅंड कॅफे”त असल्याची माहिती जामनेर, बेटावद आणि वाकी येथील काही तरुणांना समजली. आपल्या धर्माची मुलगी परधर्माच्या तरुणासोबत कॅफेत असल्याची माहिती कळताच या तरुणांची माथी भडकली. या तरुणांच्या जमावाने तात्काळ कॅफेमधे जावून सुलेमानला पशुप्रमाणे बाहेर ओढून काढले. कॅफेच्या बाहेर सुलेमानला आणताच तरुणांच्या जमावाने त्याला अतिशय कृर व अमानुष पद्धतीने मारहाण सुरु केली. सुलेमानच्या मोबाईलमधे त्या अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो असल्याचा जमावाला संशय होता असे म्हटले जाते. जमावाने सुलेमानचा मोबाईल हिसकावून घेत त्याची मोडतोड केली. चारचाकी वाहनात बसवून त्याला निर्मनुष्य जागी नेण्यात आले. त्याठिकाणी त्याला लाथा बुक्क्यांनी, लाठ्या काठ्यांनी, लोखंडी रॉडने अगदी अमानुषपणे निर्दयी होत मारहाण करण्यात आली. अंगात हैवान संचारल्यागत जमावातील तरुण सुलेमानला मारहाण करत होते. अंगावर जागोजागी त्याला एवढी मारहाण झाली की त्याला उभे राहणे, चालणे, बसणे, धावणे कठीण झाले. तो गयावया करत होता. जीवाची भिक मागत होता. मात्र जमावातील तरुणांना त्याची दया आली नाही. राक्षसाप्रमाणे प्रत्येक जण सुलेमानला मारहाण करत होता. त्यानंतर त्याला तो रहात असलेल्या बेटावद खुर्द या गावी नेण्यात आले. बेटावद खुर्द या गावाच्या बस स्थानकावर त्याला वाहनातून बाहेर काढून पुन्हा मारहाण करण्यात आली. 

आपल्या मुलाला जमावाकडून अमानुषपणे, निर्दयीपणे, बेदम मारहाण होत असल्याची माहिती त्याचे वडील रहीमखा बनेखा पठाण यांना ते शेतात काम करत असतांना दुपारी साडेचार वाजता समजली. आपल्या काळजाच्या तुकड्याला अमानुषपणे मारहाण होत असल्याचे समजताच रहीमखा पठाण घटनास्थळी आले. त्याचवेळी रहीमखा यांची पत्नी तबस्सुम खा, मुलगी मुस्कान हे देखील बेटावद खुर्द बस स्थानकावर आले. सुलेमान हा केवळ अंतर्वस्त्रावर जमीनीवर पडला असल्याचे त्यांना दिसले. आठ ते दहा मारेकरी त्याच्या अंगावर मिळेल त्या ठिकाणी त्याला लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. सुलेमानच्या अंगी अजिबात त्राण नसल्यामुळे केवळ मार खाणे आणि जीवाच्या आकांताने तळमळत पडणे एवढेच त्याच्या नशिबी आले होते.

सुलेमानच्या आई वडीलांनी काही मारेक-यांना ओळखले. त्यांनी सर्व मारेक-यांना विनवणी करत सुलेमानला मारु नका असे सांगितले. मात्र कुणीही त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुलेमानचे वडील रहीमखा, त्यांची पत्नी व मुलगी मारेक-यांना वारंवार विनवणी करत होते. मात्र मारेक-यांनी त्यांच्या अंगावर देखील धाव घेत त्यांना शिवीगाळ व धमकी देत मारहाण सुरु केली. काही वेळातच या घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरली. या माहितीच्या आधारे गावकरी जमा होण्यास सुरुवात झाली. गावकरी जमा होत असल्याचे बघून सर्व मारेकरी जखमी व मरणासन्न सुलेमानला तशाच अवस्थेत सोडून पळून गेले. रहिमखा पठाण व त्यांची पत्नी यांच्यासह इतर नातेवाईकांनी अंगात केवळ अंडरवेयर असलेल्या सुलेमानला कसेबसे घरी आणले. त्याला तशाच जखमी अवस्थेत कसेबसे कपडे घातले. त्याला विचारपुस केली असता त्याने त्याला झालेल्या मारहाणीचा घटनाक्रम कथन केला.

त्याची मरणासन्न जखमी अवस्था बघून त्याला वैद्यकीय उपचारार्थ जामनेर उप जिल्हा रुग्णालयात खासगी वाहनाने नेण्यात आले. मात्र तो मरण पावला होता. त्याची प्राणज्योत घरी पोहोचल्यावर मालवली होती. तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषित केले. सुलेमान मरण पावल्याचे समजताच मुस्लिम बांधवांचा समुदाय जामनेर उप जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात दाखल झाला. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार आपले सहकारी सचिन महाजन तसेच इतर सहका-यांसह रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय परिसरातील वातावरण हाताबाहेर जाण्यापुर्वीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आदी दाखल झाले.

सुलेमान पठाण याच्या मृत्युप्रकरणी त्याचे वडील रहिमखा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 288/25 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 103 (2), 140, 189 (2), 191 (2), 191 (3), 190, 118 (1), 115 (2), 352, 351 (2) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. दोषींना तातडीने अटक करा या मागणीसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या बाहेर नातेवाईकांचा मोठा जमाव जमला. आजुबाजूच्या गावातील लोक देखील जामनेर पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले. काही हुल्लडबाजांनी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. रेड्डी यांनी तातडीने उपस्थितांचे शंका निरसन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करत पोलिसांचे पथक अगोदरच संशयीतांच्या मागावर रवाना झाले होते. जवळपास दहा संशयितांपैकी दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रात्री उशीरा पत्रकारांना दिली. इतर संशयितांच्या शोधासाठी एलसीबीसह विविध पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी जनतेला केले.

