जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): तिचे नाव होते लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक. यु ट्युब वरील क्राईम एपिसोड बघून तिच्या मनात चो-या करण्याची लालसा निर्माण झाली. यु ट्युबवरील गुन्हे करण्याची पद्धत बघून आपणही असा गुन्हा करुन बघावा असे तिच्या मनात आले. मनातील विचार तिने प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार केला. यु ट्युब, गुगल मॅप अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन तिने विविध शहरातील नामांकीत गोल्ड ज्वेलरी दुकानांची माहिती संकलीत केली. ग्राहकांनी फेकून दिलेले टॅग जमा करुन त्या टॅग़चा पुनर्वापर करुन चोरी करण्याची नामी शक्कल तिने लढवली. फेकून देण्यात आलेले टॅग़ हातचलाखीने आपल्या जवळ असलेल्या नकली दागिन्यांना लावून त्या बदल्यात असली सोन्याचे दागिने नजरेचा खेळ करुन लंपास करण्यात ती माहीर झाली.

हरियाणा आणी हिमाचल प्रदेशात तिने ही शक्कल वापरली. ग्राहकांनी फेकून दिलेले दागिन्यांचे टॅग अगोदरच जमा करुन ठेवण्याचा प्रकार म्हणजे गुन्ह्याच्या दिशेने तिची वाटचाल होती. आपण एक सभ्य ग्राहक महिला असल्याचे भासवून दुकानात प्रवेश करणे याची तिला सवय झाली होती. दुकानात गेल्यानंतर हा दागिना दाखवा, तो दागिना दाखवा, हा कितीचा आहे, तो कितीचा आहे असे बोलून दुकानातील कर्मचा-याला बोलण्यात गुंतवून ठेवण्यात तीने प्राविण्य मिळवले. काऊंटरवरील कर्मचारी खाली वाकला अथवा त्याने इकडे तिकडे पाहिले म्हणजे तेवढ्या वेळात ती शिताफीने आपल्याकडील अगोदरच टॅग लावलेले नकली दागिने असली दागिन्याच्या जागी ठेवून अदलाबदली करत होती.

एका ठिकाणी तिची युक्ती कामयाब अर्थात यशस्वी झाल्यानंतर तिचे धाडस वाढले. बघता बघता तीची भिड चेपली. निटनेटके कपडे परिधान करुन, बोलीबच्चन वापरुन ती कुशल ग्राहक महिलेच्या भुमिकेत विविध बड्या बड्या शो रुम मधे जावू लागली. या शोध मोहिमेत तिला जळगाव शहरातील आर.सी.बाफना ज्वेलर्स, पु.ना.गाडगीळ, भंगाळे गोल्ड आणि संभाजीनगर येथील आर. सी. बाफना येथील बड्या सराफी शो रुमचा शोध लागला. प्रत्येक ठिकाणी तिने आपल्या हातचलाखीचा वापर करुन सोन्याच्या दागिन्यांची अदलाबदली केली. मात्र प्रत्येक ठिकाणी तिचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद होत गेला. मात्र जेव्हा हा प्रकार लक्षात येत होता तो पर्यंत वेळ निघून गेलेली असे.

जळगाव शहरातील आर. सी. बाफना ज्वेलर्स, पु.ना.गाडगीळ आणि भंगाळे गोल्ड या दुकानांमधे एकाच दिवशी असे फसवेगिरीचे प्रकार घडले. हा प्रकार तिघा दुकानांमधे झाला असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी आर. सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक गणेश राजाराम काळे यांनी शनीपेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार गु.र.न. 239/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(A) प्रमाणे अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुरु झाला पोलिसांचा सखोल तपास.

या चोरीच्या घडामोडीचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले. चोरी करणा-या महिलेचा चेहरा क्रॉप करण्यात आला. अशाच प्रकारचे गुन्हे अजून कुठे कुठे दाखल आहेत अथवा घडले आहेत याची माहिती संकलीत करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर येथील आर.सी. बाफना ज्वेलर्स या दुकानात देखील अशाच स्वरुपाचा प्रकार घडला असून स्थानिक जिन्सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे अधिक तपासात आढळून आले. जळगाव आणि संभाजीनगर येथील गुन्ह्यातील महिलेच्या चेह-यात साम्य असल्याचे आढळून आले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक साजीद मंसुरी, पोलिस उप निरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ प्रदिप रमेश नन्नवरे, महिला पोहेकॉ वैषाली पावरा, पोकॉ निलेश घुगे आदींचे पथक कामाला लागले.
सखोल तपासाअंती या गुन्ह्यातील चोरटी महिला उत्तर प्रदेशातील बरेली येथे असल्याची माहिती मिळाली. तिच्या शोधार्थ पोलिस पथक उत्तर प्रदेशात गेले. तेथून लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून तिघा गुन्ह्यातील चोरी झालेला सोन्याच्या अंगठ्यांचा 61.67 गॅम वजनाचा 6 नगाचा 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तपासकामी जळगाव पोलिस दलातील नेत्रम विभागाचे पोलिस कर्मचारी पंकज खडसे, मुबारक तडवी, कुंदसिंग बयस व तांत्रीक विश्लेषण कर्मी मिलींद जाधव, गौरव पाटील यांचे सहकार्य लाभले.








