जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

On: August 28, 2025 11:00 PM

जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS) ची प्रतिष्ठित कॉर्पोरेट सदस्य बनली आहे. या सदस्यत्वाने कंपनीला कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार आहेत. NAAS ही १९९० मध्ये स्थापन झालेली संस्था असून, ती भारतातील कृषी संशोधन, शिक्षण आणि धोरणांसाठी एक स्वतंत्र वैज्ञानिक थिंक टँक म्हणून ओळखली जाते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुलात कार्यरत असलेली ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) सोबत महत्त्वाचे काम करत आहे.

NAAS चे मुख्य उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्टतेची ओळख करणे, सहकार्य वाढवणे आणि ज्ञानाचे प्रकाशन करणे हे आहे. यासाठी संस्था विविध परिषदा, कार्यशाळा, फेलोशिपसारखे पुरस्कार आणि नियमित प्रकाशने यांसारखे उपक्रम राबवते. सध्या NAAS मध्ये ८२१ सदस्य आहेत, परंतु कॉर्पोरेट सदस्य म्हणून जैन इरिगेशन ही एकमेव कंपनी असल्याचे सांगण्यात आले आहे.

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी या सदस्यत्वाबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “NAAS सोबतचा हा सहभाग आम्हाला शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास आणि भारतीय शेतीच्या प्रगतीसाठी योगदान देण्यास सक्षम ठरेल. ही भागीदारी कृषी संशोधन आणि विकासाला नक्कीच चालना देईल, ज्यामुळे शेतकरी आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास उपयुक्त ठरेल.” महाराष्ट्रातील जळगाव येथे मुख्यालय असलेली जैन इरिगेशन ही कंपनी मागील सहा दशकांपासून ठिबक सिंचन, सौर ऊर्जा आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवीत आहे. या नव्या सदस्यत्वाने कंपनी NAAS च्या वैज्ञानिक नेटवर्कचा लाभ घेऊ शकेल आणि देशातील कृषी क्रांतीला हातभार लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकेल.” अशी प्रतिक्रिया नोंदविली.

NAAS व जैन इरिगेशनच्या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी यांना विशेष लाभ होऊ शकेल. जैन इरिगेशनने यापूर्वीही विविध कृषी प्रकल्पांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे, हे सदस्यत्व त्यांच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अशा सहकार्याने जलसंधारण व जलसुरक्षा या द्वारे शाश्वत शेतीतून उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. असेही या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment