पेटत्या तरुणाचे पोलिसाने शर्टाने वाचवले प्राण — पत्नीच्या परतीसाठी तरुण करतो जीवाचे रान!!

On: September 10, 2025 12:46 PM

जळगाव : “घरोघरी मातीच्या चुली” या म्हणीप्रमाणे प्रत्येकाच्या संसारात कमी अधिक प्रमाणात कुरबुरी सुरु असतात. अशाच एका घटनेत वैतागून माहेरी निघून गेलेली पत्नी पुन्हा परत यावी यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी गेलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेण्याची घटना जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनसमोर घडली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आलेल्या पोलिस कर्मचा-याने त्याच्या अंगातील शर्टाने पेटत्या तरुणाचे प्राण वाचवले. जखमी जळीत तरुणावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनिल ममराज वाघ असे जळीत तरुणाचे तर योगेश माळी असे तरुणाचा जीव वाचवणा-या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील समता नगर भागातील सुनिल वाघ या तरुणाची पत्नी घरगुती वादाला वैतागून माहेरी निघून गेली होती. तिने परत यावे यासाठी सुनिल वाघ याचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. मात्र त्याची पत्नी परत येण्यास तयार नव्हती. त्यामुळे सुनिल वाघ हा तरुण 6 सप्टेबरच्या रात्री त्याच्या मामीसोबत रामानंद नगर पोलिस स्टेशनला पत्नीची तक्रार करण्यासाठी आला होता. सोबत त्याने मोटार सायकलच्या डिक्कीत पेट्रोल देखील आणले होते.

सुनिल वाघ पोलिस स्टेशनच्या बाहेर उभा असतांना त्याची मामी या प्रकाराची माहिती देण्यासाठी आत पोलिस स्टेशनमधे गेली. त्याच कालावधीत त्याला त्याच्या पत्नीचा पलीकडून फोन आला. तो तिला घरी येण्यासाठी सांगत होता. पलीकडून तिचे बोलणे ऐकून  इकडे सुनिलची मनस्थिती बिघडत होती. फोनवर शब्दामागे शब्द वाढत असतांनाच त्याने संतापाच्या भरात वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढली. पेट्रोल अंगावर ओतून त्याने स्वत:ला पेटवून घेतले. या प्रकाराची माहिती पोलिस स्टेशनमधे समजताच पोलिस कर्मचारी योगेश माळी धावून आले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता जळणा-या सुनिल वाघ याचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा शर्ट काढला. शर्टाच्या मदतीने त्यांनी जळत असलेल्या सुनिल वाघ याच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी देखील पुढील मदतीला धावून आले. जखमी सुनिल वाघ यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment