जळगाव : जळगाव शहरातून यापुर्वी अवजड वाहतुक सुरु होती. या अवजड रहदारीमुळे अगणीत अपघात झाले व त्या अपघातात कित्येकांनी आपले प्राण गमावले आहेत. या अपघातांची मालिका रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जळगाव शहराच्या बाहेरुन पाळधी ते तरसोद दरम्यान नवा बाह्यवळण महामार्ग सुरु करण्यात आला. मात्र या नव्या महामार्गावर देखील अतिक्रमणाला सुरुवात झाली असून त्यातून अपघातांची मालिका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे म्हणण्याची वेळ येऊ शकते.
जळगाव शहराच्या बाहेरुन पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुर्ण झाले आणि तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गावरुन पुर्ण क्षमतेने वाहतुक देखील सुरु झाली आहे. सुरु झालेल्या या बाह्यवळण रस्त्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची आणी इंधनाची बचत झाली असून अपघाताचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
मात्र असे असले तरी आता या मार्गावर अतिक्रमणाला सुरुवात झाली असून हे अतिक्रमण दिवसागणिक वाढत गेल्यास अपघातांना आमंत्रण मिळणार आहे. या रस्त्यावर चहा नाश्त्याची सद्यस्थितीत तात्पुरती दुकाने सुरु झाली आहे. काही काळाने आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही व आपल्याला कुणी बोलत नाही याचा अंदाज आल्यानंतर या दुकानमालकांकडून त्यांची कच्ची दुकाने पक्की होण्यास सुरुवात होऊ शकते.
जुन्या महामार्गावर याच बायपासनजीक पक्क्या बस थांब्याचे रुपांतर चहा नाश्त्याच्या दुकानात झाले आहे. बाहेर अतिक्रमीत दुकान व त्या दुकानाचे सामान ठेवण्यासाठी हा थांबा वापरला जात आहे. याच बायपास नजीक फळ विक्रेते छोटा भोंगा वापरुन मोठ्या आवाजात फळ व इतर वस्तू विकत आहेत. या आवाजामुळे येणारे जाणारे वाहनधारक भर रस्त्यावर वाहने लावून फळ खरेदी करतात. त्यातून देखील अपघाताला आमंत्रण मिळत आहे. आता हाच कित्ता नव्याने सुरु झालेल्या बाह्यवळण महामार्गावर गिरवला जाण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकाराला वेळीच आवर संबंधीत यंत्रणेने घालणे गरजेचे आहे.
संबंधीत अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण थेट साईड पट्ट्यांवरच केले असून स्वत:सह इतरांच्या जीवीताच्या सुरक्षेचा अजिबात विचार केलेला नाही. या प्रकारामागे अतिक्रमणधारकांचा कुणी गॉडफादर आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण म्हणजे फुटपाथवरील अतिक्रमणधारक देखील कुणातरी गॉडफादरच्या सावलीखाली त्याचा व्यवसाय करत असतो.





