जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): पुर्वीच्या काळी सोशल मिडीया अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तरुण तरुणींच्या दृष्टीने ते रहात असलेले गाव अथवा त्यांची शाळा अथवा महाविद्यालय परिसर एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. एवढ्याच कार्यक्षेत्रात त्या काळातील त्या परिसरातील काही तरुण – तरुणींचे प्रेमप्रकरण फुलत आणि बहरत होते. एखाद्या तरुणीने एखाद्या तरुणाकडे फक्त कटाक्ष टाकला म्हणजे तो तरुण स्वत:ला धन्य समजत असे. त्या तरुणीचे आपल्यावर प्रेम जडल्याचे तो मनोमन समजत असे. त्या काळात सोशल मिडीया अस्तित्वात नसल्यामुळे प्रेमपत्र लिहिले जात होते. लिहिलेले प्रेमपत्र संबंधीत तरुण अथवा तरुणीकडे पोहोच करण्यासाठी कस लागत असे. पत्राचे उत्तर येण्यासाठी बराच वेळ अथवा काही दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र आता काळ बदलला आहे. आता सोशल मिडीया मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला आहे. त्यामुळे राजे महाराजांच्या काळातील कबुतरांचा अथवा हस्ते परहस्ते हस्तलिखीत प्रेमपत्र पाठवण्याचा जमाना केव्हाच संपला आहे. आता व्हाटसअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम असे विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्म उदयाला आले आहेत. या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दोन प्रेमी आपल्या संदेशाची देवाणघेवाण शुन्य मिनीटात केव्हा करतात याचा शेजारी बसणा-या व्यक्तीला थांगपत्ता अर्थात वारा देखील लागत नाही.

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील दहीगाव हे एक लहानसे गाव. जगाचा नकाशावर नजरेच्या टप्प्यातही येणार नाही असे हे दहीगाव नावाचे एक लहानसे गाव. या गावात ज्ञानेश्वर गजानन पाटील नावाचा अवघा एकोनीस वर्षाचा अर्थात टीन एजर तरुण रहात होता. या टीन एजर तरुणाला अर्थातच साधी मिसरुढही फुटलेली नव्हती. नावाप्रमाणे ज्ञानेश्वर असलेल्या ज्ञानेश्वरला मोबाईल हाताळण्याचे अगाध ज्ञान होते. इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर तो सक्रीय अर्थात अॅक्टिव्ह रहात होता. मजुरी करणारा ज्ञानेश्वर पदरमोड करुन त्याच्या मोबाईल नेट पॅकचा रिचार्ज न चुकता वेळेवर करत होता. मित्रांचे स्टेटस, मेसेजेस बघण्याचे बिन पगारी काम देखील तो न चुकता वेळेवर करत होता. ज्ञानेश्वरचे इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट होते. त्याच्या फ्रेंड लिस्ट मधे नागपूरची सोनाली (काल्पनिक नाव) नावाची एक अल्पवयीन मैत्रीण होती. इंस्टाग्रामच्या माध्यमातून दहीगावचा ज्ञानेश्वर आणि नागपूरची सोनाली हे दोघे एकेमेकांचे मित्र झाले. लवकरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले.
एके दिवशी नागपूरच्या अल्पवयीन सोनालीने ज्ञानेश्वरला भेटण्यासाठी दहीगावला येण्याचे निश्चित केले. ती खास ज्ञानेश्वरला भेटण्यासाठी रेल्वेने दहीगावला येण्यास एकटीच निघाली. तिला घेण्यासाठी अर्थात पिक अप करण्यासाठी ज्ञानेश्वर खास वेळ काढून दहीगाव येथून भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेला. दोन प्रेमी जीव भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रथमच एकमेकांना भेटले. ती त्याला भेटण्यासाठी खास नागपूर ते भुसावळ व भुसावळ ते दहीगाव असा प्रवास करुन आली. नागपूरची मॉडर्न अल्पयीन सोनाली दहीगाव या ग्रामीण भागात प्रथमच आली होती. दहीगावचा शेणा मातीने भरलेला रस्ता, बैलगाड्या, केळीचे बाग, सकाळी प्रातर्विधी करण्यासाठी हातात डबा धरुन जाणा-या काही महिला पुरुष आदींचे तिने जवळून दर्शन घेतले. शहरी आणि ग्रामीण भागातील जीवन तिने जवळून पाहिले. “पुरब और पश्चिम” या सिनेमातील “सायरा बानो” या नटी प्रमाणे तिने ग्रामीण भाषा ऐकून – समजून घेतली. दोन दिवस ग्रामीण जीवनशैली आणि ज्ञानेश्वरचे प्रेम हासिल करुन तीने पुन्हा नागपूरच्या दिशेने प्रयाण केले. या दोन दिवसात ज्ञानेश्वरला हायसे वाटले. जणू काही मिनी “ऐश्वर्या राय” आपल्या भेटीला आली आणि तिने आपल्याला भरभरुन प्रेम दिले असे त्याला वाटत होत्ते. दहीगाव येथील ज्ञानेश्वर नावाच्या तरुणासोबत आपले प्रेम जडल्याचे तिने घरी आईवडीलांना सांगितले. तेव्हा कोणते दहीगाव आणि हे शहर कुठे येते असा प्रश्न तिला तिच्या आई वडीलांनी केला. दहीगाव हे शहर नसून एक गाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात सातपुडा डोंगरानजीक वसले असल्याचे तिने तिच्या आई वडीलांना कथन केले. मात्र तिच्या आई वडीलांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केला. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. तिला दहीगावला येण्याची ओढ लागली. काही दिवस असेच निघून गेले. तिचे घरी नागपूरला काही मन रमेना. त्यामुळे ती पुन्हा दहीगाव येथे येण्यास निघाली.

यावेळी देखील ज्ञानेश्वर तिला पिक अप करण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेला. दोघे सोबतच दहीगावला आले. यावेळी जवळपास पंधरा दिवस ती दहीगाव येथे मुक्कामी राहीली. दहीगाव येथील तरुणाचे लग्न नागपूर येथून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत होणार असल्याची माहिती यावल पोलिसांना समजली. त्यामुळे यावल पोलिसांनी तिला जळगाव येथे बाल सुधार गृहात दाखल केले. त्यांनंतर तिच्या आई वडीलांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानेश्वर आणि सोनाली या दोघा प्रेमीजीवांची जणू काही ताटातुट झाली. ते एकमेकांपासून बिछडले. त्यानंतर दोघांचे मोबाईलवर बोलणे होऊ लागले. “नैनोसे कह दे दिन रात ना बहना” असा संदेश देत त्याने तिला धीर धरण्यास सांगितले. या सर्व घडामोडी अर्थात एपीसोड नंतर ज्ञानेश्वर पुणे येथे कामधंदा करण्यास निघून गेला. दहीगाव सोडून तो पुणे येथे राहू लागला.
मात्र ज्यावेळी तो पुणे येथून घरी दहीगाव येथे परत आला त्यावेळी त्याला नातेवाईक आणि मित्रांकडून वेगळीच माहिती समजली. ज्या सोनालीवर तो जीवापाड प्रेम करत होता तिचे दहीगाव येथीलच तुषार लोखंडे, इमरान पटेल आणि अजून एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे त्याला समजले. त्यामुळे तो मनातून खचला. आपला प्रेमभंग झाल्याचे शल्य त्याला बोचू लागले. त्याने संतापाच्या भरात तिला फोन लावून तिला चांगलेच खडसावले. तिला अद्वातद्वा बोलून त्याने त्याच्या मनातील सर्व आग तिच्याकडे ओकली. मनातील गरळ अर्थात “दिल की भडास” त्याने बाहेर काढली. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले आणि तु पंधरा दिवसांच्या मुक्कामात दहीगावातील दुस-या मुलांसोबत सुत जुळवून घेतले, मला साधी भणक देखील लागू दिली नाही असे म्हणत त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वरने तिच्यासोबत अबोला धरला. तो कमी अधिक प्रमाणात देवदास बनला. ” न तु जमी के लिये है ना आसमा के लिये” अशी त्याची गत झाली. तो उदास मनाने पुन्हा पुणे येथे कामधंदा करण्यासाठी निघून गेला. मात्र तिच्या सहवासाचे क्षण त्याच्या नजरेसमोरुन जात नव्हते. कोण होतीस तु? का आली माझ्या जीवनात? का मला वेड लावले? असे प्रश्न तो स्वत:च्या मनात सोनालीस विचारत होता.




ज्ञानेश्वर पुणे येथे गेल्यानंतर सोनाली पुन्हा एकवेळा दहीगाव येथे आली. परतीच्या प्रवास भाड्यासाठी तिला तुषारने पैसे दिले आणि इमरान पटेल हा तिच्यासोबत नागपुर पर्यंत गेला होता अशी माहिती ज्ञानेश्वरला समजली. त्यामुळे तो मनातून अजूनच खचला. गावातील इमरान पटेल हा तिचा पिच्छा पुरवत असल्याची माहिती ज्ञानेश्वरला समजली. त्यामुळे त्याला इमरानवर राग आला. एकट्या सोनालीवर प्रेम करणा-यांची संख्या जवळपास तिन ते चार झाली होती. त्या यादीत ज्ञानेश्वरसह गावातील तुषार लोखंडे, इमरान पटेल आणि अजून एक जण असे तिन ते चार जणांचा समावेश होता.
या सर्व गोष्टी ऐकून ज्ञानेश्वरचे पुणे येथे काही मन रमत नव्हते. त्याच्या मनात नेहमी सोनाली आणि तिच्यावर प्रेम करणारे इतर तरुण यांचे विचार येत होत्ते. इमरान हा तिच्यासोबत बळजबरी करत असल्याची त्याला माहिती मिळाली. त्यामुळे तो फास्ट ट्रेनने पुणे येथून भुसावळ आणि तेथून दहीगाव येथे आला. तु मला भेटण्यासाठी आत्ताच्या आता नागपूर येथून दहीगावला ये असे फर्मान त्याने सोनालीस सोडले. तु जर मला भेटण्यासाठी दहीगावला आली नाही तर मी जीव देईन आणि तुझ्यासह तुझ्या घरातील सदस्यांची नावे पोलिसांना सांगून टाकीन असा त्याने तिला दम दिला. त्यामुळे सोनाली यावल येथे आली मात्र ज्ञानेश्वरला भेटली नाही. ती फक्त इमरान यास भेटली आणि निघून गेली. याचा अर्थ ती आपल्यापेक्षा इमरानवर प्रेम करत असल्याची ज्ञानेश्वरला जाणीव झाली. त्यामुळे इमरान हा आपल्या आणी सोनालीच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे त्याला समजले. इमरान हा ज्ञानेश्वरच्या नजरेत खलनायक झाला होता. त्यामुळे या खलनायक इमरानला कायमचा धडा शिकवण्याचे ज्ञानेश्वरने ठरवले.
दहीगाव येथीलच तुषार लोखंडे या तरुणाची देखील गत अशीच काहिशी होती. तुषार लोखंडे या तरुणाचे देखील ज्ञानेश्वर पाटील प्रमाणेच नागपूरच्या सोनालीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. एकट्या सोनालीच्या भोवती श्वान पथकाप्रमाणे दहीगाव येथील ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे, इमरान पटेल आणि अजून एक जण असे सर्वजण घुटमळत होते. तुषारच्या मोबाईलचा वापर करुन इमरान हा सोनालीसोबत बोलत होता. आपल्या ऐवजी इमरान हा सोनालीसोबत लग्गा लावत असल्याचे बघून तुषारला इमरानचा राग येत होता.
ज्ञानेश्वर पाटील याचा दहीगाव येथील एक मित्र होता. पुरुषोत्तम सोनवणे असे त्याच्या मित्राचे नाव होते. पुरुषोत्तम सोनवणे याचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. ती मुलगी पाठवत असलेले व्हाटस अॅप मेसेज अज्ञानी पुरुषोत्तमला वाचता येत नव्हते. त्यामुळे तो ते मेसेज त्याच्या एका मित्राकडून समजून घेत तिला उत्तर देत असे. पुरुषोत्तम त्या मुलीसोबत पुरुषोत्तमचे प्रेम प्रकरण सुरु असल्याची कुणकुण इमरान पटेल याला लागली. या प्रेम प्रकरणात देखील इमरान हा खलनायकाची भुमिका साकारत होता. त्याने त्या मुलीच्या घरी खरा प्रकार सांगून टाकला. त्यामुळे पुरुषोत्तमसोबत आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण आकार घेत असल्याची माहिती तिच्या आई वडीलांना समजली. त्यामुळे तिच्या घरात वाद सुरु झाले आणी तीला बेदम मारहाण झाली व दोघांच्या प्रेमप्रकरणाला ब्रेक लागला. अशा प्रकारे पुरुषोत्तम आणि त्याच्या प्रेयसीच्या वाटेत इमरान हा अडथळा म्हणून पुढे आला. अशा प्रकारे दहीगाव येथील ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे या तिन तरुणांच्या प्रेम प्रकरणात इमरान पटेल हा एक प्रकारे व्हिलनच्या रुपात वावरत होता. तो तिघांच्या प्रेमिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. तिघा तरुणांच्या दोघा प्रेमिकांसोबत संबंध वाढवून इमरान आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे एकाच वेळी ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे हे तिघे तरुण त्याच्यावर राग धरुन होते. “शत्रुचा शत्रु हा आपला मित्र” या न्यायाने ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे हे तिघे तरुण एकत्र आले. तिघांनी मिळून इमरान पटेल याचा काटा काढण्याचे निश्चित केले.


29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे हे दोघे एकमेकांना भेटले. त्या कालावधीत काही वेळासाठी त्यांची भेट इमरानसोबत झाली. थोडा वेळाने इमरान तेथून निघून गेला. इमरान निघून गेल्यानंतर पुरुषोत्तम सोनवणे याने त्याच्या हातातील चांदीची अंगठी मोडून पैशांची व्यवस्था केली. त्या रकमेतून त्याने त्याची काही कामे पुर्ण केली. त्यानंतर दोघे एका हॉटेलमधे मद्यप्राशन करण्यासाठी गेले. मद्य प्राशन केल्यानंतर दोघे यावल बस स्थानक परिसरात आले. त्याठिकाणी त्यांना इमरान पटेल व तुषार लोखंडे असे दोघे जण सोबत भेटले. त्यामुळे आता ज्ञानेश्वर पाटील, पुरुषोत्तम सोनवणे, तुषार लोखंडे, इमरान पटेल असे चौघे जण एकत्र जमले होते. त्यात अजून एका तरुणाची भर पडली व एकुण पाच जण झाले. एकुण पाच जण जमल्यानंतर पाचही जण एका हॉटेलमधे मद्यप्राशन करण्यास बसले. सम विचारी ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे या तिघांच्या मनात खलनायक इमरान पटेल बद्दल बदल्याची आग होती. मद्यप्राशन आटोपल्यानंतर पाचवा तरुण त्याच्या घरी निघून गेला.
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील, पुरुषोत्तम सोनवणे, तुषार लोखंडे व इमरान पटेल असे चौघे जण मोटार सायकलने यावल येथून दहीगाव येथे आले. दहीगाव येथील चौधरी वाडयानजीक सिमेंटच्या दुकानाजवळ ज्ञानेश्वरने मोटार सायकल उभी केली. इमरान पटेल व पुरुषोत्त्म सोनवणे या दोघांना थोडा वेळ खाली उतरण्यास सांगण्यात आले. तुम्ही थोडा वेळ थांबा आम्ही लगेच परत येतो असे म्हणत ज्ञानेश्वर पाटील याने तुषार लोखंडे याला सोबत घेत मोटार सायकलने त्याचे घर गाठले. घरी येताच ज्ञानेश्वरने त्याच्या घरात लपवून ठेवलेला धारदार कोयता तुषारच्या ताब्यात दिला. लागलीच दोघे जण पुरुषोत्तम आणि इमरान या दोघांजवळ आले. पुन्हा चौघे जण मोटार सायकलवर एकत्र बसले. दरम्यान तुषारने तो कोयता गुपचुप पुरुषोत्तमच्या ताब्यात बेमालुमपणे दिला. मोटार सायकलवर चालकाच्या रुपात ज्ञानेश्वर पाटील बसला होता. त्याच्या मागे तुषार लोखंडे, त्याच्या मागे पुरुषोत्तम सोनवणे आणि सर्वात मागे इमरान पटेल असे चौघे बसले होते.
दहिगावच्या पुढे विरावली गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत खिरवा गाड रस्त्याजवळ ज्ञानेश्वर पाटील याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल उभी केली. त्यावेळी परिसरात रात्रीची स्मशान शांतता पसरली होती. आता इमरान पटेल याची मरणाची घटीका अगदी समीप आली होती. त्याचे तिघे हल्लेखोर एकाच विचाराने एकत्र जमले होते. पुरुषोत्तम सोनवणे याने त्याच्याकडील कोयत्याचा पहिला वार मद्याच्या नशेतील इमरान पटेल याच्या मानेवर केला. कोयत्याचा पहिला वार होताच इमरान पटेल रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. इमरानवर कोयत्याचा दुसरा व तिसरा हल्ला अनुक्रमे ज्ञानेश्वर पाटील व तुषार लोखंडे या दोघांनी केला.
इमरान मयत झल्याची खात्री होताच त्याला तशाच अवस्थेत सोडून तिघे जण मोटार सायकलने माघारी फिरले. वाटेत पुरुषोत्तम सोनवणे याने रक्ताने भरलेला कोयता लपवला. त्यानंतर तिघे जण यावल येथे आले. ज्ञानेश्वरने तुषारला भुसावळ रस्त्यावर सोडून देत पुरुषोत्तमसह बस स्थानक गाठले. त्याठिकाणी एकाने दोघांना घाबरलेल्या अवस्थेत बघून काय झाले अशी विचारणा केली. त्यावर आम्ही मर्डर करुन आलो असून पोलिस स्टेशनला जमा होण्यास जात असल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे हे दोघे तरुण स्वत:हून यावल पोलिस स्टेशनला दाखल झाले. त्यांनी ठाणे अंमलदाराला आम्ही एकाचा मर्डर करुन आल्याचे सांगितले. इमरान युनुस पटेल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे देखील दोघांनी पोलिसांना सांगितले. खून झाला आणि खूनी स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर झाल्याचे ऐकून संबंधीत ठाणे अंमलदार देखील काही वेळासाठी अवाक झाले. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना सांगितली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दोघे संशयीत तरुण व आपले सहकारी …. यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. विरावली रस्त्यावर घटनास्थळी इमरान पटेल या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस उप अधिक्षक अनिल बडगुजर यांनी देखील आपले सहका-यांसह घटनास्थळ गाठत अधिकारी व कर्मचारी वर्गाला तपासकामी महत्वाच्या सुचना दिल्या. मारेकरी स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर झाले असले आणी वरवर तपास सोपा वाटत असला तरी हा किचकट तपास पुर्ण करण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अनिल महाजन यांच्यावर आली.
मयत इमरान पटेल याचे वडील युनुस इसा पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 357/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 3 (5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. शव विच्छेदन, घटनास्थळ पंचनामा, मृतदेह पंचनामा, फॉरेन्सिक लॅब पथकाचा तपास आदी सोपास्कार पुर्ण करण्यात आले.
अटकेतील ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे या दोघांना यावल येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. एस. जगताप यांच्या न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. सुरुवातीला दोघांना न्यायालयाने 4 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा पाच दिवसांची 8 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान तपासात या गुन्ह्यात तुषार राजेश लोखंडे या तरुणाचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली. अशा प्रकारे या गुन्ह्यातील संशयीत आरोपींची संख्या तिन झाली. तपासादरम्यान पुढे आलेल्या तरुणांच्या प्रेम प्रकरणाचा धागा पकडून संबंधीत मुलींची देखील चौकशी करण्यात आली.
पोलिस उप निरीक्षक अनिल महाजन यांनी आपले कसब पणाला लावत या गुन्ह्याचा तपास पुढे रेटून नेला. तांत्रीक तपासाची मदत घेत संशयीतांनी गुन्हा करण्यापुर्वी व गुन्हा केल्यानंतरच्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली व दोघा अल्पवयीन मुलींसोबत संशयीतांसह मयत इमरान पटेल याचा आलेला संबंध अशी कडी जुळवण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उप अधिक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, पोलिस उप निरीक्षक अनिल महाजन, पोलिसकर्मी सागर कोळी व राजेंद्र पाटील यांनी केला. पुढील अधिक तपास पोलिस उप निरीक्षक अनिल महाजन करत आहेत.








