बहिणाबाईंनी कष्टकऱ्यांसाठी पसायदान मागितले– प्रा.डॉ. रमेश माने

On: December 3, 2025 9:02 PM

जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी)– “बहिणाबाईंनी शेतकर्‍यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी होऊ दे रे आबादानी असे आवाहन करीत पसायदान मागितले. त्यांच्या कवितेतून दिसणारी विज्ञानवादी दृष्टि, मानवी संवेदना आणि कष्टकरी जनतेशी असलेली नाळ यातुन त्यांना खऱ्या अर्थाने वैश्विक ओळख निर्माण केली”, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रमेश माने यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि विश्व लेवा गणबोली दिनानिमित्त जैन इरिगेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे “स्मरण बहिणाबाईचे” हा कार्यक्रम जुने जळगाव येथील चौधरी वाड्यात उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. श्रीराम महाराज जोशी होते. त्याच प्रमाणे कवयित्री प्रा. डॉ. संध्या महाजन यांनी विश्व लेवा गणबोली दिनानिमित्त लेवा गणबोलीचे मूळ, तिचा लहेजा, तिचे भाषिक स्वरूप, व्याप्ती तसेच बहिणाबाईंच्या कवितेतील भाषेचे संदर्भ याबाबत सविस्तर मांडणी केली. 

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी आणि श्रीमती स्मिता चौधरी यांच्या हस्ते प्रा. डॉ. रमेश माने आणि कवयित्री प्रा. डॉ. संध्या महाजन यांचा तर श्रीराम जोशी महाराज यांचा समन्वयक अशोक चौधरी यांनी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर शेंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात का. उ. कोल्हे विद्यालयातील ६ व्या इयत्तेतील विद्यार्थिनी खुशी अरविंद बारी हिने बहिणाबाईंच्या वेशभूषेत दिलेली उपस्थिती विशेष कौतुकास्पद ठरली. तिने सोपानदेव व बहिणाबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी कथा साभिनय कथन केली. 

आपल्या प्रभावी मार्गदर्शनात प्रा. डॉ. रमेश माने म्हणाले की, “बहिणाबाई केवळ कान्हदेशापुरत्या मर्यादित नाहीत. त्यांचे साहित्य जगभरातील कष्टकरी, शेतकरी, स्त्रिया आणि सामान्य जनतेचे जगणे उलगडते. जैन इरिगेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट यांनी उभारलेल्या या बहिणाई स्मृती संग्रहालयामुळे पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देणारी जतनशाळा ठरेल.” असा आवर्जून उल्लेख केला. या सोबतच १९५२ मध्ये अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील स्मरणिकेत सोपानदेव चौधरी यांनी आपल्या कवितेसमवेत आई बहिणाबाईंची ‘मोट‘ ही कविता देखील पाठविली होती. बहिणाबाईंची कविता या स्मरणिकेत पहिल्यांदा छापून आली असा नवा संदर्भ त्यांनी आपल्या भाषणात दिला. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. श्रीराम महाराज जोशी यांनी बहिणाबाई आणि श्रीराम मंदिर संस्थानचे सद्गुरू आप्पा महाराज यांच्यातील गुरु-शिष्य नाते समजावून सांगितले. “ज्या कान्हदेशात आपण राहतो, त्याच भूमीत जळगावमध्ये बहिणाबाई आपले आयुष्य जगल्या, ही आपली भाग्यरेषाच म्हटली पाहिजे. शिक्षणाबरोबर कर्तव्यनिष्ठा हीच त्यांची शिकवण होती. आपल्या काव्यात देखील त्यांनी सद्गुरू आप्पामहाराज यांच्या विषयी उल्लेख केलेला आहे. त्या आप्पा महाराजांचे प्रवचन, कीर्तन ऐकण्यासाठी आवश्य येत असत” असे त्यांनी सांगितले. विश्व लेवा गणबोली दिनानिमित्त प्रा. डॉ. संध्या महाजन यांनी लेवा गणबोलीमुळे भाषेला प्राप्त झालेले महत्त्व, भाषेचा लहेजा, तिचे स्वरूप आणि बहिणाबाईंच्या कवितेतील स्थान याचा सविस्तर अभ्यासपूर्ण उल्लेख भाषणातून केला. “लेवा गणबोलीचा बराचसा खजिना बहिणाबाईंच्या कवितेतून जतन झाला आहे. सोपानदेव चौधरी व त्यांचे मावसभाऊ यांनी या कवितांना लिखित स्वरूपात जतन करून साहित्याची मोठी सेवा केली,” असे त्यांनी नमूद केले. ‘अरे घरोटा घरोटा’ सारख्या कवितेमधून त्यांनी लेवा गणबोलीचे सहजता श्रोत्यांना समजावून सांगितली.

कार्यक्रमात श्रोत्यांनीही कवितांद्वारे बहिणाबाईंच्या स्मृतींना अभिवादन केले. लेवा गणबोलीतून दोन कादंबऱ्या लिहिल्या असे साहित्यिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. अ. फ. भालेराव यांनी लेवा गणबोली मधील माय कविता सादर करून आपले मनोगत मांडले. कवयित्री शीतल पाटील यांनी ‘मन भऱ्याचे झाड’ ही बहिणाबाईच्या धाटणीची असलेली कविता सादर केली. तेजल वाघ, पल्लवी शिरसाठ आणि भूमिका जंगले या विद्यार्थीनींनी ‘खोपा’ कविता सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन अशोक चौधरी तसेच सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमास बहिणाबाईंची नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह चौधरी वाड्यातील नागरीकांसह सुनंदा चौधरी, रंजना चौधरी, शोभा चौधरी, सविता चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, कोकिळा चौधरी, वैशाली चौधरी, कविता, दीपाली, मीनल चौधरी, किरण चौधरी, विजय जैन, राजेंद्र माळी, उल्हास सुतार, मराठे आप्पा, उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी, प्रदीप पाटील, भंगाळे मामा व दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment