जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “मेरे गुनाहो की सजा मेरी मां को मत दो” असे मंदीरातील देवाला हात जोडून विनवणी करतांनाचे भावनिक दृश्य अमिताभ बच्चन अभिनीत “दीवार” या गाजलेल्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्ष जीवनात “मेरे गुनाहो की सजा मेरे बच्चो को मत दो” असे भावनीक आवाहन देवाला करण्याची वेळ काहींवर येते. जळगाव पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचा-यावर अशीच काहिशी वेळ आली. भुतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका, माणसे ओळखण्यात झालेल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलीला का? असा सवाल या महिला पोलिसकर्मीला पडला आहे.
जळगाव पोलिस दलातील एक महिला पोलिस कर्मचारी आणि तिची अल्पवयीन मुलगी अशा दोघी मायलेकी शांत आणि सुखाने जीवन जगत होत्या. या महिला पोलिस कर्मचा-याने काही वर्षापुर्वी एका तरुणासोबत विवाह केला. विवाहानंतर त्या तरुणापासून महिला पोलिसकर्मीला एक मुलगी झाली. मात्र काही कारणास्तव पती पत्नीत बेबनाव सुरु झाला. काही कालावधीनंतर ते पती पत्नी विभक्त झाले. ड्युटी सांभाळून या महिला पोलिस कर्मचा-याने तिच्या मुलीचे संगोपन केले. बघता बघता ती मुलगी लहानची मोठी झाली. दोघी मायलेकी आपले जीवन एकमेकींच्या सोबतीने व्यतीत करत होत्या. पुर्वाश्रमीच्या पतीपासून विभक्त होण्याचा या महिला पोलिस कर्मीचा एक अध्याय संपला होता. पुन्हा नव्या उमेदीने ती महिला पोलिसकर्मी आपली ड्युटी सांभाळून आपल्या मुलीचे पालनपोषण करत होती.
पुरुषाशिवाय महिलेचे जीवन अपुर्ण असते. पतीच्या रुपातील पुरुषच महिलेच्या सर्व प्रकारच्या गरजा पुर्ण करु शकतो याची जाणिव या महिला पोलिसकर्मीला झाली. या कालावधीत तिची ओळख पर राज्यातील एका तरुणासोबत झाली. पर राज्यातील तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघातील सहवास वाढत गेला. सहवासातून दोघात मैत्री झाली. मैत्रीतून दोघातील प्रेमाचा अंकुर फुलत गेला. मागच्या पतीला विसरुन या पोलिस महिलेने त्या तरुणासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. तुझ्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीसह मी तुझा स्विकार करण्यास तयार आहे असे तो तिला म्हणाला. त्यामुळे आपल्याला एक पती आणि आपल्या मुलीला एक बाप मिळणार असल्याचे तिच्या लक्षात आले. तडजोड ही जीवनाची दुसरी बाजू असल्याचे तिला तिच्या आजवरच्या अनुभवातुन लक्षात आले. जीवनात मनुष्याला कुठेतरी तडजोड करावी लागते, तडजोडीशिवाय पर्याय नाही असा तिने मनाशी विचार केला. या विचारातून तिने त्या तरुणासोबत दुसरा विवाह करण्याचे निश्चित केले.
काही वर्षापुर्वी या महिला पोलिसकर्मीने त्या तरुणासोबत पुनर्विवाह केला. तिच्या मुलीसह त्याने तिचा स्विकार केला. ही महिला इकडे पोलिस दलात कार्यरत होती. तिकडे तिचा पती पर राज्यात नोकरी करत होता. दोघे सुटी काढून एकमेकांना भेटायला ये – जा करत होते. अशा प्रकारे या महिलेच्या जीवनातील दुसरा अध्याय सुरु झाला. आता पुन्हा आपले सुखाचे दिवस आले असे ती समजत होती. मात्र हा तिचा एक भ्रम होता.
बघता बघता तिची मुलगी जवळपास पंधरा वर्षाची झाली. आपला दुसरा पती हसतमुख, बोलका आणि मदतीसाठी तत्पर असल्याचे ती समजत होती. मात्र त्याच्या त्या मुखवट्यामागे काय दडले आहे याचा तिला आणि तिच्या मुलीला अंदाज आला नाही. तो अधूनमधून जळगावला दोघा मायलेकींना भेटण्यासाठी येत होता. कितीही झाले तरी तो तिच्या मुलीचा सावत्र बाप होता.
