जळगाव : तेलंगणाहून जळगाव जिल्ह्याच्या दिशेने कारने रवाना झालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दाम्पत्यासोबत नातेवाईकांचा संपर्क होत नसून त्यांचे अखेरचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर परिसरात आढळून आले आहे. या घटनेमागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जातं आहे. याप्रकरणी संदीप पाटील यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
तक्रारदार संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे चुलत बंधू पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा येथील सीतापुरम येथे एका खाजगी सिमेंट कंपनीत कामाला आहेत. पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील हे दांपत्य मुलीसह 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिवारातील लग्नासाठी जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा गावाच्या दिशेने कारने निघाले होते. सकाळी घर सोडल्यानंतर चुलत भावासोबत त्यांचे मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यानंतर बोलणे झाले नाही रात्री दहा वाजेपर्यंत लग्न स्थळी ते पोहोचणार होते मात्र त्यांचा संपर्क तुटला. त्यांचा फोन कायम बंद येत असल्याचे परिजनांच्या लक्षात आले.
खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी या गावाच्या परिसरात त्यांचे शेवटचे लोकेशन होते. या कालावधीत या मार्गावर कुठेही अपघाताची नोंद नाही. त्यामुळे घातपाताची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जात असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.






