जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

On: August 19, 2025 2:54 PM

जळगाव दि. १९ प्रतिनिधी – जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूती मधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी  जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे व अन्य शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये जळगाव तालुक्यातील २८ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने ही स्पर्धा जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्टस अकॅडमी द्वारे आयोजित केले होती. स्पर्धेच्या प्रथम स्थान, द्वितीय स्थान व तृतीय स्थान प्राप्त झालेल्या संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड व अनुभूती स्कूल द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत व कांस्यपदक देण्यात आले. अंतिम सामन्यांपर्यंत चुरसीच्या झालेल्या या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलला १४ वर्षा खालील मुलांच्या संघात, १९ वर्षा खालील मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रथम स्थान प्राप्त करीत सुवर्ण पदक मिळविले तर १७ वर्षा खालील मुलांच्या संघाने द्वितीय स्थान मिळविले त्यामुळे त्यांना रजत पदकाने गौरविण्यात आले.

मुलींच्या १७ वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक मिळवित कास्य पदक प्राप्त केले. सर्व विजयी खेळाडूंना  पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, मंजूषा भिडे, कुलदीप पांडे, मनिषा देशमूख, श्री. राहूल, किशोर सिंह, दिपीका ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनुभूती स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचे कौतूक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह व दीपिका ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून जाजिब शेख, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, पूनम ठाकूर, श्री. सोमाणी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी समीर शेख, विकास बारी, शुभम पाटील यांच्यासह अनुभूती स्कूल व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment