यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : नियंत्रण सुटलेल्या बसमधील बचावलेल्या प्रवाशांना धीर देण्यासाठी आर्णी – केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी धाव घेतली. “देव तारी त्याला कोण मारी ” म्हणीचा प्रत्यय या घटनेदरम्यान प्रवाशांना आला.
सोमवारी सायंकाळी घाटंजी येथून आदिलाबाद (तेलंगणा) येथे मुक्कामी बस रवाना झाली होती. बसने घाटंजी शहराच्या बाहेर प्रस्थान करताच काही वेळाने बस चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. याबाबतची माहिती बसमधील प्रवाशांनी घाटंजी येथील महेश ठाकरे यांना दिली. त्यांच्या माध्यमातून घटनेची माहिती आमदार प्रा. राजू तोडसाम यांना समजली.
आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी आपला नियोजित कार्यक्रम सोडून मृत्युच्या दारातून बचावलेल्या प्रवाशांना धीर देण्यासाठी नुक्ती गावानजीक धाव घेतली. यावेळी त्यांचे सोबत घाटंजी भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मुज्जू पटेल हे होते. मुज्जू पटेल यांनी घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरे यांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. पेट्रोलींग ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस उप निरीक्षक मिश्रा आणि पोलीस उप निरीक्षक मडावी यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले.
प्रा. राजू तोडसाम यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेत सविस्तर विचारपूस केली. वाहन चालकाची प्रकृती ठिक नसल्याने एस. टी. बस मधील प्रवाशांना आपापल्या गावी जाण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी जनतेप्रती दाखवलेली तत्परता आणि माणुसकी सर्व प्रवाशी आणि नागरिकांना भाराहून गेली.
या वेळी महेश ठाकरे, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मुज्जू पटेल, पत्रकार अरविंद जाधव, आमदार राजू तोडसाम यांचे स्विय सहाय्यक अक्षय वातीले, कमलाकर नेवारे, गोलू आडे, टिनू शेंडे, अक्षय आत्राम, निकेश तांबारे तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.








