जळगाव – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चार चाकी वाहनात प्रवाशाला बसवून हात चलाखीने त्याच्या खिशातील 22 हजार 500 रुपये रोख आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. वसिम अजमल खान आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार अशी नशिराबाद येथील रहिवासी असलेल्या या गुन्ह्यातील दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेला आणि गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एक प्रवासी धुळे येथे जाण्यासाठी बसची वाट बघत होता. त्यावेळी त्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने या दोघांनी त्यांचे चारचाकी वाहन थांबवून त्याची विचारपूस करत त्याला पुढच्या सीटवर दाटीवाटीने बसवले. मागच्या सीटवर अगोदरच प्रवासी बसले होते. त्यामुळे त्या प्रवासी इसमाला पुढच्या सीटवर दाटीने बसावे लागले. काही अंतर पुढे गेल्यानंतर वाहनात जागा नसल्याचे कारण पुढे करत त्याला खाली उतरवून देण्यात आले.
वाहनातून खाली उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपल्या खिशातील 22 हजार पाचशे रुपये रोख आणि मोबाईल चोरी झाला आहे. या घटने प्रकरणी त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, नरेंद्र मोरे आदींनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली.
नेत्रम विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कुंदनसिंग बयास यांच्या मदतीने मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नशिराबाद येथील रहिवासी चोरटे वसिम अजमल खान आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार या दोघांना ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा त्यांनी आपल्या अजून दोघा साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली पोलीस पथकाला दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 22 हजार 500 रुपये रोख, चोरी केलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन तपासकामी जप्त करण्यात आले आहे.







