जळगाव – अंत्यविधीची तयारी सुरू असताना 92 वर्षाच्या आजीबाई काही वेळासाठी सचेत झाल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात घडली घडली. अर्धा तासाच्या अंतराने आजीबाईंना मरण आले. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे घडलेला हा प्रकार परिसरात एक चर्चेचा विषय झाला. मंजुळाबाई मिठाराम फालक असे या आजीबाईंचे नाव आहे.
92 वर्षीय मंजुळाबाई यांनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपली दैनंदिन कामे पुर्ण केली. जेवण केल्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांची प्रकृती एकाएकी बिघडली आणि त्यांची हालचाल पुर्णपणे बंद झाली. त्या मरण पावल्याचे लक्षात आल्याने त्यांचे नातेवाईक, शेजारी आणि ग्रामस्थ सर्वजण जमले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली.
मंजुळाबाईना स्नान घालण्यात येत असताना अचानक त्यांनी सुनेचा हात पकडून डोळे उघडले! या प्रकाराने क्षणभरासाठी उपस्थित सगळे स्तब्ध झाले.
मंजुळाबाई सचेत झाल्याने घरात आनंदाचे वातावरण तयार झाले. आजी मरणाच्या दारातून परतल्याने काही नातेवाईक आपल्या गावी आणि घरी परत गेले. मात्र अर्ध्या तासानंतर मंजुळाबाई यांची हालचाल कायमची बंद झाली आणि त्या खरोखरच देवाघरी गेल्या. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी आजीबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.








