जळगाव – एकाच गावातून तिन अल्पवयीन मुली व तिन तरुण बेपत्ता झाल्याची घटना भडगाव तालुक्यात घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटने प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तिघा अल्पवयीन मुलींना पळवून नेणा-या तिघा तरुणांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यात आली असून त्या तरुणांना अटक करण्यात आली आहे.
बेपत्ता मुलींच्या पालकांच्या मदतीने त्यांच्या मित्र मैत्रीणींसह नातेवाईकांची सुरुवातीला कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत जवळपासच्या गावातील तिन तरुण देखील बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आली. त्या सर्वांचे मोबाईल फोन स्विच ऑफ यत होते. त्यामुळे या तपासाचे गांभीर्य वाढले होते. या तपासकामी दोन वेगवेगळी पथके कार्यरत करण्यात आली होती. एक पथक चाळीसगावच्या दिशेने तर एक पथक जळगावच्या दिशेने रवाना करण्यात आले.
जळगाव येथील पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील सिसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात संशयीत तरुण व बेपत्ता मुली 20 ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास तिकीट खिडकीवर आढळून आले. त्या कालावधीत कोणत्या व किती ट्रेन ये जा करतात त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्या कालावधीत झेलम एक्सप्रेसने ती मुले व त्या मुली गेल्याचे लक्षात आले.
त्यानुसार बेपत्ता मुलामुलींच्या नातेवाईकांकडून त्यांचे नातेवाईक झेलम एक्सप्रेसचे थांबे असलेल्या ज्या ज्या गावांना राहतात त्यांची माहिती संकलीत करण्यात आली व पुढील तपासाला गती देण्यात आली. तपासात रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे, अमोल इश्वर सोनवणे यांना राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून तिघा अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली.
चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पोहेकाँ पांडुरंग पाटील, पोना मनोहर पाटील, पोकाँ महेंद्र चव्हाण, प्रविण परदेशी, मिर्लीद जाधव, मपोकाँ सोनी सपकाळे आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले. पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे लक्ष ठेवून काळजी घेण्याचे आवाहन जळगाव पोलिसांनी या घटनेच्या निमीत्ताने केले आहे.







