जळगाव : हद्दपार आरोपीसह त्याच्या दोघा साथीदारांना गावठी कट्टा, जीवंत काडतुस व धारदार कोयता अशा घातक हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. तेजस दिलीप सोनवणे, खुशाल पितांबर सोनार आणि चेतन पितांबर सोनार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी तेजस दिलीप सोनवणे यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन जळगाव शहरातील नेहरु नगर परिसरात फिरतांना आढळून आला.
खुशाल सोनार याच्या कब्जातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चेतन सोनार याच्या कब्जातून धारदार पाते असलेला कोयता हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पो.कॉ. गणेश ठाकरे, पोकॉ किरण पाटील, नितीन ठाकुर, पोकॉ राहुल घेटे, पोकॉं योगेश घुगे आदींनी सहभाग घेतला.






