जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोड्यांचे दोन आणि मोटार सायकल चोरीचा एक असे एकुण तिन गुन्हे उघडकीस आणले आहेत. यापैकी घरफोडीच्या एका गुन्ह्यातील 35 लाख 70 हजार रुपये किमतीचे 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 25 हजार रुपये किमतीचे 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकुण 36 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय अजुन एका घरफोडीसह मोटार सायकल चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. या तिघा गुन्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
रवी प्रकाश चव्हाण (तांबापुरा जळगाव), शेख शकील शेख रफीक (सालार नगर जळगाव), जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. शिरसोली) आणि गुरुदयालसिंग मनजीत टाक (तांबापुरा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील न्यु पार्वतीबाई काळे नगर मोहाडी नगर परिसरात जून महिन्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास सुरु होता.
दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील एपीआय भुषण कोते, पोलिस कर्मचारी अनिल सोननी व नितेश बच्छाव, चालक प्रमोद प्रमोद पाटील अशांचे पथक रात्र गस्तीवर तैनात होते. गस्ती दरम्यान दोघे संशयीत तरुण गस्ती पथकाच्या नजरेस पडले. पोलिसांचे वाहन बघून ते घाबरले. पोलिस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन घरफोड्या आणि एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा कबुल केला. याशिवाय त्यांच्या दोघा साथीदारांची नावे देखील कथन केली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील स.पो.नि. भुषण कोते, पोलिस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, पोलिस नाईक योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पो.कॉ. अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दिपक वंजारी, चालक हवालदार प्रमोद पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.