दुस-या दिवशी मयत सुलेमान याचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शव विच्छेदनकामी नेण्यात आला. इन कॅमेरा शव विच्छेदनाच्या वेळी नातेवाईक व परिचितांनी मोठी गर्दी केली. यावेळी जळगावचे अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी जमावाची समजुत घालत मारेक-यांना अटक केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर हजर होते. शव विच्छेदनानंतर मृतदेह जामनेर येथे आणण्यात आला.   

मृतदेह असलेली शववाहीका जामनेर येथे रस्त्यावर अडवून मारेक-यांविरुद्ध मकोका लावावा, त्यांना अटक करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जामनेर येथील बाजारपेठ बंद करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून रस्ता मोकळा केला. शववाहिका बेटावदकडे नेण्यात आल्यानंतर सुलेमानवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलेमान याच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांची नावे निष्पन्न झाली असून चौघांना अटक केली असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. मारेक-यांविरुद्ध मकोकाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी होत असल्याचे बघून कराळे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की मकोका लावण्यासाठी विशिष्ट निकष असतात. पैशाची मागणी, संशयित हिस्ट्रीशीटर आहे का? यासह वेगवेगळ्या बाजू तपासल्या जातात. या गुन्ह्यातही तशी चौकशी करुन योग्य ती कारवाई होईल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकुण आठ मारेक-यांना अटक करण्यात आली.

कॅफेच्या नावाखाली प्रेमी युगलांना तासनतास बसण्यासाठी,  अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या अनधिकृत कॅफेवर कारवाईचा बडगा पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी नगरपरिषद अधिका-यांच्या मदतीने उगारला. ज्या कॅफेतून या मारहाणीला सुरुवात झाली तो “द ब्रॅंड कॅफे” सिल करण्यात आला. जामनेर शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संकुलांतील 8 ते 10 कॅफेवर धाड टाकून त्यातील साहित्याची मोडतोड करुन ते साहित्य जप्त करण्यात आले. काही कॅफेमध्ये पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. शहरातील कॅफे सेंटरमध्ये अश्लील प्रकार होत असल्याचा आरोप सातत्याने सुरु होता. सामाजिक कार्यकर्ता अविनाश बोरसे यांनी पोलिसाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या दुकानमालकांना नोटीस बजावणार असल्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी माध्यमांना सांगितले. नगर परिषदेचे बांधकाम अभियंता अमर राऊत, स्वच्छता निरीक्षक अमित आहेर, विजय सपकाळे यांनी धाडीतील कॅफेची तपासणी केली. खासगी क्लासेस, शाळा व महाविद्यालय परिसरात अशा प्रकारचे हे कॅफे असतात हे या घटनेच्या निमीत्ताने पुन्हा एकवेळा स्पष्ट झाले. काही कॅफे नियमानुसार असल्याचे देखील पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना आढळून आले. या कॅफेमधे कुटूंबासह नागरिक जात असल्याचे देखील दिसून आले.

कारवाई करण्यात आलेल्या सर्वच कॅफेमध्ये बसण्यासाठी अगदी छोटी जागा होती. सर्वच कॅफेत वरच्या मजल्यावर छोटे-छोटे टेबल लावून पडदे किंवा पार्टीशन लावण्यात आले असल्याचे कारवाई दरम्यान दिसून आले. पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, संदेश किर्तीकर, चंद्रकांत पाटील, दीपक जाधव, योगेश पाटील, अमोल पाटील, महेंद्र राठोड, नंदलाल परदेशी, प्रीतम बरकले, चंद्रशेखर नाईक तसेच नगरपालिकेचे अमर राऊत, अमित आहेर, विजय सपकाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या कारवाईनंतर जळगाव शहरात देखील अशाच प्रकारची “कॅफे कॉलेज कट्टा” नावाच्या एका कॅफेवर छापा कारवाई करण्यात आली. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. “कॅफे कॉलेज कट्टा” नावाच्या या कॅफेत सात महाविद्यालयीन तरुण तरुणींना पकडण्यात आली. या सात महाविद्यालयीन जोडप्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. तसेच कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार व एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सुलेमान रहीमखा पठाण याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. इम्तीयाज जलील यांनी सुलेमानच्या कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांचे सांत्वन केले. एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी देखील या घटनेतील पिडीत परिवाराची आपल्या शिष्टमंडळासह भेट घेत सांत्वन केले. या घटनेला चार दिवस उलटून देखील मंत्री महोदय गिरीष महाजन अथवा त्यांच्या नजीकच्या कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंचानी पीडीत परीवाराची भेट घेतली नाही अथवा त्यांचे सांत्वन केले नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

या घटनेच्या माध्यमातून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यात पालकांचे आपल्या मुला मुलींवर लक्ष नसणे, खासगी क्लासेस व महाविद्यालय परिसरातील कॅफेच्या गोंडस नावाखाली अश्लिलतेसाठी जागा भाड्याने देण्याचा अनधिकृत व्यवसाय, एखाद्या तरुणाची चुक असली तरी कायदा हाती घेत त्याला मरणाच्या दारात ढकलण्याइतपत अमानुष अर्थात रानटी  मारहाण, आपल्याच मतदार संघात एवढा मोठा अनुचीत प्रकार घडून देखील मंत्री महोदय गिरीष महाजन यांनी एक शब्द देखील न बोलणे व त्यांनी पिडीत परिवाराची भेट न घेणे. या घटनेचा अधिक तपास जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार व त्यांचे सहकारी करत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस योग्य रितीने करतील. मात्र या घटनेचे राजकारण करु नये अशी अपेक्षा या निमीत्ताने केली जात आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment