बेपत्ता बालकाचा आढळला जळीत मृतदेह

On: September 6, 2025 6:14 PM

जळगाव : बेपत्ता बालकाचा जळीत अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने यावल शहरात खळबळ माजली आहे. बालकाचा मृतदेह तो रहात असलेल्या घराच्या शेजारच्या घरातील कोठीत आढळल्याने हा घातपात असल्याचे निष्पन्न होत आहे. मोहम्मद हन्नान खान मजीद खान असे जळीत मृतदेह आढळलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

यावल शहरातील बाबुजीपुरा भागात प्राथमिक शिक्षक मजीद खान राहतात. त्यांचा सहा वर्षाचा मुलगा इद या सणाच्या दिवशी 5 सप्टेबरच्या सायंकाळी बेपत्ता झाला होता. या बेपत्ता बालकाचा शोध लागण्याकामी त्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला होता. नातेवाईकांनी शोध घेऊन देखील तो कुठे सापडला नाही. मात्र शेजारी राहणा-या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्याचा जळीत मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पुढील तपास आणि कारवाईला सुरुवात केली. मयत बालकासोबत दुष्कर्म झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. हा दुष्कर्माचा प्रकार लपवण्यासाठी त्याचा मृतदेह लपवून ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेतील संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. बेपत्ता बालकाचा शोध घेण्याकामी सहभाग घेत पोलिसांची  दिशाभुल करण्याचा संशयीत आरोपींनी प्रयत्न केल्याचा प्रकार देखील पुढे येत आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment