जळगाव : गेल्या तिन महिन्याच्या लॉकडाऊन काळापासून जळगाव जिल्हयाच्या विविध पोलिस स्टेशनचे जवळपास 50 ते 60 कर्मचारी जिल्हा सिमेवर तैनात आहेत. हे सर्व कर्मचारी अप डाऊन करत असल्याचे दिसून येते. दोन्ही बाजूने मिळून सुमारे 200 ते 250 कि.मी. असा त्यांचा दररोज प्रवास सुरु आहे.
सद्यस्थितीत जिल्हयातून बाहेर जाणा-या तसेच बाहेरुन जिल्हयात येणा-या वाहन धारकांना वैद्यकीय तपासणीसह प्रवासाचा पास आवश्यक आहे. जिल्हयाच्या सिमेवर विविध ठिकाणी हे पोलिस कर्मचारी हजर रहात असले तरी पासची अट शिथील झाल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. गेल्या तिन महिन्यापासून जिल्हा सिमेवर तैनात असलेले कर्मचारी अप डाऊनला वैतागले आहेत. कुठलीही तपासणी हे कर्मचारी करत नसल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. कुणीही यावे आणि जावे, कुणाची आडकाठी नाही असे पाहणी दरम्यान दिसून येते.
जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर वाहतूक शाखा, महामार्ग, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा अशा विविध शाखेचे सुमारे 50 ते 60 कर्मचारी गेल्या तिन महिन्यापासून नेमून दिलेल्या ठिकाणी ये जा करत आहेत. मात्र त्याची उपयोगीता काहीच नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. तपासणी नाक्यावर देण्यात आलेले वाहन तपासणीचे काम स्थानिक तालुका पातळीवरील कर्मचा-यांना देण्यात यावे असा एकंदरीत सुर या कर्मचारी वर्गात दिसून येत आहे. याकामी पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालावे अशी जनतेतून एकमुखी मागणी होत आहे.