जळगाव : जळगाव पिपल्स बॅंकेने फसवणूक केल्याच्या कथित आरोपाखाली दाखल तक्रारीवर चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होण्यासाठी सागर ओतारी यांचे 14 ऑगस्टपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणाला चार दिवस उलटले आहेत. मात्र गुन्हा दाखल होण्याच्या मागणीवर उपोषणकर्ते सागर ओतारी ठाम असल्याचे म्हटले जात आहे. या उपोषणाला चोपडा शहरातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या उपोषण स्थळाला भेट दिली.
चोपडा येथील उपोषणकर्ते सागर काशीनाथ ओतारी यांचे शौर्य मराठी नावाचे न्युज चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी रिझर्व बॅंकेच्या परिपत्रकाचा आधार घेत पिपल्स बॅंकेसंदर्भात एक बातमी प्रसारित केली होती. त्या बातमीचा राग आल्याने आपल्याविरुद्ध फसवणूकीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याची सागर ओतारी यांची तक्रार आहे. खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी कर्ज प्रकरणाच्या दस्तावेजांवर आपल्या बनावट सह्या करुन आपल्या विरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला 15 जानेवारी 2020 रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे 16 जानेवारी 2020 रोजी आपल्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सागर ओतारी यांचे म्हणणे आहे. जळगाव येथील प्रथम वर्ग दंडाधिका-यांच्या न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला प्रलंबीत आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले. या खटल्याच्या साक्षांकित कागदपत्रांचे परिक्षण केले असता आपल्या सह्या खोट्या असल्याचे व आपण कोणतीही कर्ज मागणी केली नसल्याचे आपल्याला समजून आल्याचे सागर ओतारी यांचे म्हणणे आहे.
उपोषणकर्ते सागर ओतारी यांनी 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन ला दाखल केलेल्या फसवणूकीच्या तक्रारीवर फिर्याद दाखल होऊ नये याबाबत जळगाव पिपल्स बॅंकेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन क्र. 798/2025 दाखल केली होती. त्यावर दि. 24 जून 2025 रोजी सुनावणी झाली असून ती याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे सागर ओतारी यांचा गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.







