जळगाव – खेळाडूंचे स्फुर्तीस्थान मेजर ध्यानचंद यांची दि. 29 ऑगस्ट रोजी सर्वत्र जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन विविध संघटनांकडून करण्यात येते. या पार्श्वभूमीवर निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तास मैदानी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले आहे.
निरोगी आयुष्यासाठी नुसता खेळ खेळून उपयोग नाही तर त्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशात काही कारणास्तव ऑक्सिजनयुक्त झाडांची व इतरही सजीवांना लागणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. झाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी प्रत्येकाने “एक पेड मॉ के लिये” या अभियानांतर्गत एक तरी झाड लावावे असे आवाहन केले होते. तसेच आताही एक पेड मॉ के लिये अभियान2 अंतर्गत झाड लावावे असे आवाहन केले आहे.
निसर्गनिर्मित सजीवांना आवश्यक असलेले आणि वातावरण शुद्ध राहण्याच्या दृष्टीने दीर्घकाळ टिकणा-या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारी ऑक्सिजन युक्त झाडे लावावेत. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे विघटन होत नसल्यामुळे त्याचा कचरा जमा होत आहे. तरी प्लास्टिकचा वापर करू नये. सार्वजनिक वाहनाचा वापर करत वातावरणातील वायू प्रदूषण टाळूया. सार्वजनिक कार्यक्रमातील कर्कश आवाज कमी करून ध्वनी प्रदूषण टाळूया. तसेच पाण्याचा वापर सुद्धा जपून करावा. प्रदूषण टाळूया पृथ्वी वाचवूया असा संकल्प करण्याचे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.







