जळगावची गायत्री पाटील होती का साधी-भोळी? — बनावट लग्न लावणा-यांची उघडकीस आली टोळी !!

On: August 23, 2025 7:09 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली गायत्री पाटील ही जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात रहात होती. जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर हा श्रमीक लोकवस्तीचा परिसर म्हटला जातो. या भागातील बहुसंख्य रहिवासी श्रमजीवी गटातील आहेत. गायत्रीचे वडील भैय्या पाटील हे मोलमजुरी करणारे सरळमार्गी गृहस्थ होते. भैय्या पाटील हे आपली पत्नी मनिषा, मुलगी गायत्री आणि मुलगा धिरज अशांसह हरिविठ्ठल नगर भागात रहात होते. “हम दो – हमारे दो” असे चौकोनी कुटूंब लाभलेले भैय्या पाटील हे कुणाच्या देण्याघेण्यात नव्हते. आपण भले आणि आपले काम भले असे त्यांचे वागणे आणि राहणे होते. त्यांची पत्नी मनिषा पाटील ही चार ठिकाणी धुणीभांडी करुन परिवाराला हातभार लावत होती.

भैय्या पाटील आणी मनिषा पाटील या दाम्पत्याची बारावी पर्यंत शिकलेली अल्पवयीन मुलगी गायत्री तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. दिसायला देखणी असलेली गायत्री चंचल स्वभावाची आणि सोशल मिडीयावर अ‍ॅक्टिव्ह होती. ती अर्थार्जनाच्या शोधात होती. अर्थार्जनाच्या शोधात असलेली गायत्री चुकीच्या मित्र – मैत्रीणींच्या संपर्कात आली आणि एका हसत्या खेळत्या परिवाराची वाताहत झाली. एक हसते खेळते कुटूंब दुखा:च्या सागरात बुडाले आणी होत्याचे नव्हते झाले. भैय्या पाटील यांना आपली पोटची मुलगी गायत्री आणि पत्नी मनिषा या मायलेकींमुळे आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवावी लागली. गायत्री आणी तिची आई मनिषा पाटील या दोघा मायलेकींसह अनेक जण कसे गजाआड झाले? गायत्री आणि तिची आई मनिषा यांच्या एका चुकीने अनेक दुर्दैवी घटनांचा जन्म झाला. दुर्दैवी घटनांना कसे आमंत्रण मिळाले? या मायलेकींसह अनेक जण कसे संकटात सापडले? त्यांचे पाय कसे खोलवर रुतले? संबंधीत सर्वांची कशी बदनामी झाली? संबंधितांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान कसे झाले? या सर्व गोष्टी गायत्री पाटील प्रकरणामुळे समाजाला दिसून आल्या. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृतांत पुढीलप्रमाणे…

डिसेंबर 2023 चा तो काळ होता. या कालावधीत गायत्री सोळा – सतरा वर्षाची होती. मुलींच्या बाबतीत सोळावे वर्ष धोक्याचे म्हटले जाते. या वयात मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जाणकार बदमाश अल्लड वयातील सोळा वर्षाच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा स्वार्थी हेतू साधण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी पालकांचे आपल्या मुलींवर जातीने लक्ष असणे फार गरजेचे असते. मात्र या धकाधकीच्या जीवनात काही पालकांना आपला रोजगार सांभाळण्याच्या स्पर्धेत आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्यायला वेळ कमी पडतो. याचा गैरफायदा मुले मुली आणि बदमाश लोक घेतात.

या कालावधीत गायत्री पाटील हिची एका मुलीसोबत ओळख झाली. त्या मुलीसोबत गायत्रीची चांगली मैत्री जमली. गायत्रीच्या त्या मैत्रीणीची आई गुन्हेगारी वृत्तीची होती. मिना बोरसे असे त्या मैत्रीणीच्या आईचे नाव. गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर बसलेल्या मिना बोरसे हिच्या मुलीसोबत गायत्रीची मैत्री जमली होती. त्यावेळी मिना बोरसे ही मध्य प्रदेशातील खंडवा जेलमधे एका गुन्ह्यात गजाआड होती. मिना बोरसे जेलमधे असतांना तिची मुलगी, गायत्री आणि इतर मित्र मैत्रीणी एकत्र जमत होते.

गायत्रीची बारावीची परिक्षा आटोपली होती. पॉकेटमनीसह घरातील आर्थिक अडचण दुर करण्यासाठी कुठे काही काम मिळेल का याचा गायत्री तिच्या एका मैत्रीणीसह शोध घेत होती. गेल्यावर्षी सन 2024 च्या अखेरीस गायत्री एका दवाखान्यात काम मिळते का याचा शोध घेत असतांना तिच्या एका मैत्रीणीच्या माध्यमातून तिची ओळख मिनाक्षी जैन या महिलेसोबत झाली. मिनाक्षी जैन ही देखील गुन्हेगारी वृत्तीची होती. मिनाक्षी जैन हिच्यासोबत ओळख झाल्यापासून गायत्री तिच्या संपर्कात होती. कुठे काही काम मिळेल का? अशी गायत्री तिला विचारणा करत होती. दरम्यान जानेवारी 2025 मधे मिना बोरसे ही खंडवा जेलमधून सुटून बाहेर आली.

काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मिनाक्षी जैन हिने गायत्री पाटील हिस जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ भेटण्यासाठी बोलावले. ठरल्यानुसार गायत्री पाटील ही तिची परिचीत मिनाक्षी जैन हिच्या भेटीला गेली. या भेटीत मिनाक्षी जैन हिने गायत्रीला एक प्लॅन सांगून तिच्या टोळीत सामिल होण्यास सांगितले. बनावट लग्न लावून पैसे कमावणारी आपली टोळी असल्याचे मिनाक्षी जैन हिने गायत्री पाटील हिला सांगितले. बनावट लग्नानंतर मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतले जातात. तु आमच्या टोळीत सामील झाली तर तुला देखील घसघशीत पैसे मिळतील असे मिनाक्षी जैन हिने गायत्रीला आमिष दाखवले. अल्पवयीन गायत्रीला मोहाच्या जाळ्यात टाकून तिला विचार करण्यास भाग पाडण्याकामी मिनाक्षी जैन सफल झाली होती. या वयात सारासार विचार करण्याची शक्ती अल्पवयीन मुलींजवळ नसते हे बदमाशांना चांगल्या प्रकारे माहिती असते. त्याचाच गैरफायदा मिनाक्षी जैन सारख्या महिला घेतात. मोह हे दुखा:चे कारण असते हे समजण्याइतपत गायत्रीचे वय नव्हते. त्यामुळे ती मोहाच्या जाळ्यात फसली.  

बनावट लग्न लावून देणा-या आपल्या टोळीत अर्थात गृपमधे  मीना बोरसे, सुजाता ठाकुर, मिनाक्षी जैन, रमाबाई, अक्षय जोशी एवढे सदस्य असल्याचे तिने गायत्रीला सांगितले. आम्ही सर्व गृप मेंबर आलेले पैसे वाटून घेतो हे मिनाक्षी जैन हिने गायत्रीला वारंवार सांगून तिला भुरळ पाडली. तुला पैशांची गरज असेल तर तु आमच्या गृपमधे सामिल हो, प्रत्येकाला पैशांची गरज असते, तुला तुझा वाटा मिळेल असे मिनाक्षी जैन हिने पुन्हा एकदा सांगितल्याने गायत्री हो – नाही, हो – नाही करत तयार झाली. तिने मिनाक्षी जैन हिला होकार दिला.

गायत्रीचा होकार मिळताच मिनाक्षी जैन हिने तिला कोल्हापूर येथील एका मुलाचा फोटो दाखवला. या मुलासोबत तुला लग्न करायचे आहे. पार्टी लग्नासाठी तयार असून मुलीच्या शोधात आहे. या कामातून चांगले पैसे मिळतील असे मिनाक्षी जैन हिने गायत्रीला सांगितले. या मुलासोबत तुला लग्न करायचे आहे. आम्ही सांगू तितक्या दिवस तुला लग्नानंतर या मुलाकडे रहावे लागेल. आम्ही सांगू तसे तसे तुला करावे लागेल असा प्रस्ताव मिनाक्षी जैन हिने गायत्रीपुढे ठेवला.

गायत्रीने होकार दिल्यानंतर तिला तिच्या आईची चिंता सतावू लागली. आता घरी आई मनिषा पाटील हिला काय सांगू असा गायत्रीला प्रश्न पडला. तिने मिनाक्षी जैन हिला तिच्या मनाची घालमेल आणि समस्या कथन केली. बदमाश सुत्रधार मिनाक्षी जैन हिने त्यावर देखील उपाय शोधला होता. मी आपल्या गृपमधील रमाबाई नावाच्या महिलेला तुझ्या घरी तुझ्या आईची भेट घेण्यासाठी पाठवेन. तुझ्या घरी येणारी रमाबाई सुशिल कनौजिया ही नाशिकची महिला तुझ्या आईला सांगेल की तुला नाशिक येथे कंपनीत काम मिळवून देणार आहे.  

ठरलेल्या प्लॅननुसार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजता गायत्रीचे वडील भैय्या पाटील कामाला घराबाहेर गेल्यानंतर रमाबाई आली. तिने गायत्रीची आई मनिषा पाटील हिची भेट घेतली. आपले नाव रमाबाई असून मी नाशिक येथील कंपनीत इंजीन आणि सायलेंसर घासण्याचे काम करते अशी रमाबाईने गायत्रीची आई, मनिषा पाटील हिला ओळख करुन दिली. मला त्या कंपनीत अठरा हजार रुपये महिना पगार मिळतो असे देखील आलेल्या रमाबाईने मनिषा पाटील हिला सांगितले. तुम्ही गायत्रीला आमच्यासोबत पाठवा मी तिला नाशिक येथे कंपनीत कामाला लावून देईन अशी रमाबाईने मनिषा पाटील हिस बतावणी केली.

आपल्या मुलीला रोजगार मिळणार या आशेने मनिषा पाटील हिने गायत्रीला रमाबाईसोबत पाठवण्यास होकार दिला. गायत्रीला नाशिक येथे कंपनीत कामासाठी पाठवले जात असल्याची माहिती मनिषा पाटील हिने पती भैय्या पाटील यांना दिली. गायत्री ताब्यात येताच रमाबाईने तिला आपल्या गृपमधील सुजाता ठाकुर हिच्याकडे नेले. सुजाता ठाकुर हिच्या घरी टोळीची सुत्रधार मिनाक्षी  जैन हजरच होती. गायत्रीच्या जीवावर पैसे आणि सोन्याचे दागिने मिळवायचे हा बदमाश कंपनीचा प्लॅन अ‍ॅक्शन मोडवर घेण्यात आला. लागलीच पुढील प्लॅन गायत्रीला समजावून सांगण्यात आला. आता आपल्याला कोल्हापुर येथे जायचे आहे. उद्याच कोल्हापूर येथील तरुणासोबत तुझ्या लग्नाची बोलणी करुन लागलीच लग्न उरकून घेऊ असे गायत्रीला सांगण्यात आले. आता गायत्री ही बदमाशांच्या टोळीत सामील झाली होती. तिला सोबत घेत रमाबाई, सुजाता ठाकुर, मिनाक्षी दिनेश जैन, मीना सुरेश जैन, मीना बोरसे, अक्षय जोशी या सर्वांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कोल्हापूर गाठले.

कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातील तिस वर्ष वयाच्या सलून व्यावसायीक तरुणास लग्न करायचे होते. मात्र त्याला मुलगी मिळत नव्हती. या तरुणाचे जळगाव येथील नातेवाईक मिनाक्षी जैन हिच्या संपर्कात आले होते. त्या माध्यमातून गायत्रीचे स्थळ सुचवण्यात आले होते. गायत्रीला आई वडील नसून ती गरीब घरची असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझी असल्याची बतावणी मिनाक्षी जैन हिने केली होती. गायत्री पदवीधर असून तिने वयाची अठरा वर्ष पुर्ण केली असल्याची देखील बतावणी करण्यात आली. सर्व जण नकली नातेवाईक बनून लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते. अशा प्रकारे 3 फेब्रुवारी 2025 रोजी त्या सलुन व्यावसायिक तरुणाच्या घरी सर्वजण हजर झाले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे आणि गायत्रीचे रुप बघून मोहात पडलेल्या सलून व्यावसायीक तरुणाने तिच्यासोबत लग्न करण्यास लागलीच होकार दिला. त्यामुळे त्याचे नातेवाईक पुढील बोलणी करण्यास सरसावले.

समोरची पार्टी अर्थात सावज आपल्या फसवणूकीच्या टप्प्यात आल्याचे बघून सर्वांनी आम्ही लग्नाच्या तयारीने आलो आहोत असे सांगून त्याच दिवशी लग्न आटोपण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी आम्हाला दोन लाख रुपये रोख व मुलीला चार तोळ्याचे सोन्याचे दागीने करुन द्यावे लागतील असे लग्नाळू सलून व्यावसायिक तरुणाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. आम्हाला लग्नाची तयारी करण्यासाठी थोडा वेळ द्या असे सांगण्याचा प्रयत्न मुलाकडील नातेवाईकांनी केला. मात्र मिनाक्षी जैन आणि तिच्यासोबत आलेल्या बदमाशांनी त्यांना अधिक विचार करण्याची संधी दिली नाही. अखेर त्याच दिवशी लग्न करण्याची तयारी सुरु करण्यात आली. मुलाकडील नातेवाईकांनी काही रक्कम ऑनलाईन मिनाक्षी जैन हिच्या खात्यात वर्ग केली तर काही रक्कम रोखीने दिली. त्यानंतर त्याच दिवशी गायत्रीचे त्या सलून व्यावसायिक तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले.

लग्न झाल्यानंतर रमाबाई सुशिल कनौजिया वगळता सुजाता ठाकुर, मिनाक्षी जैन, मीना जैन, मीना बोरसे, अक्षय जोशी असे सर्व जण जळगाव येथे परत आले. काही दिवस गायत्रीसोबत थांबलेली रमाबाई देखील जळगावला परत आली. कुणाला शंका येणार नाही असे सर्वांसोबत वाग, पतीसोबत शरीरसंबंध ठेव असे गायत्रीला गुपचूप सांगून ठेवण्यात आले होते. आम्ही तुला काही दिवसांनी जळगावला घेऊन येऊ असे देखील तिला गुपचुप सांगण्यात आले होते. लग्नानंतर पाचव्या दिवशी सत्यनारायण पुजा झाल्यानंतर अल्पवयीन गायत्रीसोबत तिच्यासोबत लग्न केलेल्या तरुणाने शरीरसंबंध प्रस्थापित केले. आपल्याला आता पतीसोबत रहायचे नाही, मला जळगावला यायचे आहे असा तगादा गायत्रीने गुपचूप आपल्या गृप सदस्यांसोबत सुरु केला. त्यावर कुणाला शंका नको म्हणून तुला काही दिवस तेथेच रहावे लागेल असा सल्ला तिला देण्यात आला. त्यामुळे नाईलाजास्तव गायत्री कोल्हापूर जिल्ह्यातील त्या सलून व्यावसायिक तरुणासोबत रहात होती. आपले बनावट लग्न करण्यात आले असून आपले झालेल्या पतीसोबत शरीरसंबंध देखील प्रस्थापीत झाले असल्याची माहिती गायत्रीने गुपचूप तिच्या आईला कळवली. या बनावट लग्नाच्या माध्यमातून आपल्या मुलीला पैसे आणी दागिने मिळणार असल्याचे बघून तिची आई मनिषा पाटील हिने तिला तिच्या चुकीच्या कामाबद्दल एकप्रकारे मुकसंमतीच दिली. या सर्व प्रकारापासून गायत्रीचे वडील भैय्या पाटील मात्र अनभिज्ञ होते.

लग्नानंतर दोन महिन्यांनी एप्रिल 2025 मधे गायत्री तिच्या पतीसह जळगावला मिनाक्षी जैन हिच्या घरी आली. गायत्रीला मिनाक्षी जैन हिच्याकडे सोडून तिचा सलून व्यावसायिक पती जळगावला राहणा-या त्याच्या नातेवाईकांकडे निघून गेला. काही दिवसांनी तो गायत्रीला आपल्यासोबत कोल्हापूरला घेऊन जाण्याच्या तयारीने आला. मात्र यावेळी तिने टाळाटाळ केली. मला थोडे काम आहे. तुम्ही पुढे जा मी नंतर येते असे सांगून तिने वेळ मारुन दिली. त्यामुळे तिचा पती एकटाच कोल्हापूरला निघून गेला. त्यानंतर तिने तिच्या पतीसोबत जणूकाही संपर्कच तोडला. तिच्या अंगावरील दागिने सुजाता ठाकुर हिने आपल्या ताब्यात घेतले. कोल्हापूरच्या पतीपासून गर्भवती झालेल्या अल्पवयीन गायत्रीचा तिच्या गृप सदस्यांनी दवाखान्यात गर्भपात देखील केला.    

तिचा पती कोल्हापूर येथून तिला सारखा सारखा तु कधी परत येते अशी विचारणा करत होता. मात्र ती त्याला उडवाउडवीची उत्तरे देत होती. 24 जून 2025 रोजी गायत्रीचा मोबाईल लागतच नव्हता. त्यामुळे तिचा पती तिकडे कोल्हापूरला अस्वस्थ झाला. त्याने लागलीच दुस-या दिवशी जळगाव गाठले. तो त्याच्या जळगाव येथील त्याच्या नातेवाईक चुलत भावाकडे थांबला. त्याने जळगाव शहरात गायत्रीचा तपास केला असता त्याला धक्कादायक माहिती मिळाली. गायत्रीचे आई वडील हयात असून आपल्याकडे आलेले तिचे सर्व नातेवाईक बनावट असल्याचे त्याला समजले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले.

आपल्यासोबत लग्न करणारी गायत्री ही मिनाक्षी जैन हिच्याकडे रहात नसून ती हरिविठ्ठल नगर भागात आई वडीलांसोबत रहात असल्याची माहिती तिच्या पतीसह त्याच्या जळगावच्या नातेवाईकांना समजली. त्यामुळे सर्वच जण संतप्त झाले. सर्वांनी मिळून ती रहात असलेले तिचे हरिविठ्ठल नगर भागातील तिचे घर शोधून काढले. त्यांना त्या ठिकाणी गायत्री तर भेटली नाही मात्र तिची आई मनिषा पाटील भेटली. आलेल्या सर्वांनी आक्रमक पवित्रा घेत मनिषा पाटील हिस जाब विचारण्यास सुरुवात केली. गायत्रीला आमच्यासोबत पाठवा, तिने लग्न केले असून आम्ही दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे वजनाचे दागिने दिले आहेत. एकतर तिला आमच्या ताब्यात द्या नाहीतर आमचे पैसे आणी दागिने आम्हाला परत द्या अशी मागणी सर्वांनी गायत्रीच्या आईकडे सुरु केली.

ज्या कुणी गायत्रीचे लग्न लावले असेल त्यांना जावून विचारा आणी तेथेच गायत्रीचा शोध घ्या असा सल्ला गायत्रीची आई मनिषा पाटील हिने आलेल्या सर्वांना दिला. त्यामुळे सर्व जण अजूनच संतप्त झाले. शब्दामागे शब्द वाढत होता. त्यावर आलेल्या जमावाने अर्थात नातेवाईकांनी गायत्रीची मिसींग दाखल करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत पोलिस स्टेशनला चला अशी मागणी सुरु केली. त्यावर गायत्रीच्या काकाने आलेल्या सर्वांना सांगितले की गायत्रीचा विषय आमच्यासाठी संपला असून तुम्ही तिचा शोध घेतला तर आम्हीच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू, तुमचे हातपाय तोडून टाकू. या विधानामुळे आलेला जमाव अजूनच भडकला मात्र आल्या पावली परत गेला. संतप्त आवेशात परत गेलेल्या जमावाची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने गायत्रीच्या आईने रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठत गायत्री हरवल्याची मिसींग दाखल केली. हा प्रकार सलून व्यावसायीक तरुणाच्या नातेवाईकांना समजला.

गायत्री हरवल्याची मिसींग दाखल झाल्यानंतर सुरु झाला पोलिसांचा तपास आणि उलगडत गेला एकामागून एक गुन्ह्याचा प्रवास. त्यानंतर जे जे समोर आले ते सर्व थक्क करणारे होते. नोकरीच्या निमीत्ताने नाशिकला गेलेली आपली मुलगी गायत्रीचे अपहरण झाले, तिचे परस्पर लग्न लावण्यात आले, तिचा परस्पर गर्भपात करण्यात आला, आपली बदनामी झाली, आपल्या घराच्या दारापर्यंत लोक आले, आपल्याला दमबाजी करुन गेले या सर्व घडामोडी बघून आणी ऐकून गायत्रीचे वडील भैय्या पाटील यांच्या नजरेसमोर अंधारी आली. त्यांना काहीच सुचेनासे झाले. त्यांच्य मनात विचारांचे ढग जमा झाले. घरात कुणी नसतांना त्यांनी घराच्या छताला गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. 29 जून 2025 च्या सकाळी भैय्या पाटील यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली.

अगोदर गायत्री हरवल्याबाबत मिसींगचा गुन्हा दाखल झाला. या मिसींगचा तपास सुरु असतांनाच हा आत्महत्येच्या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला नोंद झाली. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला मयत भैय्या पाटील यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन अडकमोल, मिनाक्षी जैन आणि सुजाता ठाकुर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे गायत्री पाटील प्रकरणातून एकामागून एक गुन्ह्यांची मालिका दाखल होण्यासह उघड होण्यास सुरुवात झाली.

बनावट लग्न करुन फसवणूक झाल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्यातील सलुन व्यावसायीक तरुणाने रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकुण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गु.र.न. 239/25 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4) व 3 (5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. गायत्री भैय्या पाटील, मिनाक्षी दिनेश जैन, एक अल्पवयीन, सुजाता ठाकुर आणि अक्षय ठाकुर अशा पाच जणांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील एका अल्पवयीन मुलीचा सहभाग दखल घेण्याइतपत नसल्याचे समोर आले. कोल्हापूर येथील फसवणूक झालेल्या तरुणाने त्याच्या बनावट लग्नात दिलेल्या दागिन्यांच्या पावत्यांसह लग्न झाल्याचे पुरावे, लग्नाला हजर असलेल्यांचे छायाचित्र आणी इतर पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील महिलेची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. फसवणूक झाल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील सलून व्यावसायीक तरुणाने गुन्हा दाखल केला असला तरी त्याच्यासह इतरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेगळा गुन्हा नोंद झाला. त्यामुळे त्या तरुणासह एकुण चौघांना देखील अटक करण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त करणा-यांना अटक झाल्याशिवाय भैय्या पाटील यांचे विच्छेदन झालेले शव ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गायत्री पाटीलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला. अखेर संबंधितांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत राहण्याची वेळ आली. लग्न करणे आणि मुलीच्या घरी जावून वाद घालणे त्यांच्या अंगाशी आले.  

दरम्यान गायत्री पाटीलच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास देखील समांतर पातळीवर सुरु होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांनी गायत्रीचा मोबाईल क्रमांक ट्रेस केला. तिचे  मोबाईल लोकेशन, कॉल्स, मेसेजेस तपासले असता तो परभणी येथे सक्रीय असल्याचे उघडकीस आले. ज्या गायत्रीच्या बेपत्ता होण्यावरुन राण उठले होते ती परभणी मधे अजून एका लग्नाच्या तयारीत असल्याचे पोलिस तपासात पुढे उघड झाले. 

गायत्री परभणी येथे अजून एका लग्नाच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना समजली. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वेळ न दवडता परभणी गाठले. रामानंद नगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक परभणीत दाखल झाले. त्यांना त्याठिकाणी गायत्री गवसली. गायत्रीने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करुन त्याच्यासोबत देखील बनावट लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर त्याला समजले की जळगाव येथील वृत्तपत्रात याच गायत्रीच्या बनावट लग्नाच्या आणि तिच्यावरुन सुरु असलेल्या गदारोळाच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे त्याने देखील गायत्रीविरुद्ध स्थानिक गंगाखेड पोलिस स्टेशनला भगवान सखाराम बचाटे (रा. गंगाखेड), शेषेराव चिंतलवाड (रा. नांदेड), शिवाजी वागटकर (रा. तिगनवाडी ता. किनवट जि. नांदेड), गायत्रीची आई मनिषा भैया पाटील, मिनाक्षी दिनेश जैन, मिना प्रकाश बोरसे, सुजाता ठाकुर, अक्षय गंगाधर जोशी (सर्व रा. जळगाव) अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला.

