“चोट्टा प-या” शब्दाने वाद गेला खालच्या थरावर — बेदम मारहाणीत हर्षलचा जीव गेला रेल्वे रुळावर  

On: November 22, 2025 4:11 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : हर्षल प्रदीप भावसार हा अवघा तिस वर्ष वयाचा तरुण जळगाव शहरातील दिनकर नगर भागात आपल्या आई वडीलांसह रहात होता. साधारण परिवारातील हर्षलचे वडील सायकल दुकानावर कामाला जात होते तर आई एका दवाखान्यात सफाईकर्मी म्हणून काम करत होती. एमआयडीसीत चॉकलेट तयार करण्याच्या कंपनीत कामाला जावून हर्षल परिवाराला हातभार लावत होता. अशा प्रकारे हे भावसार कुटूंब साधारण परिस्थितीत भाड्याच्या घरात आपले जीवन व्यतीत करत होते. आईबापाचा एकमेव सहारा असलेल्या हर्षलच्या अंगी मात्र तारुण्याचा जोश मोठ्या प्रमाणात होता.

जळगाव शहरातील ज्ञानदेव नगर भागात भुषण संजय महाजन आणि परेश संजय महाजन हे दोघे भाऊ रहात होते. वाळूचा व्यवसाय असलेल्या परेश याचा लोकेश मुकुंदा महाजन हा मित्र होता. परेशच्या माध्यमातून त्याचा भाऊ भुषण आणि लोकेश या दोघांची ओळख झाली होती. अशा प्रकारे भुषण महाजन व परेश महाजन हे दोघे भाऊ आणि लोकेश महाजन हे तिघे एकमेकांचे मित्र झाले होते. लोकेश महाजन याचा अजून एक मित्र होता. हर्षल भावसार असे त्या मित्राचे नाव होते.

हर्षल भावसार याचे वडील काविळचे औषध घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात गेले होते. त्यामुळे घरी हर्षल व त्याची आई असे दोघेच मायलेक होते. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी हर्षल याने त्याच्या आईला चिकन आणून दिले आणि स्वयंपाक करुन ठेवण्यास सांगितले. आपल्याला घरी येण्यास उशीर होईल असे आईला सांगून तो घराबाहेर गेला.

या दिवशी सायंकाळी लोकेश महाजन आणि परेश महाजन हे दोघे मित्र एकमेकांना भेटले. रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे दोघांनी मद्यपान करण्याचे नियोजन केले. दोघांनी मद्याच्या बाटल्या विकत घेतल्या आणि ते सोबतच परेशच्या घरी आले. त्यावेळी परेशचा भाऊ भुषण घरीच होता. परेश, भुषण या दोघा भावांसह त्यांचा मित्र लोकेश या तिघांनी घरातच एकत्र बसून मद्यपानास सुरुवात केली. तिघे जण मद्यपान करत असतांना रात्रीचे नऊ वाजले. मद्याचा स्टॉक संपला होता आणि रात्र देखील झाली होती. मद्यपानामुळे परेशला झोप लागत होती. परेशला झोप लागत असली तरी भुषण आणि लोकेश या दोघांना अजून मद्यपान करायचे होते. त्यामुळे परेशला घरीच झोपवून दोघे जण हॉटेलमधे मद्यपान करण्यासाठी घराबाहेर पडले.

Mayat harshal bhavsar

लोकेशच्या मोटार सायकलवर दोघेजण कालंका माता मंदीर परिसरातील हॉटेल ओंकार येथे आले. या हॉटेलमधे दोघांनी मद्यपानास सुरुवात केली. बघता बघता रात्रीचे दहा वाजले. त्यावेळी दोघांच्या टेबलजवळ हर्षल भावसार आला. हर्षल आणि लोकेश हे दोघे अगोदरच एकमेकांचे परिचीत मित्र होते. त्यामुळे हर्षल आणि लोकेश हे दोघे जण एकमेकांशी बोलू लागले. त्याठिकाणी आलेल्या हर्षलला भुषणने ओळखले नाही. हर्षल यास भुषणने यापुर्वी पाहिले होते मात्र त्याला त्याचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे हा कोण आहे असे भुषणने लोकेशला विचारले. त्यावर लोकेशने दोघांची एकमेकांसोबत ओळख करुन दिली. आलेला तरुण हा हर्षल भावसार असल्याचे लोकेशने भुषणला सांगितले. भुषण हा परेशचा भाऊ असल्याचे लोकेशने हर्षल यास सांगितले.

भुषण हा परेशचा भाऊ असल्याचे समजताच हर्षलने उसळून विचारले की हा त्या चोट्ट्या प-याचा भाऊ आहे का? आपल्या भावाबद्दल हर्षलच्या तोंडून अपशब्द ऐकून भुषण यास राग आला. रागाच्या भरात त्याने नुकतीच ओळख झालेल्या हर्षल यास खडसावले. तुला काय बोलायचे ते मला बोल, माझा भाऊ परेशबद्दल तु असे काय बोलतो? असा भुषण याने हर्षल यास जाब विचारला. त्यावर हर्षलने तेवढ्याच तावातावात भुषण यास शिवीगाळ केली. काही क्षणातच दोघांमधे हमरीतुमरी सुरु झाली.

Dr. Maheshwar Reddy SP

भुषण आणि हर्षल या दोघांमधे सुरु झालेल्या शाब्दीक युद्धाचे हाणामारीत रुपांतर होण्यास सुरुवात झाली. दोघांची मोठमोठ्याने शिवीगाळ आणि हमरीतुमरी सुरु झाल्याने आजुबाजूच्या टेबलवर जेवणास बसलेले ग्राहक प्रभावित झाले. ते दोघांकडे बघू लागले. त्याच क्षणी भुषण याने त्याच्या गळ्यातील रुमालाचा गमछा जोरजोरात फिरवून हर्षलच्या गळ्याभोवती आवळला. या घटनाक्रमात हर्षलचा जीव जावू शकतो असे बघून हॉटेल मॅनेजरने दोघांच्या जवळ येत दोघांना एकमेकांपासून सोडवले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हर्षलचा जीव वाचला. काही वेळ शाब्दिक बाचाबाची नंतर भुषण आणि लोकेश हे दोघे जण आपापल्या घरी निघून गेले.  

संतापात घरी आलेल्या भुषणला एका जणाकडून समजले की हर्षलने त्याला मारण्यासाठी काही मुलांना बोलावले आहे. त्यामुळे भुषणने पुन्हा लोकेशला सोबत घेत हॉटेल ओंकार गाठले. त्यावेळी हर्षल नुकताच हॉटेलच्या बाहेर येत त्याच्या मोटार सायकलवर बसला होता. येथेच थांब, तुला बघतो असे हर्षलने भुषण यास धमकीच्या स्वरात म्हटले आणी तेथून मोटार सायकलने प्रस्थान केले. आपण याठिकाणी अजून काही वेळ थांबले तर हर्षल खरोखरच टपोरी पोरांना बोलावून आपल्याला मारहाण करेल अशी भिती भुषण यास वाटली. त्यामुळे त्याचा येथेच फैसला करायचे भुषण आणि लोकेशने निश्चित केले.

Nitin Ganapure Dysp

भुषण आणि लोकेश असे दोघे जण त्याच्या मागेमागे निघाले. भुषण दुचाकी चालवत होता आणि त्याच्या मागे लोकेश हा डबलसिट बसला होता. काशिबाई उखाजी शाळेच्या मागच्या गेटनजीक खेडी रस्त्यावर दोघांनी मिळून त्याची वाट अडवली. लोकेशने त्याला दोघांच्या मधोमध बळजबरी ट्रिपल सिट बसवले. चालक भुषणच्या मागे हर्षल आणि त्याच्या मागे लोकेश असे तिघे जण दाटीवाटीने बसले.

Rahul Gayakawad PI LCB

घराकडे जात असतांना वाटेत ज्ञानेश्वर नगर नजीक दोघांना मोटार सायकलसह परेश भेटला. तो देखील तिघांसोबत आला. सर्वांनी मिळून हर्षल यास पाळधी बाय पासच्या पुलाखालून भादली गेटकडे जाणा-या रस्त्यावर नेले. त्याठिकाणी तिघांनी मिळून हर्षल यास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत हर्षल मोठ्या प्रमाणात जखमी होत जमीनीवर कोसळला. भुषण यास उद्देशून “चोट्ट्या प-याचा भाऊ” असे म्हटल्याने हर्षलची ही दयनीय अवस्था झाली होती.

जखमी हर्षल यास असेच सोडून दिले तर तो पोलिसांना आपले नाव सांगेल असे लोकेश दोघांना म्हणाला. हर्षल यास असेच सोडून दिले तर आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू अशी तिघांना भिती वाटू लागली. त्यामुळे हर्षल यास रेल्वे लाईनवर टाकून देऊ आणि तो रेल्वे अपघातात मेला असे लोकांना वाटेल असे लोकेश दोघांना म्हणाला. त्यामुळे अधिक विचार न करता आणि अधिक वेळ न घालवता तिघांनी मिळून जखमी हर्षल यास रेल्वे लाईनवर टाकून देत तेथून पलायन केले.

त्यानंतर तिघांनी पुन्हा ओंकार हॉटेल गाठली. त्यावेळी हॉटेल बंद झाली होती. परेशने हॉटेलचा दरवाजा ठोकून मॅनेजरला बाहेर बोलावले. हॉटेल मॅनेजर बाहेर आल्यानंतर “या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का?” अशी विचारणा केली. त्यावर हो या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत असे मॅनेजरने सांगितल्यानंतर तिघे आपापल्या घरी परतले.

रात्र उलटून गेली तरी आपला मुलगा हर्षल घरी परत आला नाही म्हणून त्याची आई हवालदिल झाली होती. कदाचित तो परस्पर एमआयडीसीत कामावर गेला असेल असा विचार करुन हर्षलच्या आईने नंतर त्याची वाट पाहिली नाही. 17 नोव्हेंबरचा दुसरा दिवस उजाडला तरी देखील हर्षल घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने सकाळी सहा वाजता त्याला फोन लावला मात्र तो स्विच ऑफ येत होता. त्यानंतर त्याच्या आईने पुन्हा सात वाजता त्याला मोबाईलवर कॉल केला. मात्र तेव्हा देखील त्याचा फोन स्विच ऑफच येत होता. त्यामुळे सकाळी नऊ वाजता त्याची आई दवाखान्यात कामावर निघून गेली.

दरम्यान महामार्गानजीक पाळधी बायपास परिसरात जळगाव ते पाळधी दरम्यान रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह जळगाव तालुका पोलिसांना आढळून आला. पोहेकॉ प्रदीप राजपूत, प्रकाश चिंचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. त्या तरुणाच्या खिशातील पाकीट व आधार कार्डाच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली. तो तरुण हर्षल प्रदीप भावसार असल्याचे निष्पन्न झाले.

मयत हर्षल भावसार याची ओळख पटल्यामुळे त्याच्या परिवाराचा शोध घेण्यात आला. हर्षल भावसार याचे वडील काविळचे औषध घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात गेले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल देखील नव्हता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे कठीण होते.

या कालावधीत मयत हर्षलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी दाखल करण्यात आला होता. हर्षलच्या एका मित्राने त्याच्या आईची ती कामाला असलेल्या दवाखान्यात जावून भेट घेतली. तुमचा मुलगा हर्षलचा अपघात झाला असून तुम्ही माझ्यासोबत सरकारी दवाखान्यात लगेच चला असे तो म्हणाला. त्यामुळे कामावर हजर झाल्यानंतर अर्धा तासातच त्याच्या आईने हातातील काम अर्धवट सोडून रडत रडत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. त्याठिकाणी त्यांना मुलगा हर्षल याचा थेट मृतदेहच बघायला मिळाला. हर्षलच्या कान, नाक, डोळे व दाढीजवळ मोठ्या प्रमाणात जखमा त्याच्या आईसह नातेवाईकांना आढळून आल्या. हा प्रकार कसा व कुठे झाला याबाबत हर्षलच्या आईने उपस्थित पोलिसांना विचारला. हर्षलचा मृतदेह जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याचे पोलिसांनी हर्षलच्या आईला कथन केले.  

हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयत हर्षलच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. त्याच्या अंगावरील जखमा बघता त्याला मारुन रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी बोलून दाखवला. हर्षल व त्याच्या काही मित्रांनी रविवारी रात्री भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमधे सोबत जेवण केल्याची आणि त्याठिकाणी त्यांचा वाद झाल्याची प्राथमिक  माहिती पोलिसांना समजली. त्या दृष्टीने शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. अधिक तपासात हर्षलची मोटार सायकल काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसरात आढळून आली. त्यामुळे याच परिसरात मयत हर्षलचा वाद झाला असल्याची शनीपेठ पोलिसांची खात्री पटली.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काशिबाई उखाजी कोल्हे शाळा असलेल्या हॉटेल परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात 16 नोव्हेंबरच्या रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेल ओंकार येथे काही तरुण हर्षलसोबत भांडण करतांना आणी रस्त्यावर त्याला मारहाण करत असल्याचे आढळून आले.  मारहाण करणा-या तरुणांची ओळख पटवली असता ते भुषण संजय महाजन, परेश संजय महाजन हे दोघे भाऊ आणि लोकेश मुकुंदा महाजन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या तिघांविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत हर्षल भावसार याची आई ज्योती प्रदीप भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. 249/2025 भारतीय न्याय संहिता 103(1), 140(1), 3(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उप अधिक्षक नितीन गणापुरे यांच्यासह शनीपेठ पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साजीद मंसुरी व सहका-यांनी सुरु केला. या तपासात सर्वप्रथम भुषण संजय महाजन यास अटक करण्यात आली. दरम्यान वृत्त लिहीत असेपर्यंत अटकेतील भुषणचा भाऊ परेश महाजन आणि त्याचा मित्र लोकेश मुकुंदा महाजन या दोघांना अटक झालेली नव्हती.

घरात बेताची परिस्थिती असो अथवा धनाची प्रत्येक तरुणाने गुंडागर्दी न करता सामंजस्याने राहणे गरजेचे असल्याचे या घटनेतून दिसून येते. या घटनेमुळे आई बापाच्या हात तोंडाशी आलेला कमावता तरुण मुलगा जीवानिशी गेला आणि त्यांच्या नशिबी कष्ट कायम राहिले. आपल्या नजरेसमोर आपल्या तरुण मुलाचा मृतदेह बघणे यासारखी वेदनादायी घटना या जगात नसते.

संतापात आणि मद्याच्या नशेत आपण काय करत आहोत याचे भान सुटल्यामुळे दोघा भावांसह त्यांच्या मित्राला गजाआड होण्याची वेळ आली. एकंदरीत दोघा परिवाराची मोठ्या प्रमाणात हानी झाली. जेलमधून सुटून आल्यानंतर देखील दोघा भावासह एकुण तिघांची झालेली सामाजीक हानी व गेलेली सामाजीक पत भरुन निघणारी नाही. जेव्हा वेळ असते तेव्हा बुद्धी नसते. जेव्हा बुद्धी येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळ आणि बुद्धीची सांगड घालून मनुष्याने काम करणे गरजेचे असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment