जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : गल्लीतील भटका कुत्रा असो की जंगलातील हिंस्त्र वाघ त्यांचा इलाका ठरलेला असतो. आपल्या इलाक्यात, आपल्या हद्दीत भटका कुत्रा अथवा हिंस्त्र वाघ अन्य प्राण्याला शिरकाव करु देत नाही. नवीन प्राणी आपल्या इलाक्यात आला म्हणजे प्रस्थापित प्राणी नव्याने शिरकाव करण्याचा प्रयत्न करणा-या प्राण्याला हुसकावून लावतात. आपला इलाका – आपली दहशत अशी ओळख हे प्राणी निर्माण करतात. दुस-याच्या इलाक्यावर कब्जा करुन आपली दहशत निर्माण करण्याचा काही प्राणी प्रयत्न करतात. त्यासाठी ते आपली दहशत आणि बळ वापरतात. दहशतीला दहशतीने, बळाला बळाने प्रति उत्तर देऊन हिंस्त्र प्राणी स्वत:चे अस्तित्व निर्माण करतात. प्रसंगी ते निकराचा लढा देखील देतात.

मनुष्य प्राण्यातील गुन्हेगारांच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रयत्न होत असतो. या जगात कुणीही जगण्याचा अमरपट्टा घेऊन येत नसतो. मात्र दहशतीचा वापर करुन अस्तित्वाची लढाई लढता लढता अनेक हिंस्त्र प्राणी आणि मनुष्यप्राणी खंगून जातात. मात्र कायमस्वरुपी आपलेच अस्तित्व, आपलीच दहशत रहावी या मोहापायी, हट्टापायी ते स्वत:चे कुठेतरी नुकसान करतात. दहशत आणि अस्तित्वाच्या हट्टातून गुन्हेगारी जन्माला येते.
प्रत्येक गावात काही भागात कमी अधिक प्रमाणात गुंडगिरी फोफावली आहे. आपल्या इलाक्यात आपली दहशत कायम रहावी, लोकांनी आपल्याला आपल्या नावानिशी, आपल्या इलाक्यानिशी ओळखावे, आपल्या घाबरावे, प्रतिस्पर्धी गुन्हेगाराची टोळी जन्माला येऊ नये असा अट्टाहास काही गुंड, गुन्हेगार बाळगून असतात. वर्चस्व आणि अस्तित्वाच्या लढाईतून प्रंसगी एक गुंड आणि त्याची टोळी प्रतिस्पर्धी गुंडाचा खून देखील करते. या गुन्हेगारांना, गुंडांना, धडा शिकवण्याचे काम शेवटी काळ करतो. जेव्हा काळ धडा शिकवतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेक शहरातील गुन्हेगारांप्रमाणे जळगाव शहराच्या तुकारामवाडी परिसरात देखील एक गुन्हेगार रहात होता. सुरज ओतारी असे त्याचे नाव होते. सन 2022 या कालावधीत सुरज ओतारी याचा तुकाराम वाडी परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठा दबदबा होता. सुरज ओतारी याने त्याच्या समविचारी मित्रांची एक छोटीशी फौज तयार केली होती.

सन 2022 हा सुरज ओतारी या गुन्हेगार तरुणाच्या जीवनातील कुप्रसिद्धीचा काळ होता. कुप्रसिद्धी गुन्हेगारांना आवडते. जेवढी आपली कुप्रसिद्धी तेवढी आपली दहशत अशी गुन्हेगारांची भावना असते. मार्च 2022 या कालावधीत सुरज ओतारी याचा एक साथीदार शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल होता. त्याला बघण्यासाठी सुरज ओतारी आणि अरुण गोसावी असे दोघे जण 18 मार्च 2022 या दिवशी दवाखान्यात सोबत गेले. रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाला बघण्यास सुरज ओतारी गेल्याचे समजताच प्रतिस्पर्धी गटातील तरुण चिडले. आपल्या विरोधकाला बघण्यासाठी सुरज ओतारी याने जावू नये असे त्यावेळी प्रतिस्पर्धी गुन्हेगारी टोळीत म्हटले जात होते. शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीकच सुरज ओतारी आणि त्याच्या सोबत असलेल्या अरुण गोसावी यांच्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुंबई येथे पुढील उपचारादरम्यान 31 मार्च 2022 रोजी सुरज ओतारी याचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात भुषण विजय माळी, विक्की उर्फ हेमंत चौधरी आणि अक्षय उर्फ गंप्या नारायण राठोड या तिघांना अटक करण्यात आली होती.
टोळी प्रमुख असलेल्या भुषण माळी याचा सचिन चौधरी हा साथीदार होता. भुषण माळी याच्या टोळीने जळगाव शहरात खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. खूनाच्या गुन्ह्यात भुषण माळी व सचिन चौधरी कारागृहात गेले होते. काही कालावधीनंतर सचिन याला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर भुषण याची जामीनावर सुटका झाली. भुषण याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्रे बाळगणे यासारखे बारा गंभीर गुन्हे त्यावेळी दाखल होते. तसेच सचिन चौधरी याच्याविरुध्द खून, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे सात गुन्हे त्यावेळी दाखल होते. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या टोळीला हद्दपार करण्याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. कारागृहातून बाहेर येताच भुषण उर्फ भासा विजय माळी व सचीन उर्फ टिचकुल कैलास चौधरी या दोघा तरुणांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तत्कालीन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दोघांच्या हद्दपारीचे आदेश काढले होते.




मयत सुरज ओतारी याने तयार केलेली गॅंग आणी प्रतिस्पर्धी गॅंग यांच्यात अधूनमधून धुसफुस सुरुच होती. पवन दिलीप बाविस्कर, आकाश सुकलाल ठाकुर, भुषण मनोज अहिरे हे मयत सुरज ओतारी याच्या प्रतिस्पर्धी गॅंग़मधील तरुण होते. दि. 11 डिसेंबर 2022 या दिवशी सुरज ओतारी याच्या खूनाचा राग मनात ठेवून चौघांनी आकाश सुखलाल ठाकुर व त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना शिवीगाळ, दगडफेक व जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुणाल ऊर्फ दुंड्या कोळी, स्वप्नील ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर, पीयुष ऊर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर, रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव आदींविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या सर्व घडामोडीनंतर जवळपास तिन वर्षांचा कालावधी निघून गेला आणि सन 2025 उजाडले. या कालावधीत मयत सुरज ओतारी याचे मित्र असलेले आकाश जनार्दन मोची व विशाल रमेश मोची हे दोघे चुलत भाऊ कामधंद्याला लागले. दोघे आपला चरितार्थ चालवत होते. दोघे भाऊ एका वेल्डींग़च्या दुकानात काम करु लागले. यातील विशाल मोची याचा गुन्हेगारीशी कोणताही संबंध नव्हता. सर्व काही सुरळीत सुरु असतांना मयत सुरजच्या प्रतिस्पर्धी गटातील पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंडया सुखलाल ठाकुर, भुषण मनोहर अहिरे व त्यांच्यासोबत राहणारे देव उर्फ दादु विजय पवार, आकाश संजय पाटील, अमीन तडवी असे सर्वजण आकाश मोची, विशाल मोची आणि रोहीत भालेराव या तिघांना रस्त्याने येता – जाता डिवचत होते. प्रसंगी शिवीगाळ करत चाकू दाखवून दहशत माजवत होते. हे सर्वजण टोळीने रहात असल्यामुळे आकाश मोची याने घाबरुन पोलिसात तक्रार दिली नव्हती.

दि. 17 ऑगस्टचा दिवस संपून मध्यरात्री बारा नंतर 18 ऑगस्ट 2025 चा दिवस सुरु झाला. या दिवसाच्या सुरुवातीला मध्यरात्रीच्या सुमारास पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंडया सुखलाल ठाकुर, देव विजय पवार, भुषण मनोज अहिरे, आकाश संजय पाटील, अमीन तडवी असे सर्वजण रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस साजरा करत असतांना ते अधुनमधून आरडाओरड करत होते. दरम्यान रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक विज प्रवाह खंडीत झाला. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. या वेळी रोहीत भालेराव, विशाल मोची आणि आकाश मोची हे तिघे जण सोबतच होते. विज प्रवाह केव्हा सुरु होईल अशी विचारणा करण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयाला फोन लावला. मात्र पलीकडून कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे रोहीत भालेराव, विशाल मोची आणि आकाश मोची या तिघांनी प्रत्यक्ष विज कार्यालयात जावून विचारणा करण्याचे ठरवले.
रोहीत भालेराव हा दुचाकीवर बसला. त्याच्या मागे आकाश मोची व सर्वात मागे विशाल मोची असे तिघे जण ट्रिपलसिट बसले. तिघे जण तुकारामवाडी परिसरातून नजीकच्या महावितरण कार्यालयाच्या दिशेने जाऊ लागले. रस्त्यात पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंडया सुखलाल ठाकुर, देव विजय पवार, भुषण मनोज अहिरे, आकाश संजय पाटील, अमीन तडवी असे सर्वजण वाढदिवस साजरा करत आरडा ओरड करत होते. त्यावेळी त्याच रस्त्याने रोहीत भालेराव, विशाल मोची आणि आकाश मोची हे तिघे जण ट्रिपलसिट महावितरण कार्यालयात जात होते. तिघांना सोबत बघून वाढदिवस साजरा करणा-या सर्वांना वाटले की हे आपल्या पाळतीवर असून आपली रेकी करत आहेत.




रस्त्यावर वाढदिवस साजरा करणा-या टोळक्याने ट्रिपलसिट तिघांचा पाठलाग सुरु केला. महावितरण कार्यालयाच्या गेटजवळच दुचाकीवर सर्वात मागे बसलेला विशाल मोची त्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी विशाल यास खाली ओढले. त्याचवेळी मोटार सायकल थांबवून रोहीत भालेराव खाली उतरला. त्याने मागे वळून पाहिले असता सर्वजण विशाल मोची याला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत असल्याचे त्याला दिसले. मारेक-यांच्या तावडीत सापडलेल्या विशाल मोची याची सुटका करण्यासाठी दोघे आले. मात्र त्याचवेळी आकाश ठाकुर हा त्याच्या हातातील चाकूने विशाल मोची याच्या तोंडावर, हातावर आणि पोटात वार करत होता. जखमी विशालसोबत असलेल्या दोघांनी मारेक-यांना त्याला सोडा, त्याला सोडा, मारु नका अशी विनवणी केली. मात्र आकाश ठाकूर याने चवताळून “आम्हाला एमपीडीए लावता का? तुम्हाला आज मारुन टाकू, मारा रे यांना” असे म्हटले. त्याने असे म्हणताच सर्वांनी मिळून दोघांना चापटा बुक्क्यांनी व लाथांनी मारहाण सुरु केली. दरम्यान आकाश ठाकुर याने त्याच्या हातातील चाकू घेत दोघांच्या दिशेने धाव घेतली. आता आपला देखील घात होईल हे आकाश मोची आणी रोहीत भालेराव यांच्या लक्षात आले. जखमी विशाल यास तसेच सोडून दोघांनी मोटार सायकलने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश ठाकुरच्या हातातील चाकूचा घाव आकाश मोची याच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस मांडीजवळ बसला.
आकाश मोची आणि रोहीत भालेराव हे दोघे जण जीव वाचवत कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले. सर्व मारेकरी देखील तेथून पळून गेले. थोडा वेळ गेल्यानंतर आकाश मोची आणी रोहीत भालेराव हे दोघे घटनास्थळावर काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना जखमी विशाल हा रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. आकाश मोची याने लागलीच त्याच्या काकांना फोन लावून घटनेची माहिती देत बोलावून घेतले. लागलीच विशाल यास शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विशालची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. त्याला वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले.

आकाश मोची याने या घटने प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत भुषण मनोज अहिरे, पवन दिलीप बाविस्कर, आकाश सुखलाल ठाकूर, देव उर्फ दादू विजय पवार व त्यांचे साथीदार अशा सर्वांविरुद्ध खूनाचा गुन्हा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली. मारेक-यांना अटक झाल्याशिवाय शव विच्छेदन झालेला विशालचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे काही वेळ शासकीय रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते.
गुप्त बातमीदार आणि तांत्रीक माहितीच्या आधारे संशयीत आकाश ठाकुर व भुषण मनोज अहिरे या दोघांना कोल्हे हिल्स परिसरातून तर संशयीत पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर आणि देव उर्फ दादू विजय पवार या दोघांना तुकाराम वाडी परिसरातून भल्या पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. अटकेतील चौघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सुरज ओतारी याच्या सन 2022 मधे झालेल्या खूनानंतर झालेल्या वादात आकाश मोची व रोहित भोळे या दोघांचा संबंध होता असे म्हटले जात आहे. मात्र, रामेश्वर कॉलनीत राहणारा विशाल याचा कोणत्याही वादात सहभाग नव्हता. महावितरण कार्यालयात विज पुरवठ्याची चौकशी करण्यासाठी जाणारे तिघे जण आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या संशयातून त्यांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यात दुचाकीवर सर्वात मागे ट्रिपल सिट बसलेला निष्पाप विशाल मोची हल्लेखोरांच्या तावडीत सापडला आणी त्याचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे. सुरज ओतारी याच्या खूनानंतर झालेल्या वादात आकाश मोची व रोहित भोळे या दोघांचा संबंध होता असे म्हटले जात आहे. जुन्या वादातून विशालचा विनाकारण बळी गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलिस उप निरीक्षक गोपाल चव्हाण, पोहेकॉ महेश महाजन, मिलींद सोनवणे, प्रदीप पाटील, संतोष सोनवणे, पोकॉ राहुल पाटील, तुषार पाटील, गोविंद साबळे, तेजस मराठे, प्रशांत लाड, चंद्रकांत पाटील, विकास पहुरकर, इश्वर फावडे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.






