जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी परेश संजय महाजन यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मंगळसुत्र चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीला तेजस अनिल इखनकर याला अटक करण्यात आली.

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीत परेश संजय महाजन याचा देखील सहभाग असल्याचे अटकेतील तेजस इखनकर याने कबुल केले. त्यानुसार परेश महाजन यास माऊली नगर भागातून ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले. खूनाचा गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून परेश महाजन हा फरार होता. शनीपेठ पोलिस त्याच्या मागावर होते. परेश याच्या चोरीच्या गुन्ह्याची पार्श्वभुमी माहिती असल्यामुळे शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील मयताने त्याच्याबद्दल “चोट्टा प-या” हा शब्द वापरला होता. त्या शब्दामुळे खूनाचा गुन्हा घडला होता.

जबरी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 8 ग्रॅम सोन्याची 80 हजार रुपये किमतीची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे कॉ प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पो कॉ नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे, चेतन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.






