जळगाव : चोपडा शहर पोलीसांच्या अभिलेख्यावरील तिघा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. भैय्या उर्फ विजय लोटन पाटील, संग्राम शामसिंग परदेशी आणि तुळशीदास रविंद्र पाटील अशी तडीपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
भैय्या पाटील याच्याविरुद्ध पाच दखलपात्र आणि एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. यात प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. संग्राम परदेशी याच्याविरुद्ध तिन दखलपात्र व तिन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. यात धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे, खूनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे आहेत. तुळशीदास पाटील याच्याविरुद्ध चार दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. तिघे गुन्हेगार चोपडा शहरात कुणाला दिसून आल्यास त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे.






