कानशिलात मारल्याचा राग डोक्यात गेला ! टोळीच्या हातून अल्तमश जिवानिशी मेला

जळगाव : किरकोळ कारणातून झालेला वाद कधीकधी एखाद्याला मृत्यूच्या दारापर्यंत नेवून सोडतो. हा वाद एखाद्याला कधी कधी तुरुंगवारी करण्यास भाग पाडतो. त्यासाठी शांत चित्ताने वाद सोडवणे केव्हाही हिताचे ठरते. असाच एक किरकोळ वादाचा प्रकार काही दिवसांपुर्वी भुसावळ शहरात घडला. या घटनेतुन रागाच्या भरात पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा खून केला. या वादातून एक मृत्युमुखी तर पाच जण तुरुंगात गेले.

भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागात शाहरुख युसूफ शेख व अल्तमश रशीद शेख हे दोघे तरुण रहात होते. रविवारी सायंकाळी दोघा तरुणात किरकोळ कारणातून वाद झाला. या वादाचे पर्यावसन दोघामधे हाणामारीत झाले. या हाणामारीदरम्यान अल्तमश शेख याने शाहरुख शेख याच्या कानशिलात लगावली.

आपल्या कानशिलात लगावल्यामुळे शाहरुख यास काहीवेळ सुचलेच नाही. त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. कानशिलात मार बसल्याचा राग शाहरुखच्या मनात घर करुन बसला होता. या थप्पडची गुंज अल्तमश यास ऐकावीच लागेल असे शाहरुख याने मनाशी म्हटले होते. आता काहीही करुन अल्तमश यास कायमचा धडा शिकवायचा असे शाहरुख याने नक्की केले होते.दोघातील वाद व हाणामारी झाल्यानंतर दोघे तेथून निघून गेले. मात्र शाहरुख याने अल्त्मश यास बघून घेण्याची भाषा केली होती.

आपल्या कानशिलात लगावणारा अल्तमश हा रात्रीच्या वेळी भुसावळ शहरातील खडका चौफुली जवळ उभा असल्याचे शाहरुख यास समजले. त्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने त्याचे साथीदार शेख समीर शेख युसूफ, समीर शेख रहेमान शेख, अमीर युसूफ शेख व आदर्श गायकवाड या चौघांना बोलावून घेतले. शाहरुख सह सर्व पाच जणांनी रात्रीच्या वेळी अल्तमश याच्यावर हल्ला चढवला.

सर्वांनी मिळून अल्तमश यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील समीर हा त्याच्याजवळ कायम चाकू बाळगत असे. त्याने त्याच्या ताब्यातील चाकूने अल्तमश याच्या छातीवर, पोटावर व पाठीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. आपल्यावर होणा-या जिवघेण्या हल्ल्यामुळे जखमी अल्तमश जिवाच्या आकांताने ओरडू लागला.

या हल्ल्याचे दृश्य समजताच परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने पटापट बंद केली व त्यांनी भितीपोटी तेथून पळ काढला. त्यावेळी जखमी अल्तमश यास खडका रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खाली टाकून पळ काढला. यावेळी जखमी अल्तमश याचा आतेभाऊ जावेद हा तेथे टपरीवर चहा पिण्यासाठी आलेला होता. त्याने हा प्रकार बघताच मारेकरी पळून गेल्यानंतर घटनास्थळ गाठले. जावेद याने त्याचा मामा शेख रशीद शेख मासुम यांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याचे त्यांचे मन हेलावले. जावेद याने त्याचा मित्र शेख सिद्दीक याच्या मदतीने जखमी अल्तमश यास नजीकच्या डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. जखमी अल्तमश याने आपले प्राण सोडले होते. त्यास डॉ. मानवतकर यांनी मयत घोषीत केले. दरम्यान मयत अल्तमश याचे वडील शेख रशीद शेख मासूम यांनी डॉ. मानवतकर यांचा दवाखाना गाठला होता.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ व डॉ. मानवतकर यांचा दवाखान्याला भेट देत माहिती जाणून घेतली. या घटनेप्रकरणी मयत अल्तमश याचे वडील  शेख रशीद शेख मासुम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. रात्रीच तिघा संशयीत मारेक-यांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा दोघांना देखील अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले. मारेक-यांनी मयत अल्तमश याच्या पोटावर, छातीवर जवळपास अकरा वार केले होते.

मारेक-यांना न्यायालयाने सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या. मानकर यांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले. समीर शेख, शाहरुख शेख, आमीर शेख, रमजान शेख व आदर्श गायकवाड असे सर्व मारेकरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. दिलीप भागवत व त्यांचे सहकारी मंगेश गोटला करत आहेत. त्यांना पोलिस नाईक किशोर महाजन, रविंद्र बि-हाडे, श्रीकृष्ण देशमुख, उमाकांत  पाटील, पोलिस कर्मचारी इश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, रमन सुरळकर, समाधान पाटील, विकास सातदिवे, योगेश महाजन यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here