जळगाव : भाऊबंदकीच्या वादातून मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा या गावी झालेल्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यु झाला आहे. या घटनेतील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री लालगोटा या गावी झालेल्या जमावाच्या हल्ल्यात राणा मनमौजदार पवार असे मृत्युमुखी पडलेल्या प्रौढाचे नाव आहे. भाऊबंदकीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. कु-हाड, लोखंडी आसारी, रॉड व लाठ्या काठ्यांचा या घटनेत वापर झाला होता.
मयत राणा पवार याची पत्नी मिनाक्षी राणा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुरुदीप जिलिसबाबू पवार, राजेंद्रबाबू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार, दिपक जिलीसबाबू पवार, जिलीसबाबू कोनानी पवार, शक्तीकपूर सिगरेटबाबु पवार, शिवकपूर शक्तीकपूर पवार, लताबाई शक्तीकपूर पवार, अनुलेखा दिपक पवार व अनोळखी तिघे अशांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गुरुदीप पवार, राजेंद्रबाबु पवार, क्रिश पवार, लताबाई पवार व अनुलेखा पवार यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ पुढील तपास करत आहेत.







