जळगाव – अमळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्टल खरेदीदार आणि विक्रेता अशा दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशाल भैय्या सोनवणे (रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) व गोपाल भिमा भिल (रा. सत्रासेन, ता. चोपडा) अशी त्यांची नावे आहेत. अमळनेर चोपडा रोडवर एक इसम गावठी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक नामदेव आनंदा बोरकर, हे कॉ मिलिंद अशोक सोनार, पो कॉ उदय राजेंद्र बोरसे व निलेश सुभाष मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पीएसआय नामदेव आनंदा बोरकर करत आहेत.





