जळगाव : पुर्वीच्या काळी ग्रामीण भागात एखादी बातमी द्यायची झाल्यास दवंडी देण्याची पद्धत होती. या दवंडीच्या माध्यमातून गावकरी एकत्र जमून ती बातमी ऐकून व समजून घेत होते. आता काळ बदलला आहे. आता व्हाटस अॅपचा जमाना आला आहे. व्हाटस अॅपच्या माध्यमातून दवंडीला पर्याय देण्याचा प्रयत्न रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे या गावातील पत्रकार कमलाकर माळी यांनी केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश देखील आले आहे.
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे या गावी पत्रकार कमलाकर माळी यांनी “आम्ही वाघोदेकर” हा व्हाटस अॅप ग्रुप तयार केला असून हा गृप गावक-यांसाठी एक चर्चेचा विषय झाला आहे.
पत्रकार कमलाकर माळी हे या गृपचे अॅडमीन असून या गृपच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून प्रश्न मंजुषा हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील समस्या गावकरी मांडतात. गावाच्या संबंधीत एक प्रश्न या गृपवर विचारला जातो. जो गावकरी या प्रश्नाचे अचुक उत्तर देईल त्याला अॅडमिन तथा पत्रकार कमलाकर माळी यांच्याकडून बक्षीस दिले जाते.
गेल्या चार वर्षापासून सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गावकरी असलेल्या गृप सदस्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. हा प्रश्न रात्री 9.20 ते 9.30 दरम्यान विचारला जातो. साधारण अर्धा तास झाल्यानंतर विजेत्याचे नाव गृपवर जाहीर केले जाते. या गृपवर प्रायोजक देखील मिळत असून गृपचे कौतुक केले जात आहे.
कुठे काय सार्वजनिक कार्यक्रम आहे? कुणाची निधन वार्ता झाली? कुणाची काय वस्तू हरवली अशा विविध बातम्या या गृपच्या माध्यमातून गावक-यांना तात्काळ समजत आहेत. या गृपमधील अनेक सदस्य नोकरीनिमीत मुंबई, गुजरात, पुणे, नाशिक, औंरगाबाद, दिल्ली, दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील आपल्या गावातील बातम्या या गृपच्या माध्यमातून पटकन समजत आहेत. या निमीत्ताने त्यांना गावाकडची ओढ देखील लागून राहते. या गृपवर पोस्ट टाकण्याचा अधिकार अॅडमीन कमलाकर माळी यांनी स्वत:कडे ठेवला आहे. गावकरी पोस्ट टाकण्यासाठी त्यांना भेटून बातम्या देतात तसेच अॅड होतात.