जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): महिलांना नादी लावणे, त्यांच्याशी मैत्री करणे, नादी लागलेल्या महिलांकडून पैसे उधार घेणे, त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणे, त्यांच्या अंगावरील दागिन्यांवर नजर ठेवून त्यांचा खून करणे असे प्रकार अनिल संदानशिव करत होता. विशेष म्हणजे त्याच्या भुलथापांना महिला बळी पडत होत्या. गोड बोलून तो ठराविक महिलांना टार्गेट करत होता. विविध आमिष दाखवून तो महिलांवर मैत्रीचे जाळे फेकायचा. त्यांच्यासोबत सुरुवातीला मैत्री करायचा. त्यानंतर तो त्यांना जंगल परिसरात एकांतात समागम करण्यासाठी नेत असे. समागम करतांना हळूहळू त्याची दुष्ट नजर त्या महिलांच्या दागिन्यांवर पडू लागली. समागमाच्या बहाण्याने जंगलात एकांतात आलेल्या महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा कुविचार त्याच्या मनात एके दिवशी चमकून गेला. त्या दृष्टीने त्याने नियोजन सुरु केले. दुष्ट नजरेतून दुष्ट विचार मनात आलेल्या अनिल संदानशिव याच्या हातून एकामागून एक गुन्हे घडत गेले आणि तो पोलिसांच्या हाती लागला आणि अखेर गजाआड गेला. जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील अनिल गोविंदा संदानशिव या सिरिअल किलरची ही कर्मकहानी….

पारोळा तालुक्यातील सुमठाणे या लहानशा गावात अनिल गोविंदा संदानशिव हा तरुण रहात होता. त्याचे वडील गोविंदा खेमा संदानशिव हे वन विभागात नोकरीला होते. तो रहात असलेल्या अमळनेर आणि पारोळा परिसरातील जंगल परिसराची त्याला चांगल्याप्रकारे माहिती होती. सुमारे सात वर्षापुर्वी त्याचे वडील वारले होते. अविवाहीत अनिल याच्यासह घरात त्याचा लहान भाऊ आणि विधवा आई असे तिघे रहात होते. लफडेबाज अनिल संदानशिव याची ओळख एके दिवशी नजिकच्या एरंडोल तालुक्यातील माहेरवाशीन असलेल्या वैजंताबाई भोई या महिलेसोबत झाली. विवाहानंतर वैजंताबाई सुरत येथे सासरी गेली. वैजंताबाई अधुनमधून माहेरी येत होती. त्यावेळी तिची अनिल संदानशिव याच्यासोबत भेट होत असे. दोघांमधे एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित होत असत. शरीरसुखासह जोडीला मिळणारे पैसे या दुहेरी हेतूने ती अनिलच्या संपर्कात आली होती.
एके दिवशी अनिलने तिला सुरत येथून गावी येण्यास सांगितले. त्या दृष्टीने तिने नियोजन सुरु केले. घरात कुणाला काही न सांगता 4 मे 2025 रोजी ती बसने सुरत येथून धुळे येथे येण्यास निघाली. प्रवासादरम्यान तिचा अनिलसोबत मोबाईलवर संपर्क सुरु होता. ठरल्यानुसार 5 मे 2025 रोजी भल्या पहाटेपासून अनिल तिची धुळे बस स्थानकावर वाट बघत होता. पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान ती धुळे बस स्थानकावर उतरली. धुळे बस स्थानकात आल्यानंतर तिने पहिला फोन अनिल यास लावला. मी धुळे बस स्थानकात आली असून तुम्ही कुठे आहात? असे तिने त्याला विचारले. तिचा फोन येताच जवळपास असलेला अनिल तिच्या जवळ गेला. त्यानंतर जवळच असलेल्या बाकावर दोघे बसले. पहाटे चार वाजेपर्यंत दोघांनी एकमेकांसोबत गुलुगुलू गप्पा केल्या.

या कालावधीत अनिलची पारखी नजर तिच्या अंगावरील दागिन्यांवर खिळून होती. तिच्या अंगावरील दागिने त्याला खुणवत होते. तिच्या अंगावरील दागिने हस्तगत करणे हेच त्याचे मुख्य उद्दीष्ट होते. तत्पुर्वी तिच्यासोबत शरीरसुखाचा आनंद लुटण्याचे त्याचे नियोजन होते. पहाटे चार वाजता धुळे बस स्थानकात चोपडा या गावी जाणा-या बसची उद्घोषणा झाली. या बसने वाटेत जानवे या गावी उतरुन परिसरातील जंगलात समागम करण्यासाठी जाण्याचे दोघांचे नियोजन होते. त्यामुळे दोघे जण जानवे येथे जाण्यासाठी चोपडा जाणा-या बसमधे बसले. मात्र ती जलद बस होती. त्यामुळे ही बस लहान गावांना थांबणार नाही हे वाहकाने प्रवाशांना अगोदरच बजावले. बस वाहकासोबत चर्चा करुन अनिलने अमळनेरचे तिकीट काढून जानवे या गावी बस उभी करण्याची विनंती केली. त्यानुसार पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोघे जण जानवे या गावानजीक उतरले. पहाट होण्यापुर्वी अंधारातच दोघे पायी चालत चालत जानवे जंगलातील झाडाझुडूपात गुपचूप गेले. त्याठिकाणी उतावीळ झालेल्या दोघांनी एकमेकांच्या मर्जीने शरीरसुखाचा आनंद लुटला. शरीरसुखाचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर अनिलच्या अंगातील हैवान जागा झाला. वैजंताबाईच्या अंगावरील दागिने काढून घेण्यासाठी त्याने जवळच पडलेला लाकडी दांडका तिच्या डोक्यात हाणला. जखमी होत तडफडत तिने आपले प्राण सोडले. शरीरसुखाच्या आशेने आलेली वैजंताबाई प्राणघातक हल्ल्यात ठार झाली. नियतीने लिहून ठेवलेल्या मृत्युच्या जागेवर ती स्वत:हून सुरत ते धुळे आणि धुळे ते जानवे असा बसने प्रवास करुन पायी पायी जानवे येथील जंगलात आली होती. वैजंताबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर अनिलने तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. याशिवाय तिच्याजवळ असलेल्या पिशवीतील रोख तिस हजार रुपये देखील काढून घेतले. रोख रक्कम आणि सोन्याच्या बाळ्या असा ऐवज घेत त्याने तेथून धुम ठोकली. अमळनेर येथील एका सराफाला त्या सोन्याच्या बाळ्या त्याने चाळीस हजार रुपयांना विक्री केल्या. अशाप्रकारे सत्तर हजार रुपयांची रोकड त्याच्या हाती आली.
या घटनेनंतर महिलांच्या अंगावरील दागिने लुटणे, त्यांच्याकडून गोड बोलून पैसे उधार घेणे, त्यांच्याकडुन शरीरसुख घेण्याची अनिलची हाव वाढतच गेली. जंगल परिसरात एकांतात महिलांचे दागिने लुटल्यानंतर त्यांच्या खूनाच्या घटनेचा कुणाला थांगपत्ता लागत नाही, या घटनेचे कुणी साक्षीदार नसतात, महिला आपल्याला प्रतिकार करु शकत नाही आणि आपण कधी पकडले जाणार नहीं असा त्याचा समज झाला. त्याचे धाडस देखील वाढले.

त्यानंतर काही दिवस निघून गेले. दरम्यानच्या कालावधीत सुरत येथून कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेल्या वैजंताबाईचा शोध तिचे नातेवाईक घेत होते. बरीच वाट बघून आणि शोध घेऊनही ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिचा मुलगा गणेश भोई याने सुरत येथील चौक बाजार पोलिस स्टेशनला ती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे 17 मे 2025 रोजी चौक बाजार पोलिस स्टेशनला वैजंताबाई बेपत्ता झाल्याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली. या मिसींगचा तपास सुरत येथील चौक बाजार पोलिस करत होते. वैजंताबाईचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जंगल परिसरात निर्मनुष्य जागी पडून होता. त्याकडे बरेच दिवस कुणाचे लक्ष गेले नाही. दरम्यानच्या कालावधीत आपला खून पचला अशा अविर्भावात उजळ माथ्याने अनिल संदानशिव वावरत होता. त्याचे धाडस अजूनच वाढले.
अनिल संदानशिव याची अमळनेर शहरात भिक्षा मागणारी ओळखीची एक महिला होती. शहनाजबी इकबाल शेख असे त्या चाळीस वर्ष वयाच्या भिक्षेकरी महिलेचे नाव होते. अमळनेर शहरात भिक्षा मागून ती स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. ती भिक्षा मागणारी महिला असली तरी तिने सत्तर हजार रुपये गाठीशी जमा केले होते. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे तिने ते सत्तर हजार रुपये अनिल संदानशिव याला उधार दिले होते. गोड बोलून घेतलेले सत्तर हहार तो तिला देत नव्हता. तिला तिचे पैसे देण्यास अनिल टाळाटाळ करत वेळ मारुन नेत होता. उधार दिलेले सत्तर हजार रुपये परत मिळण्यासाठी तीचा अनिलकडे तगादा सुरु होता. तिच्या तगाद्यापासून सुटका करण्यासाठी त्याने त्याचा नेहमीचा फॉर्म्युला वापरण्याचे मनाशी ठरवले. तिचे पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला जंगलात समागमासाठी घेऊन जायचे आणि तेथेच तिचा खून करायचा असे त्याने मनाशी निश्चित केले. त्याने गोड बोलून तिला म्हटले की मी तुला तुझे पैसे परत देतो, तु माझ्यासोबत जंगलात चल. आपल्याला आपले पैसे परत मिळतील या आशेने ती त्याच्यासोबत जंगलात जाण्यास तयार झाली.

19 जून 2025 रोजी भर दुपारी तो तिला मोटार सायकलवर बसवून पैसे देण्याच्या बहाण्याने लांब जंगलात नेत होता. त्याचवेळी त्याच्या एका परिचिताने दोघांना मोटार सायकलवर डबलसिट जातांना पाहिले. अनिल संदानशिव याला तो इसम चांगल्याप्रकारे ओळखत होता. त्याला त्याची सवय माहिती होती. अनिल संदानशिव हा शहनाजबी सोबत कोणते सुख घेण्यासाठी जात आहे हे त्या इसमाने ओळखले. त्यामुळे त्याने लागलीच अनिल संदानशिव यास त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मोबाईलवर कॉल आल्यामुळे अनिल संदानशिव याने भरधाव वेगातील मोटार सायकलवर उभी केली. पलीकडून बोलणा-या त्या परिचिताने त्याला विचारले की “तु कुठे आहेस? आणी तुझ्यासोबत कोण आहे?” त्यावर अनिल संदानशिव याने त्याला उत्तर दिले की माझ्यासोबत शहनाजबी असून मी पिंपळकोठा रस्त्यापासून जंगलाकडे जाणा-या रस्त्याच्या कोप-यावर उभा आहे. त्यावर पलीकडून बोलणा-या त्या परिचिताने त्याला म्हटले की तु जेथे आहे तेथे थांब मी देखील तुमच्यासोबत येतो. त्यामुळे अनिल संदानशिव हा त्या परिचिताची वाट बघत शहनाजबी हिच्यासोबत थांबला. काही वेळातच तो परिचीत त्याठिकाणी मोटारसायकलने आला. तेथून तिघे जण जंगलात गेले. त्याठिकाणी त्या परिचिताने शहनाजबी हिला बाजूला नेऊन तिला खासगीत काहीतरी सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यानंतर शहनाजबी तेथून अनिल संदानशिव याच्याकडे आली. ती त्याला तिच्या सत्तर हजार रुपयांची मागणी करु लागली. तु जर मला माझे सत्तर हजार रुपये दिले नाही तर मी तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे ती त्याला म्हणू लागली.

तिचे बोलणे ऐकून अनिल संदानशिव याच्या रागाचा पारा चढला. त्याने जवळच असलेला लाकडी दांडका उचलून शहनाजबी हिच्या डोक्यात मारला. त्यात ती मोठ्या प्रमाणात जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. अनिल संदानशिव संतापल्याचे बघून ती जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत धरुन सैरावैरा पळत सुटली. तिच्याप्रमाणेच अनिलच्या ओळखीचा जंगलात आलेला तो परिचीत देखील घाबरला. तो पळून जात असलेल्या शहनाजबी हिला मोटार सायकलवर बसवून निघून गेला. त्यानंतर काही दिवस शहनाजबी हिने दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेतले. 27 जून रोजी तिला दवाखान्यातून सुटी मिळाली. त्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अनिल संदानशिव याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गु.र.नं. 261/2025, बी.एन.एस. कलम 109 (1), 351 (3) अन्वये 3 जुलै 2025 रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आला. जखमी शहनाजबी वैद्यकीय उपचारानंतर बरी झाली. तिचे दैव बलवत्तर होते म्हणून ती अनिलच्या तावडीतून बचावली आणि जीवंत राहिली. सत्तर हजार रुपये परत मिळण्याच्या आशेने ती अनिल सोबत जात होती.
ज्याप्रमाणे अनिल याने शहनाजबी हिच्याकडून सत्तर हजार रुपये उधार घेतले होते. त्याप्रमाणे त्याने पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी या महिलेकडून तिस हजार रुपये उधार घेतले होते. शोभाबाई ही महिला पारोळा शहरात विविध ठिकाणी झाडू पोछा करुन आपला उदरनिर्वाह करत होती. ती देखील अनिल संदानशिव याला तिस हजार रुपये उधार देऊन फसली होती. ती तिचे तिस हजार रुपये घेण्यासाठी अनिलकडे तगादा लावत होती. तिच्यापासून सुटका करुन घेण्यासह तिच्या अंगावरील दागिने गायब करण्यासाठी तिचा खून करण्याचे त्याने नियोजन केले.
सुरतच्या वैजंताबाईचा त्याने केलेला पहिला खून अजून उघड झाला नव्हता. अमळनेरच्या शहनाजबी हिचा दुसरा खून होण्यापुर्वी ती जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यामुळे ती बचावली. आता पारोळा येथील शोभाबाई हिचा खून करुन तिच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचा त्याचा विचार होता. असे केल्यामुळे तिच्या तगाद्यापासून आपली सुटका होईल असे त्याला वाटत होते. शहनाजबी हिला जखमी केल्यानंतर सहा दिवसांनी 24 जून 2025 रोजी अनिल याने शोभाबाई सोबत संपर्क साधला. तो तिच्याशी गोड बोलू लागला. तिचे तिस हजार रुपये परत देण्याचे आमिष दाखवत गोड बोलून तो तिला मोटार सायकलने पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवार परिसरातील जंगलात घेउन गेला.

सुमठाणे शिवारातील जंगलात दोघांनी आनंद घेतल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला मोठ्या प्रमाणात जखमी केले. दगडाच्या घावात शोभाबाई जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळली. शोभाबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तिचा चेहरा प्लॅस्टीकच्या गोणीने बांधून त्याने दागिन्यांसह तेथून पलायन केले. ते दागिने त्याने अमळनेर येथील एका सराफाला नव्वद हजार रुपयात विक्री केले. अमळनेर तालुक्यातील जंगलात वैजंताबाईच्या खूनाप्रमाणेच पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईच्या खूनाचा गुन्हा देखील पचणार असे त्याला वाटत होते. अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील वैजंताबाईच्या खूनाला जवळपास एक महिना झाला तरी त्याचा कुणाला थांगपत्ता लागला नाही. तिचा मृतदेह तसाच पडून होता. त्यामुळे तो कुजत होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर अनिल संदानशिव याने पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईचा दुसरा खून केला. मात्र या खूनाची लगेच दुस-या दिवशी वाच्यता झाली.
25 जून 2025 रोजी सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात काही गुराख्यांना शोभाबाईचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या दृष्टीने तो मृतदेह अनोळखी महिलेचा होता. मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती. त्या गुराख्यांनी या मृतदेहाची खबर सुमठाणे गावचे पोलिस पाटील वालजी पाटील यांना दिली. पोलिस पाटील वालजी पाटील यांनी याबाबत बहादरपूर बिट अंमलदार अशोक सातपुते यांना कळवले. या घटनेची माहिती पारोळा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्यापर्यंत आली. त्यांनी या घटनेची माहिती डिवायएसपी विनायक कोते यांच्या कानावर टाकली. अशा प्रकारे या मृतदेहाच्या माहितीमुळे पुढील तपासाची सुत्रे गतीमान झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली. वाटेत पोलिस पाटील यांना सोबत घेण्यात आले. घटनास्थळी जंगलातील झाडाझुडूपात शोभाबाईचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी महिलेचा तो मृतदेह साधारण 35 ते 40 वयोगटातील होता. सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सीक पथकाला बोलावून घेतले. मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने झाकलेला होता. ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार अशोक सातपुते यांनी पारोळा पोलिस स्टेशनला 26 जुन रोजी अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा भाग 5 गु.र.नं. 154/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पुढे सरकण्यासाठी सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली. जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसींग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला. मात्र कुठेही तशा स्वरुपाची नोंद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह गुप्त बातमीदार कामाला लावले. मयत महिलेच्या पायात असलेली धातुची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रथेनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय विविध व्हॉटस अॅप गृपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंदण, कानातील रिंग आदींची माहिती प्रसारीत करुन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपुर्वी कोणत्या तरी मंदीरात दर्शनासाठी जावून आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदीर परिसरात विक्री होतो त्याची देखील ओळख पटवण्याकामी माहीती घेण्यात आली. याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डमडाटा संकलीत करण्यात आला. मात्र महिलेची ओळख पटत नव्हती. सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु असतांना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शोभाबाई रघुनाथ कोळी ही 48 वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारोळा पोलिसांना लागली. या गाव परिसरातील गावक-यांमधे देखील हीच चर्चा सुरु होती. हाच धागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली.

घटना उघडकीस आल्यानंतर तिन दिवसांनी 28 जुन रोजी दोन इसम पोलिस स्टेशनला आले. त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेडा येथील तरुणाने पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले की मी तुमची शोध पत्रिका वाचली असून त्यातील नमुद महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मिळतेजुळते आहे. माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुणी भांडी, झाडू पोछा करण्यासाठी जाते. मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेला होता. तेथून घरी परत आल्यावर मला माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. आपण प्रसारीत केलेल्या शोध पत्रीकेतील महिलेचा फोटो आणि मृतदेह मला दाखवल्यास मी ओळखू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हिच होती. अशा प्रकारे मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला. मात्र असे असले तरी तिची हत्या कुणी केली? कशासाठी केली? हा महत्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरु झाले.
मयत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलीत करण्यात आला. तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातीलच संशयीत अनिल गोविंदा संदानशिव या तरुणासोबत झाले असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे संशयाची सुई आता अनिल संदानशिव या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलिस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल संदानशिव याचा शोध घेण्याकामी सुमठाणे गावात गेले. मात्र तो गावातून फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच बळावला. त्यामुळे पारोळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अनिल संदानशिव याच्या मागावर रवाना झाले होते.

दरम्यानच्या कालावधीत अनिल संदानशिव याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याची तक्रार अमळनेर येथील भिक्षा मागणा-या शहनाजबी इकबाल शेख या महिलेने अमळनेर पोलिस स्टेशनला केली. आपण अनिल संदानशिव यास उधार दिलेले सत्तर हजार रुपये मागितले असता त्याने आपल्याला जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याचे तिने तक्रारीत नमुद केले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला अनिल संदानशिव याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अमळनेर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक देखील फरार अनिल संदानशिव याच्या मागावर होते.
28 जून 2025 च्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी – शिताणे गावाच्या रस्त्यावर अनिल संदानशिव यास पोलिस पथकाने ताब्यात घेत पारोळा पोलिस स्टेशनला आणले. पोलिस कोठडीदरम्यान त्याने शोभाबाईचा खून केल्याची कबुली पारोळा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना दिली. अनिल संदानशिव पारोळा पोलिसांच्या तावडीत येण्याच्या सहा दिवसांपुर्वी 23 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुक्यातील जानवे या गावचे पोलिस पाटील विलास धोंडू पाटील यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाची माहिती दिली. जानवे शिवारातील जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरली असल्याची त्यांनी माहिती दिली. खुप दिवसापासून मृतदेह पडलेला होता. त्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती.
अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरु केली. सुरुवातीला याप्रकरणी 59/2025 या क्रमांकाने अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळावर पोलिस पथकाला एक आधार कार्ड मिळून आले. ते आधार कार्ड वैजंताबाई भगवान भोई या नावाने जारी करण्यात आले होते. त्यावर वैजंताबाई या महिलेची जन्म तारिख, सुरत येथील पत्ता, मोबाईल क्रमांक आदी तपशील होता. सुरत येथील कतरगाम दरवाजा कुबेरनगर असा त्यावर पत्ता होता. मृतदेहाचे लांब केस, जवळच पडलेली पर्स, कपाळावरील टिकली आदी वस्तूंचे निरीक्षण केले असता तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधारकार्डच्या मदतीने अधिक तपास केला असता ती महिला अर्थात वैजंताबाई ही सुरत येथून कुणाला काही न सांगता 4 मे 2025 रोजी घरातून निघाली होती. तिच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी सुरत येथील चौक बाजार पोलिस स्टेशनला गणेश भोई याने दिलेल्या तक्रारीनुसार मिसींग दाखल करण्यात आली होती. त्या मिसींगचा तक्रारदार गणेश भोई आणि त्याची बहिण सोनल भोई या दोघांना बोलावून मृतदेहाचा फोटो, घटनास्थळावरील कपडे आणि इतर वस्तु दाखवण्यात आल्या. त्या वस्तू बघून तो मृतदेह आपली आई वैजंताबाई हिचा असल्याचे त्याने स्पष्ट केले. अशा प्रकारे मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली. आता तिचा खून कुणी व का केला याचा तपास सुरु करण्यात आला.
अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीत वैजंताबाई भोई या महिलेची झालेली हत्या, पारोळा पोलिस स्टेशन हद्दीत शोभाबाई या महिलेची झालेली हत्या आणि अमळनेर शहरातील भिक्षेकरी महिलेवरील प्राणघातक हल्ला या तिघा घटनांमधे एक साम्य असल्याचे अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पारखी नजरेने हेरले. या तिन्ही घटना जंगल परिसरात एकांतात झाल्या होत्या. त्यामुळे पारोळा पोलिसांच्या ताब्यात असलेला अनिल गोविंदा संदानशिव हाच या घटनेतील गुन्हेगार असू शकतो हे त्यांना जाणवू लागले. त्यांनी त्याचा मोबाईल सिडीआर मागवला. त्यात त्यांना तथ्य आढळून आले. अमळनेर आणि पारोळा येथील महिलांच्या खूनाच्या दोन्ही घटनेत गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या पध्दतीत साम्य आढळून आले. दोन्ही गुन्ह्यांचे घटनास्थळ हे एक किलोमीटरपेक्षाही कमी अंतराचे होते. दोन्ही घटनास्थळावरील मोबाईल टॉवर लोकेशनमधे अनिल गोविंदा संदानशिव याची उपस्थिती होती. दोघा मयत महिलांच्या मोबाईल क्रमांकावर अनिल संदानशिव याचे घटनेच्या दिवशी व अगोदर बोलणे झाल्याचे देखील स्पष्ट झाले.
सखोल तपासाअंती वैजंताबाई भोई हिच्या खून प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक समाधान रामकृष्ण गायकवाड यांनी संशयीत आरोपी अनिल संदानशिव याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. गु.र.न. 304/2025 बी.एन.एस. कलम 103 (1) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कोणता तरी पुरावा मागे ठेवत असतो. केवळ दागिने आणी पैशासाठी खून करुन घटनास्थळावरुन पलायन करणा-या अनिलने वैजंताबाईच्या आधारकार्डाचा पुरावा मागे ठेवला आणि तो पोलिसांच्या हाती आला. याशिवाय मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड या तांत्रीक तपासात देखील तो अडकला. या गुन्ह्याचा पुढील तपास अमळनेर उप विभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हे.कॉ. संतोष नागरे, हे.कॉ. काशीनाथ पाटील, पो.कॉ. सागर साळुंखे आदी करत आहेत. या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक शरद बागल व हे.कॉ. कैलास शिंदे यांचे सहकार्य लाभले.