यात विशेष म्हणजे परभणी येथील गायत्री व तरुणाच्या बनावट  लग्नात खुद्द गायत्रीची आई मनिषा पाटील सहभागी होती. तिचा आपली मुलगी गायत्रीला गुन्ह्यात सपोर्ट होता हे उघड झाले. परभणी जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या तरुणाने देखील लग्नात दिलेले दागिने व पैसे यांचे पुरावे पोलिसांना दिले. तिन लाख रुपये रोख दिल्याच्या पुराव्यासह जळगाव येथील सराफाकडून घेतलेल्या 61 हजार 210 रुपये किमतीच्या दागिन्यांची बिले, 5750 रुपये किमतीच्या कपड्यांची बिले आदी पुरावे त्याने सादर केले.

दरम्यान अटके नंतर गायत्री पाटील हिने रामानंद नगर पोलिस स्टेशनला कोल्हापूरच्या ज्या तरुणासोबत लग्न केले होते त्याच्यासह एकुण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात मुख्य सुत्रधार मिनाक्षी दिनेश जैन, मीना प्रकाश बोरसे, रमाबाई कनौजिया, सुजाता ठाकुर, मीना जैन, अक्षय गंगाधर जोशी आदींचा समावेश करण्यात आला. ज्यावेळी गायत्रीचे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणासोबत बनावट लग्न झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती. त्यामुळे आपण अल्पवयीन असतांना आपले लग्न झाले आणि त्यातून आपण गर्भवती झाल्याचा तिने दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले. त्यामुळे तिच्यासोबत लग्न करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण नाहक फसला. त्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देखील एका वेगळ्या गुन्ह्यात त्याचा सहभाग दाखवण्यात आला.

गायत्री पाटील हिने दाखल केलेल्या फिर्यादीत मीना बोरसे हीने तिच्यासह तिच्या मित्रांवर चोरीचा आळ लावून पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन चाळीस हजार रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नायोग्य वयात नसतांना आपले खोटे लग्न लावून देण्यासह पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप गायत्रीने दिलेल्या फिर्यादीत मिनाक्षी जैन,  मीना बोरसे, रमाबाई, सुजाता ठाकुर, मीना जैन व अक्षय जोशी यांच्याविरुद्ध लावण्यात आला. अशा प्रकारे गायत्री पाटील आणी तिची आई मनिषा पाटील या मायलेकींसह बदमाश टोळीमुळे  उद्भवलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत गेली. जे फिर्यादी तेच संशयीत आरोपी झाले. जे संशयीत आरोपी तेच काही गुन्ह्यात फिर्यादी झाले.

गायत्री पाटीलच्या चुकीला वेळीच उघड करुन नेस्तनाबूत करण्याऐवजी त्यावर पांघरुन घालण्याचे काम तिची आई मनिषा पाटील हिने केले. त्यामुळे ती देखील या गुन्ह्यात फसली. तसेच तिच्यासोबत लग्न करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील लग्नाळू तरुण देखील गजाआड झाला. त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक देखील गजाआड झाले. गायत्री पाटील हिस बनावट लग्नाच्या टोळीत सहभागी करणारे सर्वजण जेलमधे गेले. गायत्री पाटीलचा जन्मदाता बाप आत्महत्या करुन देवाघरी गेला. दोघी मायलेकी गजाआड झाल्याने घरात गायत्रीचा भाऊ एकटा झाला. अशा प्रकारे विविध परिवारांची वाताहत झाली. बदनामीच्या धाकाने कुणी गुन्हा दाखल करण्यास पुढे येणार नाही या अविर्भावात या टोळीचा बनावट लग्न करुन फसवणूकीचा उद्योग सुरु होता. मात्र भैय्या पाटील यांची आत्महत्या पुढील सत्य उजेडात येण्यास महत्वाचा दुवा ठरली. एका बापाची आत्महत्या खुप काही सांगून गेली. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या एकुण चार गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भुषण कोते, पोलिस उप निरीक्षक संजय शेलार, पोलिस उप निरीक्षक सचिन रणशेवरे आणि त्यांचे सहकारी प्रविण सुरवाडे आदी करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment