जळगाव – चोरीच्या दुचाकी चोरुन नेत असताना रात्र गस्तीदरम्यान समोर पोलीस दिसताच कब्जातील चोरीच्या दुचाकी जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत चौघा चोरट्यांनी पलायन केल्याची घटना दादावाडी परिसरात घडली. या घटनेच्या तीन दिवसापूर्वी याच परिसरातील चार दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या चोरी प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
सतर्कतेचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्रगस्त वाढवली. या गस्तीदरम्यान चार दुचाकी चोरटे त्यांच्या ताब्यातील चोरीच्या चार दुचाकींसह पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत त्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटे सोडून गेलेल्या दुचाकी पोलिसांनी जागेवरुन ताब्यात घेतल्या असून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.






