जळगाव : शेतातील पिकाचे रानडुकरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कुंपनात सोडलेल्या विज प्रवाहाने एकाच मजुर परिवारातील पाच जणांचा बळी गेल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून दिड वर्षाची दुर्गा विकास पावरा ही बालिका बचावली असली तरी तिचे मातृ-पितृछत्र मात्र हरपले आहे.
विकास रामलाल पावरा (35), त्याची पत्नी सुमन (30), मुले पवन (4), कवल (3) आणि सुमनची आई (सर्व रा. ओसरणी, जिल्हा बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. शेतमालक बंडू युवराज पाटील यांनी शेताच्या कुंपनात विज प्रवाह सोडण्यासाठी केलेली विज जोडणी बेकायदा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे विज अधिका-यांनी म्हटले आहे. ही वीज जोडणी बेकायदा असल्यामुळे मरण पावलेल्या पावरा परिवारास भरपाई मिळेल अथवा नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.







