जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भारतीय समाजात अनेक पिढ्यांपासून चालत आलेली मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित जमीन. या जमीनीवर कुटुंबातील सदस्यांची एकत्रित मालकी असते. मात्र या जमीनीच्या मालकी हक्कावरुन अनेकदा वाद होतात. वडीलोपार्जीत जमीन आपापल्या नावावर करुन मिळावी यासाठी एखाद्या पिढीत हे वाद निर्माण होतात. हे वाद कधीकधी एवढे पराकोटीला जातात की त्यातून एखादा गुन्हा घडतो. लोभाला बळी पडून कित्येकदा खोटे कागदपत्र तयार करुन जमीन बळकावली जाते. कोणाला किती हिस्सा मिळावा, कोणत्या भागावर कोणाचा ताबा असावा या बाबतीत मतभेद निर्माण झाल्याने वाद होतात. जमीनीच्या वादातून, आर्थिक लोभामुळे भावंडे, नातेवाईक यांच्यात फूट पडते. जमीनीच्या वादामुळे कुटूंबातील सदस्यांचा संवाद कमी होतो आणि छोट्या गोष्टींचे मोठ्या वादात रुपांतर होते. एखादी पिढी वडीलोपार्जीत मालमत्तेचे रक्षण करुन त्यात भर घालते. एखादी पिढी त्या मालमत्तेच्या बळावर स्वत:चे साम्राज्य निर्माण करते. मात्र एखादी पिढी त्या मालमत्तेवरुन वाद घालते आणि सर्व जमापुंजी न्यायालयीन संघर्षात घालवून बसते. अशा प्रसंगात एखादा गुन्हा देखील घडतो. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या गावी जमीनीच्या वादातून खूनाची घटना घडली. मुलाने आपल्या बापाची लाथाबुक्क्यांनी, कु-हाडीच्या दांड्याने व विटेने मारहाण करुन हत्या केली. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात हळहळ आणि संताप देखील व्यक्त करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या गावी तायडे परिवार वास्तव्याला आहे. मुळचा रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील तायडे परिवार सुमारे तिस वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे कामधंद्यानिमित्त स्थायिक झाला आहे. या तायडे परिवाराची रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे वडीलोपार्जीत शेतजमीन आहे. रमेश तायडे, जगदीश तायडे, देविदास तायडे, रघु तायडे, मधुकर तायडे आणि हरी तायडे अशा सहा भावांचे हे कुटूंब काळाच्या ओघात विस्तारत गेले. रमेश, जगदीश, देविदास आणि रघु हे चौघे भाऊ अंतुर्ली येथे राहण्यास आले. हरी तायडे हे पुणे येथे कामधंद्यानिमीत्त स्थायिक झाले. मधुकर मात्र रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे राहून वडिलोपार्जीत शेती सांभाळू लागला.


जगदीश तायडे व त्यांची पत्नी कौशल्याबाई हे पती पत्नी शेळीपालनासह मजुरी करुन आपला चरितार्थ भागवत होते. शेळ्या विकून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. जगदीश तायडे यांना देवेंद्र आणि गणेश अशी दोन मुले. दोघांना मद्यपानाचे व्यसन जडले होते. मजुरी करणा-या देवेंद्र आणि गणेश या दोघा मद्यपी भावांपैकी गणेशची नजर आंदलवाडी येथील वडीलोपार्जीत शेतीच्या हिश्श्यावर होती. गणेश हा दिवसभर दुस-याच्या शेतात मजुरीसाठी जात असे. सायंकाळी घरी येण्यापुर्वी मद्यपान करुनच तो घरी येत असे. घरी आल्यावर तो आई कौशल्याबाई आणि मोठा भाऊ देवेंद्र यांच्याशी काही ना काही कारणावरुन वाद घालत असे. तो त्याची आई कौशल्याबाईकडे मद्यपानासाठी पैशांची मागणी करत असे. वेळप्रसंगी शेळी विकून आलेल्या पैशांची देखील तो मद्यपानासाठी मागणी करत होता. आंदलवाडी येथील वडिलोपार्जीत शेतीमधे आपल्याला हिस्सा मिळावा यासाठी तो वडील जगदीश तायडे यांच्याशी वाद घालत असे. त्यातून घरातील वातावरण दुषित झाले होते.

सुमारे तिन वर्षापुर्वी अंतुर्ली येथील तायडे परिवार त्यांच्या मुळ गावी रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे गेला होता. प्रत्येकाला आपल्या हिश्श्याची शेतजमीन वाटणी करुन मिळावी अशी त्यांनी जमीन कसणा-या मधुकर तायडे यांच्याकडे मागणी केली होती. वाटणी शक्य नसेल तर शेतीतून मिळणारा नफा प्रत्येकाला मिळावा अशी समांतर मागणी सर्वांनी केली होती. त्यावर मधुकर तायडे यांनी सर्वांना स्पष्ट सांगितले होते की मी तुमची शेती कसतच नाही. त्यामुळे मी तुम्हाला नफा देण्याचा अथवा वाटणी करुन देण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारे मधुकर तायडे यांनी शेतीच्या वाटणी हिश्श्याच्या प्रश्नातून आपली सुटका करुन घेतली.


जगदीश तायडे यांचा लहान मुलगा गणेश याला मद्यपानाचे भारी व्यसन जडले होते. त्यासाठी तो त्याचे वडील जगदीश आणि आई कौशल्याबाई या दोघांना पैशांची मागणी करत असे. आंदलवाडी येथे असलेल्या शेतजमीनीत हिस्सा मिळावा, शेळी विकून आलेले पैसे मद्यपानासाठी मिळावे अशी तो मागणी करत असे. त्याला कितीही पैसे दिले तरी तो मद्यपानात उडवून देईन हे जगदीश तायडे यांना समजत होते. त्यामुळे ते त्याच्या मागणीला नकार देत होते. एकंदरीत त्याच्यामुळे घरातील वातावरण बिघडले होते.




दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी नेहमीप्रमाणे गणेश कामावरुन घरी परतला. घरी आल्या आल्या त्याने त्याच्या आईकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. त्याच्या नेहमीच्या वादाला त्याची आई वैतागली होती. तिने त्याला शेळ्यांच्या गोठ्यात त्याच्या वडीलांकडे जेवणाचा डबा घेऊन रवाना केले. तो गोठ्याकडे जात असतांना त्याला त्याचा चुलत भाऊ रविंद्र तायडे याने पाहिले होते.

गोठ्यात गेल्यानंतर त्याने त्याचे वडील जगदीश तायडे यांच्याशी आंदलवाडी येथे असलेल्या वडीलोपार्जीत शेतीत हिस्सा मिळावा म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान गणेश हा शेळ्यांच्या गोठ्यातून पुन्हा घराकडे जाऊ लागला. त्यावेळी रात्री दहा ते साडे दहा वाजेचा सुमार होता. वाटेत त्याचा चुलत भाऊ रविंद्र तायडे हा मोबाईलवर व्हिडिओ बघत बसला होता. त्याने गणेशकडे निरखून पाहिले असता तो भांबावलेला होता. भांबावलेला गणेश चुलत भाऊ रविंद्रला बघून म्हणाला की मी माझ्या बापाला मारले आहे, त्याला मी विहीरीत टाकून देणार आहे.
भांबावलेल्या गणेशचे शब्द ऐकून रविंद्र सतर्क झाला. त्याच्या हातून काहीतरी विपरीत झाले असेल याची त्याला खात्री झाली. गणेशने त्याचे वडील जगदीश तायडे यांना किती मारले हे बघण्यास जाण्यापुर्वी त्याने त्याच्या काही मित्रांना तसेच गणेशचा पुतण्या रोहीत अशा सर्वांना फोन करुन आपल्या घरी बोलावून घेतले. जमलेले चौघे जण गोठ्याकडे गेले. तत्पुर्वी गणेशचा पुतण्या रोशन हा घटनास्थळी पोहोचलेला होता. गोठ्यात गणेशचे वडील जगदीश तायडे हे जखमी अवस्थेत बाजेवर निजले होते. त्यांच्या अंगावर कांबळ टाकलेली होती. त्यांना कुणी मारले? कसे मारले? का मारले? याची विचारणा होत असतांना राहुलने त्याच्या मोबाईलमधे थेट चित्रीकरण सुरु केले.
घटनास्थळी आलेल्या राहुल शिरतुरे याने जखमी जगदीश तायडे यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी सांगितले की मला गणेशने मारले आहे. गणेश व्यतिरिक्त अजून कुणी मारले का या प्रश्नावर त्यांनी मान हलवून नकारार्थी उत्तर दिले. पोटचा मुलगा गणेश याने जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांसह कु-हाडीचा दांडा आणि विटेने जबर मारहाण केली होती.
या सर्व घटनेची हकीकत जखमी जगदीश तायडे यांनी सांगितली. त्यांनी सांगितलेल्या हकीकतीचा व्हिडीओ करुन घेण्यात आला. जखमी जगदीश तायडे यांना सर्वांनी उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या. त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. त्यांचा डावा हात कोपरातून मोडलेला दिसत होता. त्यांची अवस्था बघून रुग्णवाहिकेतून त्यांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान दुस-या दिवशी सकाळी पाच वाजेच्या सुमारास जगदीश तायडे यांचे निधन झाले.
या घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी सुभाष ढवळे आणि पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांनी आपापल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. या घटने प्रकरणी रविंद्र रमेश तायडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गणेश तायडे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 333/2025 भारतीय न्याय संहिता 103 (1) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश तायडे याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली.
मुक्ताईनगर उप विभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढवळे आणि पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र उत्तम चाटे आणि त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल सतिषकुमार प्रभाकर भारुळे करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी हेड कॉन्स्टेबल राजेश महाजन, मुकेश महाजन, राजकुमार चव्हाण, पोलिस नाईक सुरेश मेढे आदींचे सहकार्य लाभले.
वडिलोपार्जित जमिनीचे वाद हे अनेकदा नात्यांमधील तणावाचे कारण ठरतात. संवाद, सामंजस्य, पारदर्शकता आणि कायदेशीर ज्ञान यांच्या माध्यमातून हे वाद टाळता येतात. मात्र संवाद आणि सामंजस्याच्या अभावातून हे वाद पराकोटीला जातात. वडिलोपार्जीत शेतजमीनीत वाढ होण्याऐवजी वादातून तिचे प्रत्येक पिढीत तुकडे पडतात. वाड वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेल्या शेतीमुळे वाद होतात. याउलट काही जण आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्काराचा वारसा देतात. शिक्षण आणि संस्काराच्या शिदोरीवर मुले जग जिंकतात. ती शिदोरी कुणी हिसकावू शकत नाही. वडीलोपार्जीत शेतजमीन अथवा मालमत्तेच्या वादातून कुटूंबात फुट पडते.







