यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध टिपेश्वर (ता. घाटंजी) वन्यजीव अभयारण्यात नुकतीच एक तिन शिंगांची एक दुर्मीळ निलगाय आढळून आली आहे. या अभयारण्यात गस्ती दरम्यान कॅमे-यात हा प्रकार कैद झाला असून त्याला एक दुर्मिळ अविष्कार म्हटले जात आहे. सामान्यतः नर नीलगायीला फक्त दोनच शिंगे असतात. मात्र या नीलगायीच्या कपाळावर दोन नियमित शिंगांबरोबरच मधोमध एक लहान तिसरे शिंग स्पष्ट दिसून आले आहे. नीलगायच्या बाबतीत अशा नोंदी अत्यल्प आहेत. या दुर्मिळ नीलगायीला विभागीय वन अधिकारी उत्तम फड, सहाय्यक वनसंरक्षक उदय आव्हाड व वनरक्षक रवी धुर्वे यांनी गस्ती दरम्यान प्रत्यक्ष पाहिले आहे.
शिंगाच्या वाढीचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांमध्ये झालेल्या बदलामुळे निसर्गाने ही विलक्षण रचना निर्माण केली असल्याचा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात अशा नोंदी फारशा नसल्याचे म्हटले जात आहे. जगभरात गायी, शेळ्या किंवा मेंढ्यामध्ये अशा विचित्र रचनांची उदाहरणे अधून मधून आढळतात, पण नीलगायमध्ये ही घटना विशेष महत्त्वाची आहे. या घटनेमुळे घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याचे जैवविविधतेतील वेगळेपण अधोरेखित झाले आहे. वन्यजीवांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी हा दुर्मिळ प्रकार महत्त्वाचा ठरू शकतो. टिपेश्वर सारख्या अभयारण्यात अशी विलक्षण निसर्ग निर्मिती दिसणे हे अभयारण्याच्या समृद्ध जैवविविधतेचे निदर्शक आहे.