काही वर्षापुर्वी दिवाळीच्या सुट्या घालवण्यासाठी या मायलेकी तो रहात असलेल्या गावी परराज्यात गेल्या. तेथील थंड वातावरण, बर्फाच्छादीत टेकड्या आणि नविन घराचा या मायलेकींनी मनमुराद आनंद लुटला. दिवाळीच्या सुट्या दोघा मायलेकींनी हसतखेळत घालवल्या. दिवाळी आटोपल्यानंतर दोघी मायलेकी पुन्हा जळगावला परत आल्या. काही दिवसांनी या महिला पोलिसकर्मीच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एक व्हिडीओ आला. तो व्हिडिओ पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो होता तिचा सावत्र बाप. आपल्या दुस-या पतीने आपल्या मुलीला कोणता व्हीडीओ पाठवला आहे याची या महिला पोलिसकर्मीला काहीही कल्पना नव्हती.
तो व्हिडीओ बघून या अल्पवयीन मुलीच्या मनात धस्स झाले. तिच्या अंगावर शहारे आले. तो तिच्या आंघोळीचा व्हिडीओ होता. दिवाळीची सुटी घालवण्यासाठी या मायलेकी त्याच्याकडे पर राज्यात गेल्या असतांना त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. अल्पवयीन मुलगी सावत्र असली तरी ती नात्याने त्याची मुलगीच होती. मात्र नात्याने भान न ठेवता त्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचा आंघोळ करतांना व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडिओ त्याने त्याच्या सावत्र मुलीला व्हाटस अॅपच्या माध्यमातून पाठवला होता.
अल्पवयीन मुलीने त्याला याबाबत विचारणा केली. त्यावर त्याने पलीकडून उत्तर दिले की तु जेव्हा तुझ्या आईसोबत माझ्याकडे आली होती तेव्हा मी हा व्हिडीओ तयार केला आहे. त्याचे बोलणे ऐकून लाज, भीती, आणि अपराध भाव यांच्या जाळ्यात अडकून ती गप्प बसली. भितीपोटी तिने हा प्रकार तिच्या पोलिस असलेल्या आईला सांगितला नाही. तिने तिच्या सावत्र बापाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. आता या अल्पवयीन मुलीच्या जीवनातील भयाचा नवा अध्याय सुरु झाला.
काही महिन्यापुर्वी या मायलेकी पुन्हा त्याच्याकडे परराज्यातील गावी गेल्या. त्यावेळी घरात कुणी नसतांना त्याने त्याच्या सावत्र मुलीला खोलीत बोलावून तो व्हिडीओ पुन्हा दाखवला. यावेळी त्याने तिला धमकी दिली की तु माझ्यासोबत संबंध ठेव. तु जर माझे ऐकले नाही तर मी हा व्हिडीओ सर्वांना दाखवेन. त्याच्या या धमकीमुळे ती मुलगी घाबरली. हा प्रसंग तिच्या बालमनावर कायमचा कोरला गेला. भीती, अश्रू, आणि न सांगता येणारी लज्जास्पद गोष्ट या सर्वांचा विचार करत ती गप्प बसली. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला नाही.
जळगावला परत आल्यानंतर देखील या अल्पवयीन मुलीचे दुख: संपले नाही. काही दिवसांनी तो जळगावला आला. त्याने यावेळी देखील तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. दोनवेळा हा प्रकार घडला. एके दिवशी मद्याच्या नशेत त्याने तिला सर्वांसमोर त्या व्हिडीओची धमकी दिली. मद्याच्या नशेत आपला पती आपल्या मुलीच्या कोणत्या व्हिडीओची गोष्ट सांगत आहे हे त्या पोलिस महिलेला समजले नाही. तिने तिच्या मुलीला विचारणा केली असता सत्य बाहेर आले आणि सर्व उलगडा झाला. तिने तिच्या पतीला याबाबत जाब विचारला असता त्याने दोघा मायलेकींना मारहाण केली.
या घटनेनंतर तो पुन्हा जळगावला आला. त्यावेळी त्याने पुन्हा या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने आपल्या आईला सोबत घेत जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठले. नराधम सावत्र बापाविरुद्ध मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र हा गुन्हा ज्या राज्यात घडला तेथील स्थानिक पोलिस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. भीतीतून मौन जन्म घेत असले तरी न्यायासाठी आवाज उठवणं हेच खरे धैर्य असते हे या घटनेतून दिसून येते.








