जळगाव : बेकायदा पिस्टलने गोळीबार करुन कंपनी कामगाराची हत्या केल्याच्या प्रकरणातील फरार ब-हाटे दाम्पत्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून अटक केली आहे. राहुल रामचंद्र ब-हाटे व मोनाली राहुल ब-हाटे असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.नं. 788/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 109, 118 (1)115 (2), 3 (5), आर्म अँक्ट 3/25 नुसार 3 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, हेकॉ प्रदीप चौधरी, गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोकॉ नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.
गुन्हा घडल्यापासुन संशयीत आरोपी ब-हाटे दाम्पत्य पसार झाले होते. ते दोघे वारंवार त्यांचे ठिकाण बदलत होते. दोघे पती पत्नी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे दुचाकीने पसार होत असतांना त्यांना शिताफीने महामार्गावरुन ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड करत आहेत.






