नाशिकचा ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

पिंपरी : नाशिक शहरातील कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ यास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. धुळे येथील त्याच्या एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १७ लाख ७० हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेमंत राजेंद्र भदाने (२४) भोरवाडा, सातपूर, नाशिक तसेच त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (२४) गरताड, ता. जि. धुळे असे अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत.
केटीएम दुचाकी चोरी केलेला चोर भोसरी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट एकच्या पोलिसांची दोन वेगवेगळी पथके तयार केली होती. त्या पथकाच्या सापळ्यात आरोपी भदाने याला ताब्यात घेण्यात आले. त्याने १ सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून केटीएम दुचाकी चोरी केली असल्याचे पोलिस पथकाजवळ कबूल केले आहे.

पिंपरी – चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकींची तो चोरी करत असे. चोरी केलेल्या दुचाकी त्याने बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद या भागात विक्री तसेच लपवून ठेवल्या असल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी १० बुलेट, दोन एफझेड, एक केटीएम व एक पल्सर अशा एकुण १४ दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, एमआयडीसी भोसरी, पुणे येथील भारती विद्यापीठ, सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर, नाशिक सरकारवाडा, अंबड या पोलीस स्टेशनमधील वाहनचोरीच्या गुन्ह्यांची अशाप्रकारे उकल झाली आहे.

पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे व.पो.नि. उत्तम तांगडे, स.पो.नि. गणेश पाटील, पीएसआय काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने या कारवाईत परिश्रम घेतले.

आरोपी भदाने हा वाहनचोरी करणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर या अगोदर नाशिक जिल्ह्यात ३५ व ठाणे शहर येथे दोन असे ३७ गुन्हे दाखल झालेले आहेत. लॉकडाऊन काळात आरोपी नाशिक येथून पुण्यात येऊन महागडी दुचाकी चोरी करून ती बीड, धुळे, नाशिक या भागात जावून विक्री करत असे. कागदपत्र नंतर देतो, फायनान्सची गाडी आहे असे विविध कारणे ग्राहकांना सांगून तो वेळ मारुन नेत होता. या विक्रीची कामे तो त्याचा साथीदार योगेश भामरे याच्या मदतीने करत होता.
फेसबुक व मेसेंजरच्या माध्यमातून आरोपी भदाने ग्राहकांशी संपर्क साधत असे. गाडी विक्री झाल्यावर चॅटिंग तसेच मेसेज लगेच डिलीट करीत असे. आरोपी भदाने याला बुलेटसारख्या महागड्या दुचाकींचे आकर्षण होते. सध्या अशा दुचाकींना मागणी असल्यामुळे त्याने अशा महागड्या दुचाकींवर लक्ष केंद्रीत केले होते.

पार्किंग अथवा सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींचे आरोपी एका रॉडच्या साह्याने हँडल लॉक तोडून दोन वायरी जोडून दुचाकी ताब्यात घेत पसार व्हायचा. ती दुचाकी विक्री करताना त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपये सांगून ‘अ‍ॅडव्हान्स’ रुपात तो अवघे १२ ते १५ हजार रुपये घेत असे. दुचाकी संबंधित ग्राहकाच्या ताब्यात दिल्यानंतर तो ग्राहकाशी संपर्क तोडून टाकत असे. चोरलेल्या कित्येक दुचाकींची किंमत सरासरी दोन लाखांपर्यंत आहे. या गुन्ह्यात अजून काही जणांचा यात समावेश आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here