जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे बिल काढण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामपंचायतीचा करारनामा देण्याच्या बदल्यात 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्विकार प्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात हा सापळा रचण्यात आला होता. भानुदास पुंडलिक मते (सरपंच – रिंगणगांव ता. एरंडोल), समाधान काशिनाथ महाजन (ग्रा.प. सदस्य महिलेचे पती – खासगी इसम) आणि संतोष नथ्थु पाटील (खासगी इसम) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी संतोष नथु पाटील यास लाचेची रक्कम स्विकारतांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सुरुवातीला भानुदास मते आणि समाधान महाजन या दोघांकडून एक लाख रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 80 हजार रुपये देण्याघेण्याचे निश्चित झाले होते.
या घटनेतील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे त्यांनी काम पुर्ण केले होते. या कामाची उर्वरीत रक्कम मिळण्याकामी त्यांचा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु होता. हे काम ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांचा करारनामा अपुर्ण होता. त्यामुळे ठेकेदाराचे बिल प्रलंबित होते. हस्तांतर करारनामा करुन देण्यासाठी हे लाच प्रकरण घडले. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी स्मिता नवघरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना बाळु मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.






