जळगावच्या मणियार बंधूना शस्त्र परवान्याची गरज काय?  जनमानसात निर्माण झाला प्रश्न

On: August 31, 2025 4:48 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): जळगावच्या आयुष कमलकिशोर मणियार आणि पियुष कमलकिशोर मनियार या दोघा बंधूंना शासनाने अगोदर नाकारलेला शस्त्र परवाना नंतर अधिकारी बदलताच देण्यात आला. या मणियार बंधूंना शस्त्र परवान्याची गरज काय? या मणियार बंधूंचे जनसेवेशी निगडीत कोणते उद्योग आहेत? ज्यावेळी सुरुवातीला त्यांचा शस्त्र परवाना नाकारण्यात आला होता त्यानंतर त्यांच्यावर असा कोणता जीवघेणा हल्ला झाला होता? की ज्यामुळे अधिकारी बदलताच त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आले आहेत. कमरेला पिस्टल खोचून हे बंधू समाजात दहशत पसरवतात असे म्हटले जाते. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी सन 2023 मधे शासन दरबारी केली होती.

ज्यावेळी अभिजीत राऊत हे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्याचा कारभार बघत होते त्यावेळी पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे, पोलिस उप विभागीय अधिकारी कुमार चिंता, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे अशी टीम कार्यरत होती. त्यावेळी या मणियार बंधूंच्या शस्त्र परवाना प्रकरणाची सुरुवात एमआयडीसी पोलिस स्टेशन स्तरावरुन झाली होती. त्यावेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी या शस्त्र परवान्याला नकार दिला होता. त्यानंतर पुढील टप्प्यात उप विभागीय पोलिस अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणा-या कुमार चिंता यांनी देखील हे प्रकरण नाकारले होते. त्याच प्रमाणे पुढील महत्वाच्या टप्प्यात पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासमोर हे प्रकरण तग धरु शकले नाही व ते नाकारण्यात आले. सर्वच स्तरावर या मणियार बंधूंच्या शस्त्र परवान्याला नकारघंटा मिळाल्यानंतर त्यांच्यावर कोणताही जीवघेणा हल्ला झाला नाही. त्यामुळे आपल्याला खरोखरच शस्त्र परवान्याची गरज आहे हे सिद्ध होऊ शकले नाही.

त्यानंतर या मणियार बंधूनी अधिकारी बदलण्याची वाट पाहिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी अमन मित्तल आले. अमन मित्तल आणि या मणियार बंधूंची वैचारीक पातळी कुठेतरी जुळून आल्याचे म्हटले जाते. त्याच कालावधीत एमआयडीसी पोलिस स्टेशनला जयपाल हिरे या तरुण अधिका-याची नियुक्ती झाली. त्यांच्यापुढे नव्याने शस्त्र परवाना मिळण्याचे प्रकरण या दोघा बंधूंनी सादर केले. तरुण पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी या दोघा तरुण वयातील मणियार बंधूंना शस्त्र परवाना मिळण्यासाठी रिमार्कच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली. याच कालावधीत पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत आणि डीएसबी पीआय रंगनाथ धारबळे अशी टीम नव्याने कार्यरत झाली होती. एमआयडीसी पोलिस स्टेशनपासून मणियार बंधूंना नाहरकत मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात सर्वच ठिकाणी आणि पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या वतीने पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हे प्रकरण होकारार्थी म्हणून पुढे रेटले. शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघा मणियार बंधूना शस्त्र परवाना मंजूर केला. एकदा शस्त्र परवाना नामंजूर झाल्यानंतर पुन्हा देता येत नाही असे म्हटले जाते. त्यासाठी अपिलात जावे लागते असे म्हटले जाते. मात्र या मणियार बंधूंना शस्त्र परवाना कसा काय देण्यात आला असा प्रश्न जनतेला पडला आहे.

शस्त्र परवाना मिळाल्यानंतर हे दोघे बंधू कमरेला शस्त्र लावून प्रदर्शन व दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय तक्रार माहिती उघड न करण्याच्या अटीवर जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना नागरिकांकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे दीपककुमार गुप्ता यांनी या मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी शासन दरबारी रेटून नेली ती आजतागायत कायम आहे. त्यानंतर आता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील याच आशयाची मागणी करत आहेत.

विशी ओलांडलेल्या आणि पचविशीच्या आतील मणियार बंधूंना शस्त्राची अशी कोणती गरज पडली आहे? त्यांचे असे कोणते समाजहिताचे उद्योग आहेत की त्यांच्या जीवाला धोका आहे हे एकदा समाजासमोर यावे अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी त्यावेळी केली होती आणि आजही त्यांची तीच मागणी कायम आहे. अधिकारी बदलताच नव्या अधिका-यांकडून तात्काळ पिस्टल परवाना कसा काय मिळू शकतो या प्रश्नाचे उत्तर जनतेला अपेक्षीत आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी यापुर्वी केलेल्या तक्रारीचे पडसाद आता उमटत असल्याचे देखील म्हटले जात आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment