जळगाव : जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म या फार्म हाऊसवर आज दुपारी अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या अधिपत्याखाली पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी ऑनलाईन कॉल सेंटर सुरु असल्याचे आढळून आले. फार्म हाऊसचे मालक माजी महापौर ललित कोल्हे यांना चौकशीकामी पोलिस पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता अद्याप पोलिस पथक घटनास्थळावरच असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह एकुण आठ जण पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी कॉल सेंटरचा सेट अप पोलिसांना आढळून आला. कॉल सेंटरच्या माध्यमातून मोबाईल धारकांना विविध आमिष दाखवून त्यांचा डेटा संकलीत करण्यासह फसवणूकीचे काम या फार्म हाऊसवर सुरु होते असे सांगण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अधिक तपास सुरु आहे.






