जळगाव : शेतीचे साहित्य, बॅटरी, इन्व्हर्टर, मोटार सायकल आणि कार चोरीचे एकुण दहा गुन्हे निंभोरा पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला दाखल 5, यावल पोलिस स्टेशनला दाखल 2, रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा पोलिस स्टेशनला दाखल प्रत्येकी एक असे एकुण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. साखळी पद्धतीने नाकाबंदी, रात्रगस्त व तांत्रीक तपासाच्या मदतीने हे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यांचा म्होरक्या विलास उर्फ काल्या सुपडू वाघोदे याचे नाव पुढे आले. त्याचा निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील वडगाव नदीकाठी शोध घेतला असता तो फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र त्याच्या झोपडीत त्याच्या सोबत राहणारी योगीता सुनिल कोळी ही महिला आढळून आली. तिने दिलेल्या माहितीनुसार फरार विलास वाघोदे हा त्याच्या शिरसाळा येथील साथीदाराच्या मदतीने चो-या करत होता. चोरी केलेला माल वडगाव येथील जमील तडवी याच्या मदतीने निंभोरा येथील स्वप्नील चौधरी यास विक्री करत होता.
सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने चोरीचा माल विकत घेणारा मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेतले. त्याच्या राहत्या घरासह गोडावून मधून चोरीच्या बॅटरी, इन्व्हर्टर मशिन व शेती साहीत्य तसेच इतर साहित्याचा मुद्देमाल आढळून आला. फरार मुख्य संशयीत विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे वगळता इतरांना अटक करण्यात आली आहे.
निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि हरिदास शिवराम बोचरे यांच्या पथकातील महिला पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील, ममता तडवी, पोहेकॉ सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, पोलिस नाईक अविनाश पाटील, पोकॉ किरण जाधव, रशिद तडवी, सर्फराज तडवी, रफिक पटेल, अमोल वाघ, प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, भुषण सपकाळे, सुभाष शिंदे, चालक पोहेकॉ योगेश चौधरी व पोकॉ राहुल केदारे यांच्यासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, प्रदिप चवरे, प्रदिप सपकाळे, मयुर निकम, सचिन घुगे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.







